मन्मना भव! तुझं मन आणि माझं मन एक कर, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. नंतर, भव मद्भक्तो! म्हणजे माझा भक्त हो. श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या व्याख्येनुसार जो भगवंतपासून विभक्त नाही तो भक्त. हे विभक्तपण मनाचंच आहे. देहानं सतत जवळ राहणं शक्य नाही पण मनानं सतत जवळ राहणं शक्य आहे. असा भक्त व्यवहारही नीट करील पण त्याचं मन व्यवहारात गुंतणार नाही. गोंदवल्याच्या कृष्णाच्या आईंनी एकदा सांगितलं की, पूर्वीच्या काळी मोठमोठे वाडे असत. लग्न झालेले पती-पत्नी वरच्या मजल्यावर आहेत आणि घरात पाहुणे आले की त्यांना नमस्कारासाठी खाली बोलावलं जाई. ते दोघं नमस्काराला येत आणि हसऱ्या चेहऱ्यानं समोर उभेही राहात. पण कधी एकदा ‘जा आता’ असे शब्द कानावर पडतात, असं त्यांना होई. तसं भगवंताच्या चिंतनातून व्यवहारात उतरल्यावर झालं पाहिजे! तेव्हा जो असा मनानं कायम भगवंताला जोडलेला असेल तो व्यवहारात चुकणारही नाही आणि गुंतणारही नाही. मग अशा भक्ताला भगवंत सांगतात, मद्याजी मां नमस्कुरू. तुझा आकारही माझ्यात मिसळून जाईल. सर्व गोष्टींचा कर्ता भगवंतच आहे, हे जाणवेल आणि आपण काही केलं, हा कर्तेपणाचा भावही तुझ्यात राहणार नाही. मग असा भक्त भगवंतालाच मिळणार. त्याच्याच भक्तीत रममाण होणार. ‘नारायणे दिला वसतीस ठाव। ठेवूनिया भाव ठेलो पायी।।’ या चरणाचा व्यापक मागोवा आपण घेतला. अशी स्थिती लाभूनही धोक्याचं शेवटचं वळण बाकीच असतं. त्याचा संकेत तुकाराममहाराज पुढच्याच चरणात देतात. ‘‘तुका म्हणे दिले उमटूनि जगी। घेतले ते अंगी लावूनिया।।’’ ज्याला सद्गुरू आपल्या चरणांशी आश्रय देतात त्याचं त्या चरणांवरून लक्ष ढळण्याचा धोका काही संपला नसतो. त्या चरणांवरून किंचित जरी लक्ष दुनियेकडे वळलं की घसरण सुरू झालीच. आता दुनियेकडे लक्ष वळणं म्हणजे काय? तर सद्गुरूंच्या कृपेनं जे ज्ञान प्राप्त झालं ते त्यांच्या आज्ञेशिवाय जगात पसरवायची उबळ निर्माण होते. त्या ज्ञानानं जग प्रभावित होतं आणि ज्ञान ज्याच्या मुखातून आलं त्यालाच ज्ञानी मानू लागतं. अशा वेळी राखेतल्या निखाऱ्यासारखा अहंभाव पुन्हा फुलून धगधगत पेटू लागतो. मग ते समस्त ज्ञान जगात उमटून द्यायला सरसावलेल्या भक्ताचं अध:पतन सुरू होतं. जो सद्गुरू चरणांशी तल्लीन आहे त्याच्या वागण्याबोलण्यातून भावविभोर स्थितीत ज्ञानच प्रतिबिंबित होतं आणि लोकांच्या मनावरही त्याचा ठसा उमटतो. पण त्यात त्याचा अभिनिवेश नसतो. गुलाबाचं फूल फुलतं आणि त्याचा सुवास स्वाभाविकपणे दरवळतो. त्याचं रचनासौंदर्य आणि रंग उपजतच आकर्षक असतात. त्याचं त्या फुलाला भानही नसतं. भावमग्न भक्त तसा असतो. तुकाराममहाराज म्हणतात, सद्गुरूंनी त्यांच्या चरणांशी ठाव दिला आणि मीही त्यांच्या चरणांवर मला पूर्ण लोटून दिलं. त्यानंतर त्यांच्याकडे जे गवसलं ते सहजच उमटलं पण ते ज्ञान बोलण्यापुरतं उरलं नाही. जे दुसऱ्याला सांगावं, ते माझ्यात पक्कं मुरल्याशिवाय आणि ते आचरणात आल्याशिवाय चैन पडेना, अशी स्थिती आली!