‘‘मानसशास्त्र कशाला घेतोस? तो मुलींचा विषय(!).. तू अर्थशास्त्र घे’’- यासारखा थेट महिलाविरोधी ठरणारा सल्ला देऊ शकणाऱ्या एखाद्या महाविद्यालयातील पंतोजीछाप प्रिन्सिपॉलांपासून डॅनिएल कानेमान हजारो किलोमीटर दूर होते हे खरे आणि याच कानेमान यांची ख्याती ‘मानसशास्त्राचे नियम अर्थशास्त्राला लावून ‘वर्तनवादी अर्थशास्त्रा’चा अभ्यासप्रवाह खुला करण्यासाठी अर्थशास्त्रातल्या ‘नोबेल पारितोषिका’चे, २००२ मधले एक मानकरी’ अशीच त्यांच्या मृत्यूनंतरही राहणार आहे हेही खरे; पण समजा, हा असला सल्ला विद्यार्थीदशेत डॅनिएल कानेमान यांना ऐकावा लागला असता, तरी तो देणाऱ्यांच्या पूर्वग्रहांचा साधार ऊहापोह त्यांनी केला असता! धर्माने ज्यू, जन्म इस्रायलचा- वयाच्या दहाव्या वर्षी ‘धर्म आणि मानव’ हा निबंध अत्यंत गांभीर्याने लिहिण्याएवढी बुद्धिमत्ता असणारे आणि पुढल्या काळात ‘लक्ष देणे आणि प्रयत्न करणे यांमध्ये काहीही फरक नाही’ अशा अर्थाचा सिद्धान्त मांडून शिकण्याच्या प्रक्रियेचे लोकशाहीकरणच करणारे डॅनिएल कानेमान यांनी अवघे आयुष्य असे व्यतीत केले की, त्यामुळे त्यांनीच मांडलेले एक महत्त्वाचे निरीक्षण खोटे पडावे!
‘माणसे विवेकीपणे विचार करतातच असे नाही’ हे ते निरीक्षण! अर्थात, सर्वसाधारण निरीक्षण म्हणून ते किती खरे ठरते याची प्रचीती आपल्याला येतच असते. किंबहुना कानेमान यांनी जे ‘सिद्धान्त’ म्हणून मांडले, ते अनेकांना एरवीही माहीतच असते.. पण सिद्धान्ताचे शास्त्रीय कोंदण या निरीक्षणाला देताना कानेमान यांनी जे अनेक प्रयोग केले, ते करण्याचे कोणालाही सुचलेले नसते. हेत्वाभास (फॅलसी) आणि प्रणालीय विरूपण (सिस्टमॅटिक एरर) यांनाच ‘विचारां’त स्थान दिल्यामुळे बुद्धीच्या वापराचा प्रयत्न दरवेळी विवेकी असतोच असे नाही, हे या सिद्धान्तामागचे तत्त्व. पुढे हे निरीक्षण आर्थिक निर्णयन- प्रक्रियेलाही कसे लागू पडते, याचा अभ्यास कानेमान यांनी सुरू केला. या प्रकारच्या अभ्यासात त्यांना अॅमोस ट्वेस्र्की यांची साथ लाभली. हे ट्वेस्र्की १९९६ मध्ये वारले; तर कानेमान परवाच्या २७ मार्च रोजी.
वाचनाची- विचार करण्याची आवड असलेल्या अनेकांना डॅनिएल कानेमान यांचे नाव आधीपासून माहीत असते ते ‘थिंकिंग फास्ट अॅण्ड स्लो’ या पुस्तकाचे लेखक म्हणून. हे खूपविके पुस्तक अगदी मुंबई-पुण्याच्या पदपथांवरही विकले जाते, इतका त्याचा वाचकवर्ग. पण ‘नेता किती योग्य निर्णय घेतो, यापेक्षा तो कसा कणखर आहे हेच लोकांना आवडते’ असे मत मांडणाऱ्या कानेमान यांना ‘गाजले म्हणून विकत घेतलेले पुस्तक लोक वाचतील, त्याप्रमाणे वागतील असेही नाही’ हेही ठाऊक होते!