कवी, शोध पत्रकार-संपादक, चित्रकार व छायाचित्रकार, संवादक आणि ब्रॉडकास्टर, चित्रपट निर्माता, खासदार अशा विविध भूमिकांमध्ये छाप पाडलेल्या व्यक्तीचा व्यक्तिमत्त्व वेध घेताना नेमका भर कशावर द्यायचा? प्रीतीश नंदी हे असे अलौकिक व्यक्तिमत्त्व होते, ज्यांच्याविषयी हा प्रश्न उपस्थित होतोच. ते केवळ स्वत: जीवन असोशीने जगले नाहीत, तर ती असोशी आणि उत्कटता त्यांनी इतरांसही आस्वादायला लावली, शिकवली. हे करत असताना काहींना मोरपीस फिरवल्याचा भास झाला असेल, काहींना थेट काटेच बोचले असतील. त्यांच्या कित्येक आविष्कारातून, जमून आलेल्या शास्त्रीय संगीत मैफलीचा परमानंद काहींना लाभला असेल. तर काहींना त्यांची कृती म्हणजे कान किटवणारे त्रस्तसम रॉक-अँड-रोल संगीतही वाटले असेल. परिणामाची आणि प्रतिसादाची पर्वा प्रीतीश नंदी यांनी कधीच केली नाही. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे भारतासारख्या नवथर लोकशाहीसाठी अनिवार्य आहे, याचे भान त्यांना सतत होते. बातमी, मुलाखत, वृत्तपत्र, चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी प्रयोगशीलता जोपासली. ते करताना कोण दुखावले वा सुखावले याचे त्यांना सोयरसुतक नसायचे.

हेही वाचा >>> तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात

‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘द इलस्ट्रेटेड वीकली’, ‘फिल्मफेअर’, ‘द प्रीतीश नंदी शो’, ‘प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्स’ अशा अनेक व्यासपीठांवर त्यांनी स्वतंत्र ठसा उमटवला किंवा त्यांना आकार दिला. दूरदर्शनच्या जमान्यात म्हणजे १९९०च्या दशकातील त्यांचा ‘प्रीतीश नंदी शो’ तेव्हा बीबीसी, सीएनएनच्या तोडीचा होता. हर्षद मेहता, बाळासाहेब ठाकरे, एम. एफ. हुसेन अशा अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी पाहुण्यांना बोलते करताना, संबंधित व्यक्ती निष्कारण विचलित होणार नाही हे पाहिले. या मुलाखतींमध्ये आलेल्या पाहुण्यासही प्रीतीश नंदी ही काय वल्ली आहे याची कल्पना असायचीच.

त्यांचा जन्म बिहारमधला, पण ते तनाने आणि मनाने वाढले बंगालमध्ये. १९५०-६०-७० चा तो काळ स्वातंत्र्योत्तर बंगाली आणि भारतीय रेनेसाँचा. प्रीतीश नंदींचे पहिले प्रेम म्हणजे कविता. १७व्या वर्षी त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. वयाच्या २७व्या वर्षी साहित्यातील योगदानाबद्दल पद्माश्री बहुमान! तरीदेखील त्यांची आधुनिक ओळख सांगितली जात असताना, कवितेचा केवळ उल्लेख होतो हे त्यांच्या बहुप्रसवा प्रतिभेचे निदर्शक. जे भावले, आवडले, त्यात ते रममाण झाले पण थांबले, विसावले नाहीत. त्यांची वृत्ती सदैव शोधकाचीच राहिली. नवनवीन क्षेत्रे आणि आव्हाने धुंडाळत राहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळेच कधी देशातला पहिला सायबर कॅफे त्यांच्या पुढाकाराने उभा राहिला, कधी वेगळ्या वाटेवरील चित्रपटांसाठी ते आश्रयदाते ठरलेय सायबर किंवा आता डिजिटल विश्वाची आणि त्याच्या ताकदीची चाहूल त्यांना इतरांच्या आधी लागली. अशा या व्यक्तीने ७३व्या वर्षीच जगातून अकाली निघून जाण्याचे तसे काही प्रयोजन नव्हते. पण थांबणे, रेंगाळणे त्यांच्या स्वभावात नव्हते नि नियतीलाही ते मान्य करावे लागले!