scorecardresearch

Premium

बुकमार्क : खरंच, उशीर झालाय!

मुलांसाठी आणि मुलांसह जगण्याच्या कैलास सत्यार्थी यांच्या प्रवासाची दाहक कथा सांगणाऱ्या पुस्तकाविषयी..

book review why didn t you come sooner by kailash satyarthi
व्हाय डिडन्ट यू कम सुनर?

प्रमोद निगुडकर

मुलांसाठी आणि मुलांसह जगण्याच्या कैलास सत्यार्थी यांच्या प्रवासाची दाहक कथा सांगणाऱ्या पुस्तकाविषयी..

Mutual Funds and their overview
 Money Mantra : ‘कर्त्यां’चा त्रैमासिक आढावा
inspirational story kalpana-saroj
बाराव्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून छळ; दोन रुपयांपासून कमाईला सुरुवात करणाऱ्या कल्पना सरोज ९०० कोटींच्या मालकीण बनल्या कशा?
bombay hc quashes fir against college student for rash driving that killed stray dog
वाहनाखाली चिरडून भटक्या श्वानाचा मृत्यू; आरोपी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम नको, न्यायालयाकडून गुन्हा रद्द
students
विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर आता लाल किंवा हिरव्या रंगाचा ठिपका, शिक्षण विभागाचा नवा निर्णय काय? वाचा सविस्तर

कैलाश सत्यार्थी हे नाव आपल्याला परिचित आहे, ते बालहक्क कार्यकर्ते आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते म्हणून. त्यांनी शिक्षणाच्या अधिकारासाठी योगदान दिलं आहे. साधारण १९८०च्या सुमारास इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचं करिअर सोडून सत्यार्थीनी मुलांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. गेली चार दशकं हे काम ते अविरत करत आहेत. बालमजुरीच्या विरोधात त्यांनी जागतिक मोहीम हाती घेतली आणि त्यातून त्यांचा हा चळवळीचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर शिक्षणासाठी जागतिक अभियान, बाल लैंगिक शोषण, बालमजुरी आणि मानवी तस्करीविरोधी अभियान असा विविध मार्गानी हा प्रवास सुरू राहिला. गावात दिसणारी समस्या जागतिक पटलावर घेऊन जाण्याचं त्यांचं कसब वाखाणण्यासारखं आहे. त्यांच्या मुलांबरोबरच्या प्रवासाची आणि मुलांसोबत, मुलांसाठी जगण्याची गोष्ट म्हणजे ‘व्हाय डिडन्ट यू कम सूनर?’ हे पुस्तक! इंग्रजीतलं हे पुस्तक प्रथम हिंदीत प्रकाशित झालं होतं. आता ते इंग्रजीत आलं आहे.

हेही वाचा >>> बुकबातमी : वाचन तयारी, पण २११४ सालाची..

हा सत्यार्थीच्या आयुष्यातील तीन दशकांचा भावनिक गुंतवणुकीचा आणि मानसिक ताणतणावांचा तोल सांभाळण्याचा आव्हानात्मक काळ आहे. सत्यार्थी म्हणतात, ‘‘मला या काळाकडे तटस्थपणे पाहणं शक्यच नव्हतं. तो मानसिक, भावनिक गुंतवणुकीचा काळ होता. अनुभवांना शब्दरूप देणं तर अधिकच कठीण होतं. पण वाचकांसाठी हे आव्हान स्वीकारायचं, असं मी ठरवलं.’’ गुलामीच्या जोखडातून सोडवलेल्या, बालमजुरीतून मुक्त केलेल्या अनेक मुलांच्या कहाण्या सांगणारं हे पुस्तक काही प्रातिनिधिक अनुभवकथा समोर ठेवतं.

‘‘मी जन्माला आलो तेव्हा सगळय़ांना वाटलं की मी अपशकुनी आहे. (कोण्या बाबांनी त्यांना तसं सांगितलं होतं.) माझ्या कुटुंबावर येणाऱ्या सर्व संकटांना मी जबाबदार आहे, असंच सगळे समजत होते. मी शाप होतो तर देवाने मला बनवलंच का? म्हणजे ही देवाची चूक होती. मग देवाच्या चुकीची शिक्षा मला का?’’ अपशकुनी म्हणून कुटुंबाने ठार मारायला काढलेल्या आणि त्यातून बचावलेल्या प्रदीपचा हा प्रश्न अंतर्मुख करणारा आहे. असे अनेक प्रदीप या पुस्तकात आहेत. सत्यार्थी प्रदीपची गोष्ट सांगताना तशाच प्रसंगांना सामोऱ्या गेलेल्या अन्य मुलांच्या गोष्टीही सांगतात. एक विषय सर्वार्थाने आणि सर्वांगाने वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. विषयाचं गांभीर्य अंगावर येतं, तरी आपण कादंबरीच वाचत आहोत असं वाटत राहतं. प्रत्येक अनुभवकथेतील नायक-नायिका वेगवेगळे असले तरी ‘भाई साहब जी’ म्हणून सत्यार्थीच आपलं बोट धरून पुढे नेतात.

समस्या विस्तारानं मांडत तिचं विश्लेषण करणं, ती सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं सखोल विवेचन करणं, समस्या व्यापक पटलावर म्हणजे जागतिक व्यासपीठावर घेऊन जात तिचं उत्तर शोधणं, अशी टप्प्याटप्प्याने मांडणी करत त्यांनी या सर्व कथा फुलवल्या आहेत. प्रदीपची कथा सांगताना प्रत्येक धर्म मुलांना कसं महत्त्व देतो, कोणत्याही धर्मात मुलांच्या छळाला कसा थारा नाही, उलट त्यांच्या सुरक्षिततेचा, विकासाचा, शिक्षणाचा कसा आग्रह धरला आहे, हे ते पटवून देतात. दुरभिमान, अज्ञान, खुळचट भावना आणि हिंसक वृत्ती यामुळे धर्माचा आणि परंपरेचा आधार घेत काही लोक मुलांचं शोषण करतात, हे ते अधोरेखित करतात. मुलांशी बोलताना जात, धर्म, गरिबी, श्रीमंती अशा अनेक कारणांनी विभागलेल्या समाजाचं सत्यार्थी अनेक प्रसंगी विवेचन करतात. ते मुलांना समजेल अशा भाषेत सांगतात. उदाहरणार्थ, सामाजिक सुरक्षा कार्यक्रम, लोकांचा विकास, मानव अधिकार आणि गुन्हेगारी यांचा परस्परसंबंध विशद करताना अत्यंत सोपी उदाहरणं देतात. जसं, मध्यान्ह भोजन आणि रोजगार हमी योजना या सामाजिक सुरक्षा योजना आहेत, तर बालमजुरी आणि बालविवाह हे गुन्हे आहेत. शिक्षण हा आपला अधिकार आहे.

हरियाणातील दगडांच्या खाणीत वेठबिगार म्हणून डांबून ठेवलेल्या मुलांची सुटका करून त्यांना परत घेऊन येतानाचा प्रसंग सत्यार्थी एखाद्या पटकथेसारखा सांगतात. त्याचे अगदी बारीक-सारीक तपशील देतात. ओटीटीवरचा एखादा ‘अ‍ॅक्शन पॅक्ड’ सिनेमा पाहिल्यासारखं वाटत राहतं. अशा घटना सांगत असतानाच सामाजिक विषमता, दारिद्रय़ आणि भयाण वास्तव यावर ते भाष्य करतात.

एका बचाव मोहिमेनंतर दगडाच्या खाणीतून सुटका केलेल्या मुलांना सत्यार्थी गाडीतून घेऊन येत असतात. भेदरलेल्या मुलांना सत्यार्थी आपले नवीन मालक वाटतात आणि ती अधिकच घाबरतात. त्यांना भूक लागलेली असेल आणि आपण मदत करण्यासाठी आलो आहोत हे त्यांना समजावं, म्हणून सत्यार्थी त्यांना गाडीतली केळी घ्यायला सांगतात. प्रत्येक जण जरा घाबरत घाबरतच एक एक केळं घेतो. एक मुलगी केळं हातात घेत ते उलट सुलट करून त्याकडे विस्मयकारक रीतीने बघत राहते. इतर मुलांच्या हातातल्या केळय़ांकडे पाहते आणि म्हणते, ‘‘असा कांदा मी आधी कधीच पाहिला नाही.’’ दुसरा एक मुलगासुद्धा आपल्या हातातील केळं बघत म्हणतो, ‘‘आणि हो, हे बटाटय़ासारखं पण दिसत नाही.’’  हे ऐकून सत्यार्थीनासुद्धा खूप आश्चर्य वाटतं. या मुलांनी त्याआधी केळं कधी पाहिलेलंच नसतं! काही मुलं सालीसकटच केळं खाण्याचा प्रयत्न करतात, काही ते तसंच गिळतात, तर काही ते आपल्या हातावर थुंकून लपवण्याचा प्रयत्न करतात. हजारो वर्ष मागे गेल्यावर समाजाचं जसं चित्र दिसलं असतं, तसं ते त्यांना पाहायला मिळतं. यावर सत्यार्थी यांनी केलेलं भाष्य अत्यंत मार्मिक आहे. ते म्हणतात, ‘साल न काढलेलं केळं खाणं आणि साल काढलेलं केळं खाणं यातील फरक म्हणजे गुलामगिरी आणि स्वातंत्र्य यातील अंतर आहे.’ याच खाणीतून मुक्त केलेल्या देवळी या मुलीने विचारलेला ‘‘तुम्ही लवकर का नाही आलात?’’ हा प्रश्न कायद्यावर विश्वास असणाऱ्या, संविधान, मानवाधिकार, स्वातंत्र्य, मानवता, समानता आणि न्याय यांचा धोशा लावणाऱ्या प्रत्येकासाठी आहे, असं ते म्हणतात.

‘बचपन बचाव आंदोलन’ चालवत असलेल्या बाल आश्रमात शिक्षण घेत असणाऱ्या याच देवळीने २००८ साली दिल्लीमध्ये भरलेल्या शिक्षण हक्क परिषदेत मुलांचं प्रतिनिधित्व केलं. कार्यक्रम संपल्यानंतर सत्यार्थीना तिने जे विचारलं ते अंतर्मुख करणारं होतं, समाजपरिवर्तनाचं काम करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी आणि शासकीय संस्था यांच्या डोळय़ात अंजन घालणारं होतं. ‘‘मी खरं बोलले तर चालेल का? मला वाटतं ही सगळी मंडळी एकत्रितपणे काम करत नाहीत. ते फक्त त्यांच्या संस्थेने काय काम केलं हे सांगत सुटले आहेत. कदाचित ते कोणालाच जबाबदार नाहीत. आणि म्हणूनच अजूनही लाखो मुलं बालमजुरीत आहेत आणि हे अधिकारी फक्त बोलण्यात आणि भाषण देण्यात गर्क आहेत.’’

या पुस्तकात भेटणाऱ्या देवळी, साबो, भावना, कालू, अश्रफ या मुलांनी उपस्थित केलेले असे अनेक प्रश्न सत्यार्थी आपल्यासमोर उभे करतात आणि काही वेळा बालिश वाटणाऱ्या अशा प्रश्नांमधून काही महत्त्वाच्या मुद्दय़ांवर बोट ठेवण्याचा सतत प्रयत्न करतात. हीच देवळी शिक्षणासंदर्भात तिचं मत व्यक्त करण्यासाठी सत्यार्थीसोबत संयुक्त राष्ट्र संसदेच्या सर्वसाधारण सभेत गेली असताना तिथल्या सर्व प्रमुख व्यक्तींच्या भोवती असणारा रक्षकांचा, पोलिसांचा गराडा पाहून म्हणते, ‘‘मला एक सांगा, आपण या लोकांपेक्षा बरे आहोत ना? निदान आपल्याला मोकळेपणाने फिरता तरी येतं. हे जर जागतिक पुढारी असतील तर यांना कोणाला भिण्याचं कारण काय?’’

कैलाश सत्यार्थी यांच्या कामाची, त्यांनी केलेली आंदोलनं, पदयात्रा, बालाश्रम यांची ओळख या अनुभवांमधून होतेच; पण त्या संदर्भात जगभर काय काम चाललं आहे, याचीही माहिती मिळत जाते. गोष्टीतली मुलं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आत्मविश्वासाने आपलं मत मांडताना दिसतात. त्यांच्या बोलण्याचा परिणाम दूरगामी योजना आणि कायदे बनवण्यात झालेलाही आपल्याला पाहायला मिळतो. दिल्लीतील आयएएस अधिकाऱ्याच्या घरी काम करणाऱ्या आणि शारीरिक-मानसिक िहसेला बळी पडलेल्या अश्रफला सोडवल्यानंतर त्या अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी धर्माचे ठेकेदार कसे उभे राहतात, हे सांगत असताना सत्यार्थी गयामधल्या सलमाची तशीच गोष्ट सांगतात. राजकीय पुढारी आणि धार्मिक नेते यांचं साटंलोटं कसं असतं, हे दाखवतात. याच प्रकरणामुळे बालमजुरी कायद्याला आणखी सक्षम करून घरकामासाठी मुलांना ठेवता येणार नाही आणि कायदा मोडणाऱ्यांना तीन महिने कारावास आणि दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे, याचा उल्लेखही दिसतो.

सर्कसमध्ये काम करणाऱ्या सपना आणि इतर मुलांची सुटका आणि पुनर्वसनाची कथा सांगताना या व्यवसायातील गुंडगिरी, दडपशाही तसंच मुलांचं शारीरिक, लैंगिक आणि भावनिक शोषण यांचं विदारक चित्र लेखक आपल्यासमोर मांडतात. या प्रकरणामुळे पुढे न्यायालयाने दोन महत्त्वाचे निर्णय दिले. एक मानवी वाहतुकीसंदर्भात आणि दुसरा बालमजुरीसंदर्भात. ज्याचे रूपांतर अधिक सक्षम कायदे करण्यात कसे झाले याचीही विस्तृत माहिती यासोबतच मिळत जाते.

मसाहार या उंदीर मारणाऱ्या जातीत जन्मलेल्या मेधापूर, बिहार येथील कालूची सुटका जरीकाम उद्योगातून करण्यात आली. बालआश्रमात काही काळ राहून शाळेत जाणाऱ्या कालूला लेखक अमेरिकेतील एका कार्यक्रमासाठी घेऊन जातात. त्या कार्यक्रमात अध्यक्ष बिल क्लिंटन यांना कालू सांगतो, ‘‘मी अत्यंत सुदैवी आहे, कारण माझी वेठबिगारीतून सुटका करण्यात आली. पण जगात आजही २५ कोटी मुलं आहेत, ज्यांची बालमजूर म्हणून पिळवणूक होते आहे. तुम्ही याबद्दल काय करत आहात, हे कृपया मला सांगाल का?’’ कालू पुढे जे सांगतो ते अधिक महत्त्वाचं आहे. ‘‘मला सांगा, बालमजुरी नष्ट करण्यासाठी काही करायचं असेल, तर तुम्हाला अमेरिकेचं अध्यक्ष असावं लागतं का? मला खात्री आहे की या ऑफिसच्या बाहेरसुद्धा तुम्ही आमच्यासारख्या मुलांना मुक्त करण्यासाठी बरंच काही करू शकता.’’

अध्यक्ष क्लिंटन यांचा तो दुसरा कार्यकाळ होता. कालूच्या निर्भीड वक्तव्याचा आणि इतर अनेक प्रयत्नांचा परिणाम म्हणून बालमजुरीच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी एक चांगली गोष्ट झाली. अध्यक्ष क्विंटन यांनी बालमजुरीविरोधी कामासाठी तीन कोटींचा निधी वाढवून १५ कोटी डॉलर्स करण्याची घोषणा केली. असे अनेक परिणाम बाल सक्षमीकरणाच्या या प्रवासात घडलेले दिसतात.

खेडय़ापाडय़ांतून अत्यंत बिकट परिस्थितीत जगणाऱ्या मुलांची सुटका झाल्यावर त्यांनी शिक्षण घेत बालमजुरी आणि शोषण यांच्या विरोधातील आंदोलनात सहभाग घेतलेला आपल्याला दिसतो. मोठं झाल्यावर चांगलं आयुष्य जगणारी मुलं जशी आपल्याला या अनुभवकथांत दिसतात, तशीच लौकिक अर्थाने यशस्वी न झालेली मुलंसुद्धा या पुस्तकात आहेत. पण प्रत्येकाच्या आयुष्यातील गुलामगिरी, शोषण नष्ट झालेलं आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची उमेद जागृत झालेली दिसते. याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या प्रत्येक कामातून मुलांना सामाजिक समतेचा विचार देण्याचा कटाक्ष ‘बचपन बचाव’ने पाळलेला दिसतो. २०११ मध्ये निघालेल्या ‘मुक्ती कारवा’मधील घोषणा, गाणी याचेच द्योतक आहे.

अश्रफ, नंदी, सलमा, भावना, कालू, देवळी.. अनेक मुलांच्या कहाण्या अत्यंत प्रभावी आणि ओघवत्या भाषेत लिहिल्या आहेत. त्या वाचताना वाचक कधी भावनिक होतो, तर कधी त्याला चीड येते. एक समाज म्हणून आपण इतके स्वार्थी आणि संवेदनाहीन कसे काय असू शकतो? आपल्या मुलांना असे कसे काय वागवू शकतो? असं वाटत राहतं. या पुस्तकातल्या मुलांच्या पलीकडे असणारी अनेक अपरिचित मुलं आठवत राहतात. रेणू गावस्करांच्या ‘आमचा काय गुन्हा?’ या अशाच प्रकारच्या अनुभवकथनातली विजय, महेंद्र, सुनील, मुन्ना, अर्जुन, नारायण अशी डेव्हिड ससून बालगृहातली मुलं साद घालू लागतात. दर १० लग्नांपैकी दोन-चार बालविवाह असतात. एक कोटीपेक्षा अधिक मजुरी करत आहेत. चार कोटी मुलं शाळेच्या बाहेर आहेत आणि सव्वा लाखापेक्षा अधिक मुलं मानवी तस्करीला बळी पडतात.. आकडेवारी डोळय़ांसमोर नाचू लागते. आणि वाटतं, खरोखरच आपल्याला उशीरच झाला आहे!

व्हाय डिडन्ट यू कम सुनर?

लेखक – कैलाश सत्यार्थी

प्रकाशक – स्पीकिंग टायगर

पृष्ठे – २७०, किंमत –  रु. ३९९/-

लेखक विप्ला फाउंडेशनचे सीईओ असून बाल आणि महिला विकास क्षेत्रात चार दशके सक्रिय आहेत.

pnigudkar@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Book review why didn t you come sooner by kailash satyarthi zws

First published on: 09-12-2023 at 03:40 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×