‘पांगुळगाडा पुरे!’ हा अग्रलेख (२७ मार्च) वाचला. कुठलेही युद्ध हे सुस्पष्ट आणि कठीण असले तरीही व्यावहारिकदृष्टया साध्य होऊ शकेल असे राजकीय उद्दिष्ट (‘अचिव्हेबल पोलिटिकल गोल’) डोळयांसमोर ठेवून सुरू करावे लागते आणि ते उद्दिष्ट साध्य झाल्यावर थांबवावेही लागते असे युद्धशास्त्रात म्हणतात.  (बेभरवशाच्या शेअरबाजारात उतरताना सुस्पष्ट आर्थिक उद्दिष्ट असावे लागते, आणि ते साध्य झाल्यावर आणखी मोह न बाळगता निग्रहाने बाहेर पडावे लागते, तसेच काहीसे हे आहे. तसे न केल्यास दोन्हींकडे हात पोळतातच.) गाझा असो वा युक्रेन, इराक असो वा अफगाणिस्तान.. ही सारी युद्धे नक्की काय साध्य करण्याकरिता लढली गेली आहेत / जात आहेत हे एक गौडबंगाल वाटते. ती युद्धे सुरू झाली तेव्हा ती काही दिवसातच संपतील असे वाटले होते; परंतु ती वर्षांनुवर्षे चिघळत गेली. असाच इतिहास अगदी व्हिएतनाम युद्धापासून दिसतो. (भारताने १९७१ साली सुरू केलेले व जिंकलेले युद्ध हे अशा अनेक अंगांनी अभ्यासण्याजोगे व वाखाणण्याजोगे आहे.) अफगाणिस्तानमधले युद्ध तर जणू लहान मुलांची उन्हाळी सुट्टीतली  दंगामस्ती सुरू असावी आणि ‘जेवायला लगेच या’ अशी हाक पालकांकडून आल्यावर खेळ सोडून सारी मुले क्षणार्धात पांगावीत, तसे थांबले! त्यांत दोन्ही बाजूंच्या अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त झाली. ‘युद्धकाळात कशाकशांवर हल्ला करायचा नाही याचेही नियम असतात’ असे लेखात म्हटले आहे. ‘तशा’ गोष्टींचा आसरा घेऊन हल्ले करायचे नाहीत हे त्यात अध्याहृत आहे. परंतु युद्धात (व प्रेमात) सारेच क्षम्य असते असाही एक अलिखित नियम आहेच! त्यामुळे एखादा पोरखेळ असावा तशी कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही अशा परिस्थितीत ही युद्धे भरकटत चालली आहेत असे वाटते. साधे मालवाहू जहाज भरकटले तर काय होऊ शकते हे बाल्टिमोरमध्ये नुकतेच दिसले. ही भरकटलेली युद्धे वेळीच आवरली नाहीत तर काय होईल याची कल्पनाही करवत नाही.

प्रसाद दीक्षित, ठाणे</strong>

हेही वाचा >>> लोकमानस : आता कोठे हरवली भाजपची नैतिकता?

आता खरा पेच बायडेन यांच्यासमोरच

‘पांगुळगाडा पुरे’ अग्रलेख वाचला. हमास हा पॅलेस्टाईनमधील बंडखोर समूह आहे; चालू लढाईची सुरुवात त्यांनी केली असली तरी त्याचा बदला म्हणून निरपराध पॅलेस्टिनी नागरिकांची सरधोपट हत्या करत सुटणे आणि वर शहाजोगपणे आम्ही हमासचे समर्थक शोधून काढत आहोत, असे म्हणणे हे जरा अतीच होत आहे. हे केवळ अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे होत आहे हे अर्धसत्य आहे. नेतान्याहूंना देशांतर्गत आपले आसन बळकट करण्याकरता युद्ध चालू ठेवणे गरजेचे वाटत असावे. राष्ट्रसंघ संदर्भहीन झाल्याचा नवीन शोध त्यांच्या नावावर आहे. आता खरा पेच बायडेन यांच्यासमोर आहे. मध्य आशियातील भू – राजकीय वर्चस्व कायम ठेवण्यात इस्रायलचा मोठा वाटा आहे. नेतान्याहूंनी अमेरिकेची वारी रद्द केल्यामुळे नोव्हेंबरमधील निवडणूक सुरळीत आपल्या बाजूंनी वळवण्यात मोठा अडसर निर्माण झाला आहे. अमेरिकेतील एकूण यहुदी लोकांचे वर्चस्व पाहता बायडेन यांना इस्रायलबाबत धोरणात्मक निर्णय घेणे अवघड जागी दुखणे वाटले तर नवल नाही. हल्ली लोकशाही मार्गाने हुकूमशाही प्रवृत्तीचे नेतृत्व निर्माण होत आहे. संयुक्त राष्ट्राची सुरक्षा समिती जगातील विषम संघर्षांमुळे देशोधडीला लागलेल्या निरपराध जनतेला किमान मानवी जीवन बहाल करेल अशी आशा करूया.

श्रीकृष्ण फडणीस, दादर, मुंबई</strong>

अशी अमेरिकी तटस्थता काय कामाची?

‘पांगुळगाडा पुरे !’ हे संपादकीय (२७ मार्च ) वाचले. इस्रायल काय किंवा रशिया – पाकिस्तान काय, तेथील सत्ताधारी राज्यकर्ते सत्ता मिळवण्यासाठी वा मिळालेली सत्ता टिकवण्यासाठी राष्ट्रप्रेम- राष्ट्रहित – राष्ट्रनिष्ठा याचा सातत्याने आधार घेत आले आहेत; इतकेच नव्हे, भविष्यात भारतीय राज्यकर्त्यांनी हाच मार्ग अनुसरला, तर त्यात मुळीच आश्चर्य वाटून घेऊ नये!

तुलनेने शांत असलेल्या मध्य- पूर्वेत विशेष कारण नसताना ‘हमास’ने नाहकच इस्रायलरूपी मधमाश्यांच्या पोळयावर दगड भिरकावून भ्रष्टाचार आणि भ्रष्ट-राजकारणात आकंठ बुडालेल्या इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेसह आंतरराष्ट्रीय मध्यस्थांचे युद्धबंदीचे आवाहन फेटाळण्याची आयती संधी उपलब्ध करून दिलीय, हेच खरे !

केवळ क्षणभंगुर सत्तेसाठी युद्धबंदी प्रस्ताव फेटाळून, लक्षावधी निरपराध नागरिकांचे प्राण घेणारे नेतान्याहू म्हणजे मेंढयाचे कातडे पांघरलेला क्रूर लांडगाच नव्हे का !

युद्धांचे अलिखित नियम आणि संकेत राजरोसपणे पायदळी तुडवण्यात धन्यता मानणारे सत्ताधीश नेतान्याहू व इस्रायलला कायमचेच वठणीवर आणण्यास अमेरिकेची खरोखरीच इच्छा व तयारी असेल, तर आधी त्यांच्या आर्थिक व लष्करी नाडया करकचून आवळणे गरजेचे आहे; अन्यथा अमेरिकेची तटस्थता म्हणजे निव्वळ पालथ्या घडावर पाणीच ठरेल, यात तिळमात्र शंका नाही !

बेंजामिन केदारकर, नंदाखाल, विरार

हेही वाचा >>> लोकमानस : दावा हास्यास्पद; पण दुर्लक्ष नको..

लडाखवासी त्यांचा ‘परिवार’ नाहीत?

‘वांगचूक यांचे उपोषण समाप्त’ ही बातमी (२७ मार्च) वाचली. पर्यावरणाचा नाश होऊ नये आणि स्वतंत्र राज्य, संस्कृती, आपली ओळख कायम रहावी, म्हणून सुरू असलेले सोनम वांगचूक यांचे आंदोलन अखेर २१ दिवसांनंतर थांबले. मात्र भाजप-सरकारला त्याची अजिबात दखल घ्यावीशी वाटली नाही, यावरून लडाखवासी पंतप्रधानांच्या ‘माझ्या परिवारा’चा भाग नाही हेच दिसून आलेले आहे. या आंदोलनाचे वैशिष्टय म्हणजे तेथील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. एरव्हीच्या आंदोलनांसारखी तोडफोड, गोंधळी गाजावाजा नसल्याने मुख्य प्रवाहातील बातमीदारांनी (अपवाद वगळता) अंतर राखूनच आपले कर्तव्य पार पाडल्याचे दिसले.

उद्योगवीरांना येथेही आपले बुलडोझर सहज फिरवता यावेत आणि पुढील दानाचा रोख आपल्याकडे कायम असावा, म्हणून निवडणुकीपूर्वी दिलेले वचन भाजप-सरकारने जुमल्यांत जमा केलेले दिसते.

सोनम वांगचूक यांनी सरकार काम करत नसेल तर ते मतपत्रिकेच्या माध्यमातून बदलू शकतो असा सूचक विश्वास प्रकट करून लोकशाहीपुढे कोणीच मोठे नसते हेच सांगितले आहे.

विजय भोसले, घणसोली, नवी मुंबई</strong>

तुम्ही इतर नारींचा अपमान करता तेव्हा?

अभिनेत्री तसेच भाजप लोकसभा उमेदवार कंगना राणावत यांच्याविरोधात काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत यांच्या एक्स खात्यावरून करण्यात आलेली टिप्पणी आक्षेपार्हच आहे आणि याबद्दल निषेध व्हायलाच हवा. भाजपने आणि राष्ट्रीय महिला आयोगाने निवडणूक आयोगाला यात हस्तक्षेप करण्याची केलेली मागणी त्यामुळेच योग्य आहे. परंतु याच वेळी भाजप नेत्यांकडून महिलांच्या बाबतीतील आक्षेपार्ह विधानांबाबतही तसाच पवित्रा राष्ट्रीय महिला आयोगाकडून अपेक्षित आहे. नुकतेच भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार दिलीप घोष यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर एक वादग्रस्त टिप्पणी केली आहे. भाजप नारीशक्तीच्या हिताला प्राधान्य देत असल्याचे भाजप नेते सांगत असतात. त्यामुळे दिलीप घोष यांच्या विधानाबाबत भाजप व राष्ट्रीय महिला आयोग काय भूमिका घेते ते पाहावे लागेल.

दीपक काशिराम गुंडये, वरळी

केजरीवाल ढोंगी आणि लबाड नाहीत..

‘केजरीवाल ढोंगी आणि लबाड’ हे पत्र (लो. २७ मार्च) खोटेपणाचे आणि प्रचारकी थाटाचे उत्तम उदाहरण आहे. ‘केजरीवाल ढोंगी आणि लबाड आहेत, कारण मद्य घोटाळयाशी आपला संबंध नाही असे म्हणण्याचे धाडस केजरीवाल दाखवू शकत नाहीत’ हा लेखकाने केलेला आरोप सपशेल खोटा आहे. आपल्यावरील आरोप खोटा व बनावट असल्याचे केजरीवाल सातत्याने सांगत आलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. तसेच ‘करोडो रुपये खर्च करून केजरीवालांनी आपल्या घराचा राजवाडा केला आहे व ते ऐषोरामी जीवन जगत आहेत’ हा लेखकाने केलेला दुसरा आरोपही खोटा आहे. केजरीवालांनी त्यांच्या  सरकारी कार्यालयाचे नूतनीकरण केले. सरकारी कार्यालय हे जनतेचे घर आहे. जनतेला सुसज्ज कार्यालय बनवून देण्यास खर्च केला तर त्याला आक्षेप घेता येणार नाही. पत्रलेखकाने गरीब शालेय विदयार्थ्यांसाठी शाळा कशा सुसज्ज केल्या आहेत, ते दिल्लीत जाऊन पाहावे. खोटेनाटे व्हिडीओ काढायचे आणि जनतेला संभ्रमित करायचे हा सध्या धंदा झालेला आहे. त्या धंद्याचा बळी असलेल्यांनाच केजरीवाल ढोंगी व लबाड वाटतात. अ‍ॅड. नोएल डाबरे, वसई (आप कार्यकर्ता)