‘तुम्ही शांत व्हा आधी. अरे, तुमचा बाप समोर बसलाय. किमान त्याचा तर आदर बाळगा. मी काय चॅनलचा माइक घेऊन उभा आहे काय? ज्येष्ठांचा मान राखावा ही परंपराही ठाऊक नाही काय तुम्हाला? लहानपणी केलेले संस्कार (हा शब्द ऐकताच दोघेही चमकून एकमेकांकडे आश्चर्याने बघतात) एवढ्या लवकर विसरलेत का?’ वडिलांचा रुद्रावतार बघून कणकवलीच्या घरात तूतू-मैमै करणारे दोघेही भाऊ शांत झाले. तरीही त्यांचे एकमेकांकडे रागाने बघणे सुरूच होते. त्याकडे दुर्लक्ष करत वडील बोलू लागले. ‘अरे, कसे दिवस काढलेत आपण ते आठवा जरा. आधी सेनेत, मग काँग्रेसमध्ये, नंतर स्वत:चा पक्ष व आता कुठे भाजपमध्ये. सत्तेसाठी सुरू झालेला हा प्रवास आता कुठे स्थिर होत असताना तुम्हीच दोघे भांडता? असे कराल तर गमावून बसाल पुन्हा सारे.’ मग लहान्याकडे वळून ते म्हणाले. ‘काय गरज होती तुला सगळ्यांचा बाप एकच म्हणण्याची? पक्ष वाढव ना. मित्रपक्षाला कशाला अंगावर घेतो? आणि तू रे (मोठ्याकडे वळत) प्रत्युत्तर दिलेच कशाला? बघतील ते शिंदे. आहेत त्यांच्याकडे वाचाळ नेते.’

क्षणभर थांबून ते लहान्याला म्हणाले. ‘आणि हे टॅक्स फ्री काय? मोठ्याला सारे आयतेच मिळाले असे सुचवायचेय काय तुला? अरे, तो पहिला खासदार आहे घराण्यातला. तेव्हा तर तू बच्चा होतास. विरोधकांना फायदा होईल असे बोलू नको एवढेच म्हटले ना त्याने. मग पुन्हा डिवचायची काय गरज होती? ते तिकडे आदित्य व अमित एकत्र येण्याच्या गोष्टी करताहेत व तुम्ही भांडायला बसलात. आणि तू (मोठ्याला) एक लक्षात ठेव. शिवसेना हे आपले तात्पुरते घर. आपले सर्वांचे भविष्य भाजपमध्येच उज्ज्वल आहे. तिथे जेवढ्या वेगाने पुनर्वसन होते तेवढे कोणत्याच पक्षात होत नाही. त्यामुळे तिथे वावरताना ‘लो प्रोफाइल’ राहायचे. तुम्ही दोघांनीही पोस्ट डिलिट केल्या हे चांगले झाले. मोठ्याचे स्पष्टीकरणही मला आवडले. आता असले वाद नको. तुम्हाला काही बोलायचे आहे का?’ हा प्रश्न ऐकताच लहान्या ताडकन म्हणाला. ‘मी पक्ष वाढवण्यासाठी स्वत:ला झोकून दिलेले. आक्रमकपणेच तो वाढू शकतो व भविष्यात याचा फायदा यालाच मिळेल. हे हा लक्षात घेत नाही. माझ्या पक्षावर टीका करण्यापेक्षा त्या मातोश्रीवर करावी ना याने. तिथे का चूप बसतो हा? हा नवा नवा त्या पक्षात गेलाय. मग इतका उत्साह कशाला? गाड्याबरोबर नळ्याची यात्रा हे याने लक्षात ठेवावे. भलेही मोठा असला तरी…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे ऐकताच मोठा भडकला ‘अरे, असशील मंत्री, म्हणून काही लहानाचा मोठा होऊ शकत नाही. चालला मोठा नवहिंदुहृदयसम्राट बनायला. आपली उंची किती, आपण बोलतो किती याचा विचार कर जरा. ते भाजपवाले हुशार. ठेवली तुझ्या खांद्यावर बंदूक. वापरतील व फेकून देतील. त्या तुलनेत शिंदे कधीही चांगले. सच्चा माणूस. कोण कुणाचा बाप हे काळ ठरवेल. तू कशाला मध्ये कडमडतोयस. मोठा आहे म्हणून शांत आहे पण याला कमजोरी समजू नको. एकदा डोक्यात सणक गेली की कुणाच्या बापाला ऐकत नाही मी. आधीच आपल्याला अनेक टोपणनावाने चिडवतात. आता ‘टॅक्स फ्री’ची भर पडेल त्यात.’ हे ऐकून लहान्या उसळला ‘अरे, कसला तुझा पक्ष. बघ येत्या दोन वर्षांत काय हाल होतात त्यांचे.’ हा वाद वाढतोय हे लक्षात येताच वडील उभे राहून जोरात ओरडले. ‘चूप बसा. जावा तुम्ही दोघेही बाहेर.’ दोघेही पाय आपटत निघून जाताच वडील विचारात पडले. भविष्यात महायुतीचे कसे होणार?