अत्यंत धाडसी आणि मनस्वी अशा आरियल शेरॉन यांनी आयुष्यभर स्वत:विषयी टोकाच्या भावनाच निर्माण केल्या. त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारा किंवा तितकाच दुस्वास करणारा अशीच त्यांच्याविषयी भावना असे.
शेरॉन हे नाव स्त्रीलिंगी आणि त्याचा संबंध फुलांशी असतो. आरियल शेरॉन यांचे व्यक्तिमत्त्व दूरान्वयानेही तसे नव्हते. त्यांचे मूळ नाव आरियल शेनरमन. बायबलमध्ये पवित्र भूमी म्हणून उल्लेख असलेल्या जॉर्डन नदीच्या काठी इस्रायलच्या सीमेलगत फुलांचे ताटवे उगवणाऱ्या सुपीक जमिनीस शेरॉन असे संबोधले जाते. आरियल यांनी इस्रायलच्या सीमारेषा विस्तारण्यासाठी जे काही केले ते पाहून पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांनी कौतुकाने त्यांस शेरॉन असे संबोधण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून ते नाव त्यांना कायमचे चिकटले. अत्यंत धाडसी, साहसवादी आणि मनस्वी अशा शेरॉन यांनी आयुष्यभर स्वत:विषयी टोकाच्या भावनाच निर्माण केल्या. पश्चिम आशिया आणि परिसरात त्यांच्याविषयी दोनच प्रतिक्रिया उमटत. एक वर्ग त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारा होता आणि दुसऱ्याने त्यांचा प्रचंड दुस्वास केला. या दोन्हींच्या मध्ये कोणी असण्याची शक्यता फारच कमी. त्यांच्याविषयी इतक्या टोकाच्या प्रतिक्रिया खुद्द इस्रायलमध्येच होत्या. शेरॉन यांचे वर्णन नियमानुसार चालणारा असे केले जात असे. परंतु समस्या ही की हे नियम ते स्वत:च करतात. त्यामुळे आयुष्यभर शेरॉन हे कोणत्या ना कोणत्या वादाच्या केंद्रस्थानीच राहिले आणि त्याची त्यांनी कधीही पर्वा केली नाही. मूळच्या युरोपिअन ज्यू कुटुंबात जन्मलेले आरियल हे तरुणपणापासून कट्टर उजवे ज्यूवादी होते. इस्रायलच्या निर्मितीपासून राष्ट्रवादी चळवळीशी त्यांचा संबंध होता. इस्रायलचा जन्म १९४८ सालचा. ब्रिटिशांपासून वेगळे होताना इस्रायलला सहन कराव्या लागलेल्या जन्मकळा अमानुष होत्या. त्या शेरॉन यांनी तरुणपणी प्रत्यक्ष अनुभवल्या आणि त्यानंतर सैन्यात जाऊन सारी हयात त्यांनी इस्रायलसाठी लढण्यात घालवली. त्या देशाच्या प्रत्येक युद्धात त्यांचा सहभाग होता आणि नंतर प्रत्यक्ष राजकारणात उतरून त्यांनी इस्रायलचे भाग्यविधाते होण्याचा प्रयत्न केला.
शेरॉन यांचे खरे नाव झाले ते १९५६ सालच्या सुएझ युद्धात. आशियाला युरोपशी जोडणारा हा थेट मार्ग. इजिप्तच्या भूमीतून जाणाऱ्या या कालव्यावर ब्रिटिश आणि फ्रेंच कंपनीचे नियंत्रण होते. त्या वेळी इजिप्तचे नेतृत्व करणाऱ्या गमाल अब्दुल नासर यांना ते खुपू लागले आणि त्यावर स्वत:चे नियंत्रण ठेवण्याची इच्छा त्यांच्या मनात बळावू लागली. नासर यांना अरब जगाचे नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा होती. आकाराने इजिप्त त्या वेळी मोठाच होता आणि त्यांचे लष्करही तगडे होते. त्या तुलनेत अन्य अरब नेतृत्व अगदी किरकोळ होते आणि त्या सर्वात नासर उठून दिसत. ही परिस्थिती त्यांच्या अरब राष्ट्रवादास धुमारे फुटण्यास सोयीची होती. त्यातूनच ५६ सालच्या जुलै महिन्यात त्यांनी या कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले. त्यामुळे अर्थातच ब्रिटिश पंतप्रधान अँथनी एडन हे कमालीचे संतापले आणि नासर यांना ठार करण्याची भाषा करू लागले. परंतु त्या वेळी अमेरिकेच्या अध्यक्षपदी असलेल्या ड्वाईट आयसेनहॉवर यांना हे इजिप्तविरोधात युद्ध छेडणे मंजूर नव्हते. कारण तसे झाले असते तर नासर हे सोविएत रशियाच्या कम्युनिस्ट कळपात शिरण्याचा धोका होता. परंतु आयसेनहॉवर यांची ही भूमिका एडन यांना मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी इस्रायलच्या मदतीने इजिप्तवर हल्ला करण्याचा छुपा बेत आखला. इस्रायल तयारच होता कारण नासर हे इस्रायलच्याही डोळय़ात खुपू लागले होते. त्यामुळे त्यांनी ही संधी साधली आणि सुएझ परिसरात धाडसी हल्ला केला. या हल्ल्याची योजना शेरॉन यांची. त्या वेळी शेरॉन यांनी पॅराशूटमधून शत्रुप्रदेशात उतरून अविश्वसनीय वाटेल अशा प्रकारे सैनिकी हालचाली केल्या. शेरॉन यांचा साहसवाद त्या वेळी पहिल्यांदा जगासमोर आला. त्यानंतर शेरॉन यांनी आपल्यातील या गुणाचे वारंवार प्रदर्शन केले. पुढे १९६७ सालचे सहादिवसीय युद्ध आणि १९७३ सालची योम किप्पुर नावाने ओळखली जाणारी लढाई यांत शेरॉन यांची साहसवादी, प्रसंगी अमानुष अशी शैली जगासमोर आली. १९६७ सालच्या युद्धात तर नेतृत्वाचे आदेश नसतानाही शेरॉन यांनी चढाया केल्या आणि त्याचे त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. एकदा एक भूमिका घेतली की कितीही किंमत द्यावी लागली तरी ती निभावून न्यायची हा त्यांचा लष्करी खाक्या होता. शेरॉन सर्वार्थाने बेफिकीर म्हणता येतील असेच होते. १९८२ सालच्या त्यांच्या लेबनॉनवरील कारवाईतून हे दिसून आले. पॅलेस्टिनी आघाडीचे यासर अराफात यांचा नि:पात करण्यासाठी शेरॉन यांनी अत्यंत निदर्यपणे लेबनॉनवर हल्ला केला आणि त्यात हजारो ख्रिश्चनांची कत्तल झाली. इस्रायलची उत्तर सीमा सुरक्षित करण्याच्या हेतूने आपण ही कारवाई केल्याचे समर्थन शेरॉन यांनी केले. पण ते फसवे होते. पुढे चौकशी होऊन त्यात दोषी आढळल्यानंतर शेरॉन यांना बडतर्फ करण्यात आले. त्याचीही तमा त्यांनी बाळगली नाही आणि नंतर ते थेट राजकारणातच आले. उजव्या विचारांच्या लिकुड पक्षाच्या संस्थापकांत त्यांचा समावेश होता. योगायोग असा की इस्रायलचे विद्यमान पंतप्रधान बिन्यामिन नेत्यान्याहू यांच्याच नेतृत्वाखाली ते सत्तेत आले. सुरुवातीच्या काळात नेत्यान्याहू मवाळ वाटावेत अशी परिस्थिती होती आणि त्याच वेळी शेरॉन मात्र टोकाची विस्तारवादी भूमिका घेत होते. इस्रायलच्या आसपास दिसणारी प्रत्येक टेकडी तुम्ही ताब्यात घ्या असे इस्रायली तरुणांना सांगण्याइतके टोकाचे शेरॉन वागत. त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांना बुलडोझर म्हटले जात असे. फक्त समस्या ही की हा बुलडोझर कशावर तरी आदळल्यानंतरच थांबत असे. इस्रायलच्या दृष्टिकोनातून त्यांच्यातला अतुलनीय गुण म्हणजे मातृभूमीसाठी वाटेल ते करावयास ते मागेपुढे पाहत नसत. १९८० साली इराण आणि इराक यांच्यात युद्ध झाल्यावर अमेरिकेने इराणच्या अयातोल्ला खोमेनी यांना चोरून शस्त्रास्त्र पुरवठा केला. या व्यवहारात शेरॉन यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता. खोमेनी यांना झालेला शस्त्रास्त्र पुरवठा हा शेरॉन यांच्या मध्यस्थीने इस्रायलच्या मार्फत झाला होता. अमेरिकेचे त्या वेळचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचे आणि शेरॉन यांचे उत्तम सूत जुळले. कारण दोघेही सारखेच साहसवादी आणि प्रसंगी विवेकास तिलांजली देण्यास तयार असणारे. शेरॉन याबाबत इतके बेडर आणि बेमुर्वतखोर होते की पुढे त्यांनी जेरुसलेम येथील अल अक्सा या मुसलमानांच्या तिसऱ्या अत्यंत पवित्र मशिदीत घुसखोरी केली आणि पॅलेस्टिनींचा राग ओढवून घेतला. त्यातूनच आत्मघातकी हल्ल्यांचे पेव फुटले आणि पॅलेस्टिनी समस्या कमालीची गुंतागुंतीची झाली. त्याला तोडगा म्हणून शेरॉन यांनी काढलेला पर्याय त्याहूनही टोकाचा होता. इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातील सीमारेषेवर त्यांनी उंच भिंत बांधण्यास सुरुवात केली. परिणामी पॅलेस्टिनींचे जगणे मुश्कील झाले आणि त्यांचा दैनंदिन प्रवास आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा दोन्हीही खंडित झाला.
इतका टोकाचा स्वभाव असलेली व्यक्ती दोन वेळा इस्रायलची पंतप्रधान झाली. तेव्हा त्या काळात पॅलेस्टिनी प्रश्न चिघळणे साहजिक होते. या काळात शेरॉन यांची कार्यशैली आम्हास दोन वेळा अनुभवता आली. २००२ साली सीएनएन या वृत्तवाहिनीच्या ख्रिश्चियान अमोनपुर यांनी पॅलेस्टिनी आत्मघातकी तरुणांविषयी सहानुभूती वाटेल अशी वृत्तकथा प्रसृत केली म्हणून शेरॉन यांनी या वाहिनीवर थेट बंदीच घातली आणि अमेरिकेतील धनाढय़ इस्रायलींमार्फत या वाहिनीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. अखेर या वाहिनीचे प्रमुख टेड टर्नर यांनी जेरूसलेम येथे येऊन आपल्यासमोर नाक घासल्यावरच शेरॉन यांनी ही बंदी उठवली. त्यांचा राष्ट्रवाद हा असा कमालीचा टोकाचा होता.
परंतु याच शेरॉन यांनी आपल्या या भूमिकेस यश येत नाही असे दिसल्यावर २००५ साली अचानक भूमिका बदलली आणि आसपासच्या पॅलेस्टिनी प्रदेशातील घुसखोरी मागे घेण्यास सुरुवात केली. या त्यांच्या भूमिकेने अनेकांना त्या वेळी धक्का बसला. एके काळचा हा विस्तारवादी नेता असा आकसू लागलेला पाहून इस्रायलमधील कडवे ज्यू त्यांच्यावर नाराज झाले. परंतु तरीही शेरॉन बधले नाहीत. तरुणपणीचा कम्युनिस्ट पुढे ज्येष्ठ नागरिक झाल्यावर हभप व्हावा तसा हा बदल होता आणि तेवढय़ाच उत्साहाने शेरॉन त्याचे समर्थन करीत होते. त्यातूनच त्यांनी स्वत:च्या कडव्या लिकुड पक्षाचा त्याग केला आणि मध्यममार्गी अशा कदिमा पक्षाची स्थापना केली. २००६ सालच्या निवडणुकीत ते तिसऱ्यांदा सत्तेवर येणार ही काळय़ा दगडावरची रेघ होती. पण पक्षाघाताच्या जबर धक्क्याने ती हिरावली. त्यात जायबंदी झालेला हा तगडा नेता सात वर्षे अंथरुणास खिळून होता.
यातून त्यांची सुटका अखेर मरणानेच केली. एका देशाचा नायक हा दुसऱ्यासाठी खलनायक असू शकतो. त्याचमुळे शेरॉन यांचे विश्लेषण दोन्ही बाजूंनी होऊ शकेल आणि दोन्हीही बाजू तितक्याच खऱ्या असतील. आता या चर्चेत अर्थ नाही. कारण आरियल शेरॉन नावाची वाळवंटातील वावटळ कायमची शांत झाली आहे. वादळ हे वादळ असते. चांगले वा वाईट असे त्याचे मूल्यमापन करण्यात अर्थ नसतो. शेरॉन हे असे होते.