‘नकोसे झालेले लोक’ हे संपादकीय (१९ ऑगस्ट) वाचल्यावर स्वत:ला माणूस म्हणून घेण्याची लाज वाटली. आपल्याकडे चार वर्णामधला शेवटचा वर्ण ‘शूद्र’ म्हणून ओळखला जातो. वर्णव्यवस्थेच्या भेदभावाला आज कायद्याची मान्यता नसली तरी तथाकथित उच्चवर्णीय भारतीयांच्यात तो इतका भिनला आहे की त्या विकृतीचे दर्शन आपल्याला वारंवार अगदी हिंसक पद्धतीनेसुद्धा पाहायला मिळते. शिक्षकांच्या मडक्यातले पाणी प्यायला म्हणून एका दलित विद्यार्थ्यांला शिक्षकाने मारण्याची घटना ताजी आहे.
पण या कथित शूद्रांच्यात आणखी एका वर्णाचा समावेश आपल्याला करावा लागेल. तो म्हणजे इस्लामी जनता. मुस्लिमांबद्दलचा हा वर्णभेद जागतिक आहे. अमेरिका, चीन, इस्रायल, भारत तसेच अनेक युरोपीय देश अशा अनेक देशांत या रोगाचा आढळ होताना दिसतो. जणू काही प्रत्येक मुस्लीम जन्मत:च गुन्हेगार असतो अशा तऱ्हेच्या कल्पना जनसामान्यांत इतक्या खोलवर रुजल्या आहेत की प्रत्येक मुस्लिमाकडे आपण संशयाने पाहायला हवे; त्यांना नोकऱ्या, शेजारच्या घरात राहायला जागा अशा साऱ्या सुविधा देणे टाळावे; आपल्या मुलाने किंवा (विशेषत:) मुलीने मुस्लीम व्यक्तीबरोबर लग्न करायचे ठरवले तर साऱ्या कुळाला बट्टा लागला; त्यासाठी मुलाला घराबाहेर काढले पाहिजे; किंवा ऑनर किलिंग केले पाहिजे अशा कल्पना इथे ठाम रुजल्या आहेत. एरवी सभ्य आणि सुसंस्कृत भासणारी माणसे मुस्लिमांबद्दल बोलू लागतात तेव्हा त्यांच्यात जणू काही सैतान संचारला आहे की काय असे वाटायला लागते. ऐकीव माहिती आणि काही सुटी उदाहरणे यांच्या साहाय्याने माणसे सरळसरळ सुतावरून स्वर्ग गाठतात. हे सगळे पाहून मन विषण्ण होते आणि आता तर भाजपच्या जोडीने आम आदमी पक्षानेदेखील या मुस्लिमद्वेषाच्या धगधगत्या कुंडात उडी घेतली आहे. रोहिंग्यांना दिल्लीत घरे देऊ नयेत, त्यामुळे दिल्लीकरांना धोका आहे; वाटल्यास भाजपने आपले शासन असलेल्या राज्यात रोहिंग्यांना राहायला जागा द्यावी असे वक्तव्य आप पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी केले आहे. (अर्थात दिल्लीतसुद्धा रोहिंग्यांना वसवले जाणार नाही असे गृहखात्याने स्पष्ट केल्याने सगळा वाद संपला आहे. भाजप आपल्या द्वेषाच्या संस्कृतीला पूर्णपणे जागला आहे.)
– अशोक राजवाडे, मुंबई</p>
‘फेसलेस’ ते ‘ब्रेनलेस’
‘मनमानी कारभाराबद्दल न्यायालयाने आयकर खात्यालाच दंड लावला’ ही बातमी वाचली. भोंगळ आणि मनमानी कारभाराबद्दल आयकर आणि जीएसटी खाते यांच्यात जणू तीव्र स्पर्धा सुरू आहे. एका करदात्यांच्या प्रकरणामध्ये त्यांच्या भाडय़ाने दिलेल्या जागेचे भाडे त्यांच्या राहत्या घरासाठीदेखील मिळाले आहे असे दाखवून मोठी डिमांड काढली गेली. दुसऱ्या एका प्रकरणामध्ये भागीदारी संस्थेला वैयक्तिक करदाता समजून त्यातून उद्भवणाऱ्या तथाकथित कारणांमुळे त्यांचे रिटर्न सदोष असल्याचे कळवले गेले. असे असंख्य प्रकार सीए आणि करसल्लागारांना रोज अनुभवास येत आहेत. सध्याचा कहर म्हणजे करदात्याच्या टॅक्स रिटर्नमध्ये रिफंड निघाला असेल तर, त्याला कधीच कळवल्या न गेलेल्या अनेक वर्षांच्या चुकीच्या थकबाक्या त्याच्या नावासमोर अचानक जन्मास येत आहेत. एका जेष्ठ नागरिक महिलेने वर्ष २०२१-२२ साठी रिफंड मागितला असता त्यांना चक्क २००५-०६ सालाची, कुठलाही आगापिछा न सांगितलेली, एक थकबाकी तुमच्या या रिफंडसमोर वळती करत आहोत असा मेल आला. आयकर खात्याच्या बव्हंशी सर्वच बिनचेहऱ्याच्या (फेसलेस) सुनावण्या आणि अन्यही बिनचेहऱ्याच्या कार्यवाह्या अनाकलनीय होत असून करदात्यांना प्रचंड मनस्ताप देणाऱ्या ठरत आहेत. खात्याने केलेल्या चुकांच्या दुरुस्त्यांसाठी अर्ज केले, तरी आवश्यक त्या दुरुस्त्या अनेक होत नाहीयेत. सुनावण्या पूर्ण झालेली अपिले कमिशनर ऑफिसेसमध्ये अनेक वर्षे निकालाविना पडून आहेत. हे ‘फेसलेस’ प्रकरण आता ‘ब्रेनलेस’ही झाले आहे.
– उदय कर्वे, डोंबिवली (लेखक व्यवसायाने सीए आहेत)
मुळात जखमी होऊ नये यासाठी काय करणार?
या देशातील दहीहंडी या पुरातन खेळाला साहसी खेळ म्हणून मान्यता दिली ही स्वागतार्ह गोष्ट आहे. मात्र कोणत्याही खेळात खेळाडू मृत्युमुखी पडला तर त्याला काय रक्कम मिळेल हे सांगण्यापूर्वी तो अपघात झाला तरी मृत्युमुखी पडणार नाही किंवा जखमी होणार नाही यासाठी नियम आणि त्याची कार्यवाही अनिवार्य असते. म्हणजे सर्कसमध्ये असते तशी जाळी प्रत्येक दहीहंडीभोवती असणे अनिवार्य करावयास हवे.
– दत्तप्रसाद दाभोळकर, सातारा</p>
हा तर राजकारणाचा साहसी खेळ
कुठलाही खेळ असतो त्याला नियम असतात, त्याच्या स्पर्धा असतात, खेळाचा नियमित सराव करतात. ‘दहीहंडी’ हा प्रकार ‘खेळ’ यात बसवता येत नाही, तरीही ‘साहसी खेळ’ असे गोंडस नाव देऊन राज्य सरकारने मोठी चूक केली आहे. हा खेळ खेळणाऱ्या तरुणांना सरकारी नोकरीत आरक्षण घोषित करून आणखीन गोंधळ वाढणार आहे. तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर हंडीचे महासंघ होतील, त्यात राजकारण होईल, आरोप होतील आणि सगळा सावळा गोंधळ होणार हे नक्की.
– सुधीर केशव भावे, जोगेश्वरी पूर्व, (मुंबई)
‘हिंदू राष्ट्रवाद’ हिंदूंनाही अपमानास्पद!
‘हिंदू राष्ट्र सर्वसमावेशकच!’ (१९ ऑगस्ट) हा रवींद्र माधव साठे यांचा लेख वाचून उबग आला. याच सदरातील एका लेखात (इथे फक्त भारतीय संस्कृतीच!, १ एप्रिल) साठे यांनी असा दावा केला होता- ‘भारत किंवा हिंदूस्थान हे जर एक राष्ट्र आहे तर इथे संमिश्र संस्कृतीची गोष्ट करणं हे पूर्णत: अशास्त्रीय आहे.’ त्यासाठी त्यांनी रासायनिक मिश्रणाचा दाखला दिला होता. ‘हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येतात तेव्हा हायड्रोजन आपले हायड्रोजनत्व विसरतो आणि ऑक्सिजन आपले ऑक्सिजनत्व. दोघेही एकरूप होऊन त्याचे जल बनते.’ अशा वेळी ‘संमिश्रतेची बाब शिल्लक राहत नाही.’ पण ‘हिंदू राष्ट्र सर्वसमावेशकच!’ या ताज्या लेखात मात्र ते म्हणतात, ‘हिंदू समाज हा या राष्ट्राचा कणा आहे. या समाजानेच या भूमीला स्वत:च्या जातीचे नाव देण्यात आणि ते टिकवून ठेवण्यात यश मिळविले आहे. त्यास भरतभूमी म्हणा, भारत म्हणा किंवा इंडिया म्हणा; यापैकी कोणतेही एक नाव घेतले की डोळय़ासमोर हजारो वर्षांच्या हिंदू समाजाच्याच घडामोडींचा इतिहास उभा राहतो!’ साठे (किंवा ते महासंचालक आहेत ती रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी किंवा त्यांच्याशी संलग्न रा. स्व. संघ, इतर संबंधित संघटना, त्यांचा राजकीय प्रतिनिधी भाजप) यांच्या डोळय़ासमोर उभा राहणारा इतिहासच खरा, हे यात गृहीत धरलेले आहे. शिवाय, एकीकडे ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांनी आपापले स्वत्व विसरून जलरूपात एकत्र होणे, ही राष्ट्रीयत्वाची उपमा साठे देतात. पण प्रत्यक्षात ‘हिंदू राष्ट्रवाद’ म्हणताना हिंदू हा ‘एक’, ‘वेगळा’ समाज, ‘जात’ म्हणून गृहीत धरून या समाजाने स्वत:चे नाव या भूमीला दिले, असेही म्हणतात. म्हणजे राष्ट्रीयत्वाचे अमूर्त पाणी ‘हिंदू’ आहे, आता बाकीच्या ‘समाजां’नी स्वत:ला ऑक्सिजन, हायड्रोजन किंवा इतर जे मानायचे ते मानावे! स्वत: साठेच ताज्या लेखात म्हणतात, ‘या देशाच्या प्राचीन परंपरेविषयी ज्यांना आपुलकी वाटते अशा कोणाही व्यक्तीला ‘हिंदू’ या शब्दावर सारखाच दावा सांगण्याचा अधिकार आहे, असे हिंदूत्व मानते.’ पाणी निर्माण होतानाच्या रासायनिक संमिश्रणात ऑक्सिजन किंवा हायड्रोजन यांचे जे होते, तसे काहीच करायची जबाबदारी हिंदू राष्ट्रवादामध्ये हिंदूंवर दिलेली नाही, बाकीच्यांनी मात्र त्यांचे ‘ऑक्सिजनत्व’ आणि ‘हायड्रोजनत्व’ विसरावे.
हिंदू राष्ट्रवादामध्ये हिंदूंवर कोणती जबाबदारी आहे, याचा थांग साठय़ांच्या कोणत्याच लेखातून लागत नाही, हे स्वाभाविकच आहे. कारण हिंदूंनी फक्त या भूमीला स्वत:चे नाव देणे त्यांच्यासाठी पुरेसे आहे. त्यांना स्वत:ची आपुलकी सिद्ध करायची गरज नाही. इतरांनी मात्र सतत आपली आपुलकी सिद्ध करायला हवी.
साठे यांनी याच सदरातल्या एका लेखात (राष्ट्राची चिरजीवन शक्ती: चिती, १८ फेब्रुवारी) म्हटले होते, ‘राष्ट्र बनण्यासाठी एका विशिष्ट भूमीची आवश्यकता असते हे खरे, परंतु त्यावरील नदी, पहाड, मैदान, वृक्ष वा निर्जीव वस्तूंचे राष्ट्र बनत नाही. राष्ट्र बनण्यासाठी त्या देशात राहणाऱ्या लोकांच्या हृदयात, त्या भूमीविषयी (देशाविषयी) असीम श्रद्धा असावयास हवी.’ इतका वरवरचा विचार मान्य केला तर, ‘जल, जंगल, जमीन’ याबद्दल, म्हणजे पर्यायाने आपल्या भूमीबद्दल आस्था दाखवणारी, आपुलकी दाखवणारी अनेक आदिवासी समुदायांची भावना आणि प्राचीन परंपरा कशी कळेल? (आणि मग आदिवासी व्यक्ती राष्ट्रपतीपदावर असण्याला तरी काय अर्थ राहील?) नदी, डोंगर, झाडे आणि कित्येक निर्जीव वस्तू आपल्या (कोणत्याही धर्मीय किंवा निधर्मीय) जगण्याशी घनिष्ठपणे जोडलेल्या असतात, याबद्दल आस्था नसलेला; ‘हिंदू समाजा’व्यतिरिक्त इतर ‘ऑक्सिजनरूपी’, ‘हायड्रोजनरूपी’ समाजांना सतत राष्ट्रीयत्वाच्या ‘जला’विषयी आपुलकी सिद्ध करायला लावणारा, किंवा आपल्या निकषानुसार ही आपुलकी दिसली नाही तर संबंधितांना ‘राष्ट्रद्रोही’ ठरवणारा, तथाकथित हिंदू राष्ट्रवाद हिंदूंना काय देतो? ‘राष्ट्र ही भावात्मक संकल्पना’ असली तरी या भावात्मकतेचे मूर्त आधार कोणते? मूर्त रूपात आपल्या अवतीभवती दिसणारी मानवेतर सृष्टी (नदी, झाडे, अनेक निर्जीव वस्तू, इतर पशू) आणि अर्थातच ‘इतर’ माणसे, यांच्याकडे पाहण्याची जगण्याच्या पातळीवरील हिंदू दृष्टी इतकी संकुचित आहे का? लोकांच्या जगण्यात स्वत:व्यतिरिक्त इतर सृष्टीविषयी इतकी ठळक वगळणुकीची भावना असते का? तसे असेल तर साठय़ांच्या लेखांमधून मांडलेला ‘हिंदू राष्ट्रवाद’ आणि ‘हिंदूत्व’ समर्थनीय ठरेल, तसे नसेल तर ‘हिंदू राष्ट्रवाद’ आणि ‘हिंदूत्व’ (म्हणजे या नावाखाली उभी असलेली राजकीय विचारसरणी) खुद्द हिंदूंनाही अपमानास्पद वाटायला हरकत नाही.
– अवधूत डोंगरे, रत्नागिरी</p>