scorecardresearch

काय ते एकदाचे करा!

पत्रलेखकी नेत्यांना बैठकीस बोलावून सोनिया गांधी यांनी त्यांचे ऐकून घेतले हे योग्यच.

काय ते एकदाचे करा!

पत्रलेखकी नेत्यांना बैठकीस बोलावून सोनिया गांधी यांनी त्यांचे ऐकून घेतले हे योग्यच. पण हे नेते प्रत्यक्ष जमिनीवरच्या राजकारणासाठी किती सक्षम, याचा विचार व्हायला हवा..

काँग्रेस हा पक्ष म्हणून अमेरिकेसारखा आहे. मायभूमीचे कौतुक करणारे तसेच स्वदेशाचे कठोर टीकाकार या दोन्ही प्रवृत्तींना तितक्याच उत्साहाने सांभाळतो. ‘निती’ आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांचा शब्दप्रयोग उसना घ्यावयाचा झाल्यास ही ‘अतिलोकशाही’ अमेरिकेच्या मुळावर आली आहे. काँग्रेसचे तसेच होत असल्याचे म्हणता येईल. या ‘अतिलोकशाही’मुळे काँग्रेसच्या २३ नेत्यांनी हंगामी पक्षप्रमुख सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रास पाय फुटले. त्यामुळे त्या पक्षातील असंतोषाचा बभ्रा झाला. वास्तविक समोर भाजपसारखा बलदंड प्रतिस्पर्धी असताना, त्यासमोर एका सुरात आणि एका दमात उभे राहण्याची गरज असताना काँग्रेसजन हे पत्र-पत्र खेळत बसले आणि दरम्यान त्या पक्षाने हातातील दोन राज्येही गमावली. आव्हान काय आणि आपण करतो काय याचा कसलाही विचार ना या पत्रलेखकांत दिसून आला, ना पक्षाची सूत्रे हाती असलेल्या गांधी कुटुंबीयांनी त्याची जाणीव असल्याचे दाखवून दिले. या पत्रलेखकांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांचे काय होणार आदी प्रश्न गेले चार महिने राजकीय वर्तुळात चर्चिले जात होते. सोनिया गांधी या पत्रलेखकांना भेटणार काय, त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांची दखल घेणार काय वगैरे बाबी यामागे होत्या. विशेषत: या पत्रलेखकांतील एक गुलाम नबी आझाद यांना गांधी कुटुंबीयांच्या साक्षीने मध्यंतरी पक्षाच्या आभासी बैठकीत हेटाळले गेले. त्यामुळे काँग्रेसमधील या कथित सुधारणावाद्यांच्या पदरी उपेक्षाच येणार अशी भीती व्यक्त होत होती. ती काही प्रमाणात खोटी ठरली. कारण सोनिया गांधी शनिवारी प्रत्यक्षपणे, म्हणजे आभासी पद्धतीने नाही या अर्थी, या पत्रलेखक नेत्यांना भेटल्या.

महत्त्वाची बाब म्हणजे, या बैठकीस राहुल गांधी यांची तळी उचलण्यास तत्पर असे रणदीप सुरजेवाला वा के. के. वेणुगोपाल असे तरंगते नेते निमंत्रित नव्हते. तरंगते अशासाठी की, हे लौकिक अर्थाने काही नेते नाहीत. त्या पक्षातील दरबारी राजकारणातील चातुर्य हेच त्यांचे भागभांडवल. पण काँग्रेसच्या विद्यमान प्रभावळीचेही वास्तव हेच आहे. सोनिया गांधी यांच्या आसपासचा गोतावळा हा सर्व राज्यसभीय आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमिरदर सिंग वा राजस्थानचे अशोक गेहलोत असे काही मोजके अपवाद वगळता, लोकांत जाऊन नेतृत्व करणारे त्या पक्षात फार नाहीत. अगदी ज्येष्ठ मुत्सद्दी वगैरे म्हणून गणले गेलेले आणि शेवटच्या दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्यांच्याविषयी भरते आले होते त्या प्रणब मुखर्जी यांची संपूर्ण हयात राजकारणात गेली. पण बहुतांशकाळ ते राज्यसभेतच राहिले. राज्यसभेतील अशा नेत्यांचे म्हणून निश्चितच महत्त्व असते. त्यांच्या बुद्धीचा आणि अभ्यासाचा पक्षास उपयोग असतो. आज सत्ता वा पद हाती नसेल, पण मनमोहन सिंग वा पी. चिदम्बरम हे एखाद्या विषयावर बोलतात तेव्हा समाजातील समंजसांस त्यांची दखल घ्यावी लागते. पण हे असे नेते हे प्रत्यक्ष मातीत उतरून राजकारण करणाऱ्यांस पर्याय असू शकत नाहीत. विद्यमान भाजप हे त्याचे उत्तम उदाहरण. अरुण जेटली, सुषमा स्वराज वा प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर बुद्धिमानांस दखल घ्यायला लागेल असे नेतेच भाजपत नाहीत. बोलणारे पुष्कळ. पण तो पक्ष सध्या विजयरथावर आरूढ असल्याने त्यास ही उणीव जाणवणार नाही. काँग्रेसचे तसे नाही. त्या पक्षास या वास्तवाची दखल घ्यावी लागेल.

म्हणून पत्रलेखकी नेत्यांना बैठकीस बोलावून सोनिया गांधी यांनी त्यांचे ऐकून घेतले हे योग्यच. त्यांना तेवढा मान द्यायला हवा. पण हे नेते प्रत्यक्ष जमिनीवरच्या राजकारणासाठी किती सक्षम, याचा विचार व्हायला हवा. तो केल्यास अशा नेत्यांचा शोध घेण्याची गरज पक्षास किती आहे, हे सोनिया वा अन्य गांधी यांना लक्षात येईल. आणि ती आल्यास त्यातून पत्रलेखकांचा मुद्दाच अधोरेखित होईल. तो म्हणजे पक्षाच्या नेतृत्वमंडळाची निवड. प्राप्त परिस्थितीत पक्षाचे मुख्य नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे जाईल असे दिसते. पण ते एकटय़ाने पक्ष हाकू शकत नाहीत. तशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी त्यांना मोदी वा अमित शहा यांच्याइतके कष्ट घ्यावे लागतील. पण ही जर-तरची बात. तूर्त त्यांना आपल्या आसपास नेते मंडळी लागतील. ‘काँग्रेस वर्किंग कमिटी’ हे अशा नेतृत्वगणांचे मंडळ. थेट पक्षाध्यक्ष पदासाठी निवडणुका नाही झाल्या वा करावयाच्या नसल्या, तरी या ‘सीडब्ल्यूसी’साठी तरी काँग्रेसने निवडणुका होऊ द्याव्यात. त्यातून जनतेतील नेते निवडणे हा मधला मार्ग असू शकतो. राहुल गांधी यांच्या केंद्रीय स्थानास त्यामुळे धक्का लागणार नाही आणि पक्षाच्या नेत्यांची दुसरी फळीही त्यामुळे तयार होईल. नाही तरी राहुल गांधी हे जर एकच उमेदवार असतील तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीस तसा काही अर्थच नाही. आपल्याकडे सर्वच पक्षाचे अंतर्गत नेतृत्व हे आभासी लोकशाहीवर चालते. काँग्रेस पक्ष किमान आभासही निर्माण करीत नाही, म्हणून त्याविषयी चर्चा. तेव्हा या मार्गाने पक्षातील अस्वस्थता, खदखद कमी होईल आणि ज्येष्ठांनाही काही किंमत राहील. परत राहुल गांधी यांचे स्थान अबाधित.

फक्त ते तसे राखून आपण काय करू इच्छितो हे एकदा राहुल गांधी यांनी सांगावे आणि त्याप्रमाणे कार्यकृती करावी. त्यातील प्रयत्नसातत्यांची सध्या त्या पक्षास गरज आहे. कारण त्यामुळेच त्यांची आधी प्रतिमा तयार होईल आणि मग तिचे संवर्धन होईल. त्यांना ‘पप्पू’ ठरवण्यासाठी भाजपने ठरवून प्रयत्न केले, समाजमाध्यमी टोळ्या पाळल्या हे सर्व खरे असले तरी, त्या सर्वास राहुल गांधी यांनी आपल्या वर्तनाने खतपाणीच घातले हे नाकारण्यात अर्थ नाही. राजकारण असो वा समाजकारण; अलीकडे सर्व क्षेत्रांतील युद्धे आधी मन:पटलावर (माइंड गेम) लढली जातात. प्रतिपक्षाचे मनोधैर्य प्रथम खच्ची करायचे आणि त्याची प्रतिमा डागाळायची. हे सर्वत्र चालते. त्यास तोंड देण्यासाठी स्वत:चे वर्तन आणि कृती तशीच हवी. राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी या खेळाकडे आधी दुर्लक्ष केले आणि जेव्हा लक्ष द्यायला सुरुवात केली तेव्हा ते विरोधकांवर आगपाखड करण्यात वेळ घालवत बसले. आपल्या प्रतिस्पध्र्याविषयी संशय निर्माण करणे हा कोणत्याही खेळाचा भाग झाला. राजकारण त्यास अर्थातच अपवाद नाही. त्यामुळे भाजपविषयी कटुता, कडवटपणा न बाळगता काँग्रेस आणि राहुल यांना स्वत:च्या पक्षाची रेषा कशी वाढेल यासाठी प्रयत्न करावे लागतील. ते जमेपर्यंत एक सोपा मार्ग त्यांस उपलब्ध आहे.

तो म्हणजे राज्या-राज्यांतील भाजपेतर नेते वा पक्ष यांचा आधार घेणे. भाजपच्या मध्ययुगीन राजकीय कल्पनांना विरोध करणारे अनेक नेते वा पक्ष अजूनही शाबूत आहेत आणि प्रामाणिक निधर्मी मतदारांचा विवेकही अद्याप टिकून आहे. या वर्गासमोर अजस्र भाजपखेरीज आज पर्याय नाही. तो एका दिवसात उभा राहणारही नाही. पण तो उभा राहीपर्यंत जे तसे उभे आहेत त्यांचा हात काँग्रेसने हाती घ्यावा. एकेकाळी राज्या-राज्यांतील अशा नेतृत्वास काँग्रेस जवळ करीत असे आणि स्वत:चे बळ वाढल्यावर दूर करीत असे. आजचा भाजप तेच करतो. यातील उत्तरार्ध टाळून काँग्रेसने पुन्हा एकदा स्वविकसित पद्धत स्वीकारण्यात काही गैर नाही. ‘‘असा एकही बुरूज नाही की ज्यास घोरपड लावता येत नाही,’’ असे राम गणेशांचे ‘राजसंन्यास’ सांगते. तेव्हा काँग्रेसला भाजपस रोखता येणार नाही, असे अजिबात नाही. त्यासाठी प्रयत्न आणि त्यांचे सातत्य हवे. ते दाखवायची मुदत संपत आली आहे, हे काँग्रेसने लक्षात घ्यायला हवे. पराभूतांनी कृतिशील व्हायचे असते आणि विजयींनी चिंतनशील. म्हणून नाराजांशी चर्चा वगैरे ठीक. पण जे काही करायचे ते एकदाचे करा आणि कामाला लागा!

मराठीतील सर्व अग्रलेख ( Agralekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या