जगाची बाजारपेठ काबीज करू पाहणाऱ्या अ‍ॅपलसारख्या कंपन्यांचे उदाहरण डोळ्यासमोर असण्यासाठी अ‍ॅपलच्या यशाची कवने न गाता आधी स्वत:कडे पाहायला हवे..

ज्या दिवशी बहुसंख्य भारतीय, जवळपास सर्व माध्यमे, पत्रपंडित, राजकीय विश्लेषक असे अनेक थोरथोर हे महान अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचा मृत्यू, काही छटाक वीरांगनांचे त्याच्याशी असलेले संबंध आणि जगातील अद्वितीय अशा ‘सीबीआय’कडे या सगळ्याची चौकशी दिल्याने त्याचे होणारे संभाव्य परिणाम आदी महत्त्वाच्या मुद्दय़ांवरील गहन चर्चातून आपले पांडित्य पाखडीत होते आणि तितकीच बहुसंख्य जनता यातून उडणारे ज्ञानकण वेचण्यात मग्न होती, त्या दिवशी अमेरिकेतील अ‍ॅपल या अवघ्या ४४ वर्षीय कंपनीचे मूल्य हे वर उद्धृत केलेल्या संख्येइतके झाले. अ‍ॅपल कंपनीने बुधवारी दोन लाख कोटी डॉलर्स इतक्या प्रचंड बाजारपेठीय मूल्याचा टप्पा ओलांडला. या शिखरावर पोहोचलेली ही पहिली अमेरिकी कंपनी. या मूल्याचे डॉलरचा दर सरासरी ७५ रुपये असा गृहीत धरून भारतीयीकरण केल्यास वर उल्लेखिलेली रक्कम येते. ती दक्षिण कोरिया, ब्राझील, इंडोनेशिया, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, सौदी अरेबिया, टर्की, स्पेन अशा काही देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षाही जास्त आहे. म्हणजे अ‍ॅपल या एका कंपनीचा आकार या देशांच्या अर्थव्यवस्थांपेक्षा मोठा आहे. यामुळे अ‍ॅपलपेक्षा मोठे असलेल्या अर्थव्यवस्थांत अमेरिका (२१ ट्रिलियन डॉलर्स), युरोपीय संघटना (१९ ट्रि.डॉ.), चीन (१४ ट्रि.डॉ.), जपान (५ ट्रि.डॉ.), जर्मनी (५ ट्रि.डॉ.) असे काही मोजके देशच राहतात. आपणही अ‍ॅपलपेक्षा इंचभराने का असेना अधिक आहोत याचा आनंद काही काळ तरी साजरा करू शकतो. आपली अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन डॉलर्सपेक्षाही कमी आहे. म्हणजे सध्या तरी आपण अ‍ॅपलच्या पुढे आहोत. पण अ‍ॅपलच्या वाढीचा वेग असाच राहिला तर ही कंपनी आपणास मागे टाकण्यास फार अवधी नाही. अ‍ॅॅपलने हा टप्पा गाठणे ही ऐतिहासिक घटना. दोन वर्षांपूर्वी याच काळात अ‍ॅपलने पहिल्यांदा १ लाख कोटी डॉलर्स मूल्यास स्पर्श केला. त्यास जेमतेम २४ महिनेही झाले नाहीत तो या काळात या कंपनीने तितक्याच रकमेची मूल्यवृद्धी केली. हे सर्व नमूद करण्याचा उद्देश अ‍ॅपल काय साध्य करू शकली याची कवने गाणे हा नाही.

pune city, sales of electric vehicles, last year, Gudi Padwa festival
पुणे : कुणी इलेक्ट्रिक वाहन घेता का? गेल्या वर्षीपेक्षा पाडव्यानिमित्त विक्रीत तब्बल ८५ टक्क्यांची घट
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस
During the financial year the market value of 80 companies exceeded lakhs of crores
सरलेल्या आर्थिक वर्षात ८० कंपन्यांचे बाजारमूल्य लाख कोटींपुढे
Increase in average life expectancy of Indians
भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात वाढ

तर आपण काय करायला हवे याची जाणीव करून देणे हा आहे. अ‍ॅपलच्या या दिग्विजयी टप्प्याच्या पार्श्वभूमीवर आपले प्राधान्यक्रम काय, असा काही प्रश्न आपणास आणि आपल्या भाग्यविधात्यांस पडतो काय? तसा तो पडत असेल तर महासत्तापदाचे स्वप्न पाहणाऱ्या या देशास आर्थिक दैन्यावस्थेतून काढण्यासाठी आपल्याकडे काय प्रयत्न सुरू आहेत? तसे ते सुरू आहेत किंवा काय हे तपासण्याचे तारतम्य नागरिकांत आहे काय? आज केवळ आपलाच देश नव्हे तर समस्त विश्वच गंभीर आर्थिक संकटात सापडलेले असताना आणि अनेक देशांत या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू असताना आपले काय सुरू आहे, हा प्रश्न आपणास भेडसावतो काय? सध्या या व्यापक आर्थिक दुरवस्थेचे खापर करोना विषाणूवर फोडण्याची सोय आहे, हे मान्य. पण हा करोनाकाळ सुरू होण्याआधीच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेस मुडदुस झालेला होता. त्यामुळे आपली आर्थिक अवस्था हातपायांच्या काडय़ा झाल्यासारखी आहे म्हणून करोनास बोल लावण्याचे काहीच कारण नाही. आपल्या अर्थव्यवस्थेची करोनाच्या आधीपासूनच बोंब होती. करोनाने तिचे तीनतेरा वाजवले इतकेच. या पार्श्वभूमीवर आपल्या वास्तवाकडे आपण उघडय़ा डोळ्यांनी पाहणार आहोत की नाही?

याचे कारण असे की अर्थतज्ज्ञांच्या भाकितानुसार या वेळेस पहिल्यांदाच आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग शून्याखाली जाईल. याचा अर्थ असा की याआधी अनेकदा आपल्या अर्थव्यवस्थेचे आकुंचन झाले आहे. तिचा वेग मंदावला आहे. पण १९७९ पासून तो कधीही उणे झालेला नाही. यंदा तो तसा असेल. ऐंशीच्या दशकातील आर्थिक संकटास जागतिक तेल समस्या कारणीभूत होती. त्यामुळे सर्वच देशांची परिस्थिती दयनीय होती. आता तसे म्हणता येणार नाही. आपल्यासारखे देश आताच्या संकटात इतरांच्या तुलनेत अधिक भरडले जाणार आहेत. अनेक तज्ज्ञांनी दाखवून दिल्यानुसार यंदा आपले सकल राष्ट्रीय उत्पन्न किमान पाच टक्के ते १० टक्क्यांपर्यंत घसरू शकते. गतकालीन आणि सध्याच्या संकटकालात फरक असा की याआधीच्या अरिष्टांमुळे गरिबांची अन्नान्नदशा होत असे. परंतु, अभ्यासू पत्रकार हरीश दामोदरन यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’मधील लेखात दाखवून दिल्याप्रमाणे यंदा धान्याची कोठारे ओसंडून वाहतील इतके कृषी उत्पन्न पिकेल. तथापि मोठय़ा प्रमाणावरील नागरिकांची हे धनधान्य खरेदी करण्यासारखी परिस्थितीच नसेल. याचा सरळ अर्थ असा की पुरवठा ही या आर्थिक आव्हान काळातील समस्या नाही. प्रश्न आहे तो मागणी नसण्याचा. ही मागणी नाही कारण नागरिकांहाती पैसा नाही आणि ज्यांच्या हाती तो आहे तो वर्ग उद्याच्या चिंतेने खर्च करण्यास तयार नाही.

म्हणून आता प्रयत्न हवे आहेत ते मागणी कशी वाढेल यासाठी. पण त्याबाबत सरकार एक चकार शब्द काढण्यास तयार नाही. आपण योजलेले उपाय अत्यंत परिपूर्ण असल्याची सरकारला खात्री आणि ते पुरेसे नाहीत या सत्याची जाणीवच अनेकांना नाही. अशा वातावरणात आभासी आनंदाचा एक बुडबुडा तयार होतो आणि सर्वच त्यात सुखाने नांदू लागतात. तसे आपले आहे. वास्तविक अशा परिस्थितीत किती नावीन्यपूर्ण उपाय योजायला हवेत हे इंग्लंडचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्यासारख्यांनी दाखवून दिले आहे. जास्तीतजास्त नागरिकांनी हॉटेलात जाऊन खावे यासाठी त्यांनी विशेष योजना जाहीर केली. त्यानुसार त्या देशात हॉटेलात खाण्यावर होणाऱ्या खर्चाच्या दरडोई १० पौंडांपर्यंतच्या बिलातील निम्मा वाटा सरकार उचलते. याचा परिणाम म्हणून नागरिकांची हॉटेलांकडे रीघ लागली. म्हणून त्या देशातील उपाहारगृहांत काम करणाऱ्या १८ लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचल्या. जर्मनी, अमेरिका, युरोपातील अन्य काही देश यांनीही असे काही अप्रचलित उपाय योजून नागरिकांकडून मागणी कशी वाढेल यासाठी प्रयत्न केले. त्याचा परिणाम त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्थांवर ठसठशीतपणे दिसतो. याउलट आपल्याकडची सरकारी मदत योजना मात्र कर्ज हमीच्या मर्यादा वाढवण्यापलीकडे फार काही करीत नाही. तीत उद्योगादींसाठी पतपुरवठय़ाच्या मर्यादेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे, हे मान्य. पण बाजारात उत्पादनांस मागणीच नसताना अधिक आणि स्वस्त पतपुरवठय़ाच्या आधारे जास्त उत्पादन करून बाजारात धाडण्याचा उपयोग तरी काय? त्यातून फक्त दुकानांची धन. पण खरेदीदारच नसल्याने दुकानदारांनीही हात आखडता घेतल्यास आश्चर्य ते काय!

या पार्श्वभूमीवर जगाची बाजारपेठ काबीज करू पाहणाऱ्या अ‍ॅपलसारख्या कंपन्यांचे उदाहरण डोळ्यासमोर असायला हवे. ज्या दिवशी अ‍ॅपल कंपनी हे उत्तुंग शिखर पादाक्रांत करीत होती त्या वेळी आपले समाजजीवन मात्र एका अत्यंत भुक्कड विषयात तल्लीन झाले होते. ही आपल्याच इतिहासाची पुनरावृत्ती. देशावर सोने गहाण ठेवण्याची वेळ आली असता त्या संकटाच्या गांभीर्याचा लवलेशही नसलेले अनेक जण त्या वेळी दूरदर्शनवरील भक्तिरसपूर्ण मालिकेत चित्त हरवून घेत होते. तसेच हे. यात निष्पाप निरागसता नाही. असलेच तर अज्ञान आहे. त्याची व्याप्ती आणि खोली किती याची जाणीव अ‍ॅपलचे शीर्षकातील बाजारपेठीय मूल्य करून देईल.