देशच नाही तर जगातले मातब्बर आतुरतेने वाट बघत होते त्या प्राणप्रतिष्ठ सोहळय़ाचे निमंत्रण मिळूनही एकनाथ शिंदे अयोध्येला गेले नाहीत अशी वावडी उठवण्याचे काही कारण नाही. ते आधी जातो म्हणाले हे खरे, पण नंतर त्यांच्या लक्षात आले ‘अरे आपला स्वभाव तर सर्वाना सोबत घेऊन चालण्याचा. मग ते सुरत असो वा गुवाहाटी. मग एकटे कसे जाणार? त्यातही ज्यांच्या खांद्यावर आपली भिस्त आहे त्या देवेंद्रभाऊंनाच निमंत्रण नाही. त्यांना मागे ठेवून कसे जायचे? त्यापेक्षा आता न जाता थोडी कळ सोसणे केव्हाही उत्तम’ या उदात्त विचारातून त्यांनीही पहिल्या खेपेची वारी टाळली. तसेही त्यांना निमंत्रण होते ते पक्षप्रमुख म्हणून. याच पद्धतीचे निमंत्रण अजितदादांना पण होते म्हणे! सत्तेत राहूनही माझा विचार वेगळा असा राग सतत आळवणारे व याच कारणावरून रेशीमबागेची भेट टाळणारे दादा यावर चकार शब्द बोलले नाहीत. तेआणि नागपूरचे भाऊही जाणार नाहीत, मग एकटय़ाने जाऊन सहा हजारांच्या गर्दीचा भाग होण्यात काय हशील असा विचार एकनाथरावांनी केला असेल तर ते योग्यच म्हणायचे की!
विचार वेगळे, पक्ष वेगळे तरीही एकाच सरकारात सामील झाल्यावर किमान त्यात तरी एकसंधता दिसावी असा व्यापक विचार मुख्यमंत्र्यांनी नाही तर आणखी कुणी करायचा? जायला मिळाले नाही म्हणून त्यांनी ठाण्यात राहून रागारागाने ढोल बडवला असला करंटा विचार हे विरोधकच करू शकतात. अयोध्येतील स्वप्न साकार झाल्याच्या आनंदात त्यांनी जोरजोरात ढोल वाजवला हेच खरे! मुख्यमंत्री आता अख्खे मंत्रिमंडळच घेऊन जाणार आहेत म्हणे. मंत्रिमंडळ म्हटले की त्यात दादा, भाऊंसकट सर्वच आले. मुख्यमंत्र्याचा आदेश म्हटल्यावर तो दादांनाही टाळता येणार नाहीच. यातून जो एकतेचा संदेश जाईल तो केवळ सरकारच नाही तर राज्यातील जनतेसाठी हिताचा. सर्व सहकाऱ्यांसह स्वतंत्रपणे रामलल्लाचे दर्शन घेत दिवसभरासाठी माध्यमात जागा मिळवणे हे सोपे काम नाही. ते शिंदेंच्या नेतृत्वात होत असेल तर स्वप्नपूर्तीचा खरा आनंद हाच. त्यांच्याच काही सहकाऱ्यांना कामाख्या पावली नाही. म्हणजे इच्छा असूनही काहींना लाल दिवा मिळाला नाही. सत्ता आल्यामुळे काहींवरील गैरवर्तनाचे किटाळ तूर्त टळले पण संपूर्ण मुक्ती मिळाली नाही. काहींना संभाव्य पराभवाची भीती सतावतेय. या साऱ्यांच्या चिंता दूर करण्यासाठी स्वतंत्र अयोध्यावारी हाच उपाय हे चाणाक्ष शिंदेंनी बरोबर हेरले. कामाख्येमुळे अपात्रतेचे मळभ दूर झाले. आता उरलीसुरली उबाठा संपवायची असेल तर सामूहिक उपासना महत्त्वाची असा दूरदृष्टीचा विचार करूनच त्यांनी हा नवा बेत जाहीर केला हेच सत्य. फक्त तो तडीस नेण्यासाठी त्यांना थोडी घाई करावी लागेल. म्हणजे सतत त्यांच्या पाळतीवर असलेल्या उबाठाने अयोध्यावारी करण्याआधी त्यांना शरयूतीर गाठावा लागेल. अर्थात अशी मात देण्यात ते तरबेज झालेच आहेत म्हणा! त्यामुळे विरोधकांनी आता तरी एकनाथरावांची चिंता करणे सोडून द्यावे.