‘उद्याचे ओबामा’ हे संपादकीय वाचले. ३३ वर्षीय झोहरान ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे महापौर म्हणून विजयी झाले तर ती राजकीय दृष्टीने महत्त्वाची घटना ठरेल. एकूण अमेरिकेत आणि त्यातही न्यूयॉर्कमध्ये भाववाढीने जनता त्रासली आहे. जमाखर्चाचा मेळ घालताना सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे या मुद्द्यांविषयी बोलणारा नेता तिथल्या जनतेला हवा आहे. ममदानी जनतेत मिसळतात, त्यांच्या व्यथा जाणून घेतात आणि व्यासपीठांवर मांडतात. त्यामुळे ते लोकप्रिय होणे स्वाभाविक आहे. त्यांच्याजवळ डॉलर्सचे आणि त्यासोबत येणारे माध्यमांचे बळ नाही. तरीही प्रत्यक्ष जनसंपर्क आणि सामाजिक माध्यमे यांच्या जोरावर ममदानींनी हे यश संपादन केले आहे.
न्यूयॉर्कमध्ये आपण मोफत बस सेवा देऊ, कॉर्पोरेट कर वाढवू, भाडे नियंत्रण कठोरपणे अमलात आणू, अशी भाषा ममदानींनी केली. अर्थातच डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षातल्या धनवानांना ते आवडलेले नाही. त्यामुळे अशा लॉबी कामाला लागल्या आहेत आणि ममदानींचा पराभव करण्यासाठी त्या जंग जंग पछाडत आहेत. भविष्यात ममदानींविरोधी अनेक कुभांडे रचली जातील यात शंका बाळगण्याचे कारण नाही. हे आत्ताच सुरू झाले आहे. अपेक्षेप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ममदानी हा शंभर टक्के वेडपट कम्युनिस्ट आहे’ अशी मुक्ताफळे उधळायला सुरुवात केली आहे.
नेतान्याहूंना केलेल्या विरोधामुळे ज्युईश लॉबी ममदानींच्या विरोधात आहे. ममदानी हे मुस्लीम असल्याचे तसेच स्थलांतरित असल्याचे कार्ड या निवडणुकीत वापरले जाईल हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. आपल्या भाषणात त्यांनी गुजरात दंगलींचा उल्लेख केला आहे आणि त्यांची भूमिका मोदींविरोधी आहे. त्यामुळे त्यांची मुळे भारतीय असूनसुद्धा तिथे बहुसंख्येने असलेले मोदीप्रेमी भारतीय त्यांना साथ देणे कठीण आहे. पण तरुणांची नस त्यांना सापडलेली असल्याने त्यांच्यात ममदानी लोकप्रिय आहेत. प्रचंड भांडवली प्रभावाखाली असलेल्या अमेरिकेत अशा नेत्याला ही व्यवस्था गिळून टाकील की त्या नेत्यात त्या व्यवस्थेला बदलण्याचे सामर्थ्य (किमान काही प्रमाणात तरी) येईल, हा बिलियन डॉलर्सचा रोकडा सवाल आहे.
● अशोक राजवाडे, मुंबई
एवढा माज कोणामुळे?
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा हजार तुझ्या बापाला पेरणीला दिले, तुझ्या आई, बहीण आणि बायको यांना प्रत्येक महिन्याला दीड-दीड हजार रुपये आम्ही देतो, तुझ्या अंगावरचे कपडे, पायातल्या चप्पल, बूट आमचे सरकार देत आहे,’ या बेताल वक्तव्यातून भाजपचे परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सत्ता आल्यावर काय होते, हे दाखवून दिले आहे. लोकप्रतिनिधी हे वास्तविक जनतेचे सेवक असतात. शेतकरी शेतात राबराब राबत असतो. तो यांच्या सरकारी तुकड्यांवर जगत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार जे पैसे शेतकरी व माता-भगिनींना देत आहे, ते लोकांच्या करातून आलेले आहेत. त्यांच्या किंवा भाजप सरकारच्या खिशातून नाही. शेतकरी आणि माता-भगिनी त्यांच्याकडे काहीही मागायला गेले नव्हते. उलट हेच लोक मते मागण्यासाठी दारोदार फिरत होते. आपली सत्तेची भूक भागविण्यासाठी लोकांना पैशाची लालूच दाखवून आपण सत्तेत आलो, याचे भान त्यांनी ठेवावे. नगरसेवक, आमदार, खासदार हे सारे जण लोकांच्या पैशावर सर्व सुखसोयी, सुविधा घेतात. लोकांच्या पैशांवर उड्या मारतात आणि चांदीच्या ताटात जेवतात, हेही लक्षात ठेवावे. आमदार लोणीकर यांना एवढा माज कोणामुळे आला आहे, हे लक्षात घेऊन, लोकांनी त्यांना धडा शिकवावा.
● प्रा. जयवंत पाटील, भांडुप (पूर्व), मुंबई</p>
‘एक देश…’ हे लक्ष्य याचसाठी?
भाजपच्या एका आमदाराने आम्ही लोकांचे जीवन कसे सुकर करीत आहोत यासंबंधी जे काही वक्तव्य केले त्यास सत्तेच्या बहुमताचा दर्प आला आहे असेच म्हणावे लागेल. लोकांच्याच मतांवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी अशी भाषा करणार असतील, तर जनतेने भविष्यात राज्यातील हुकूमशाही कुठल्या थराला जाऊन पोहोचेल याचा विचार करावा!
● राजन पांजरी, जोगेश्वरी, मुंबई
शैक्षणिक वर्षावर परिणाम होणार…
‘पुन्हा मौखिक माघार’ वृत्त (२७ जून) वाचले. इतर क्षेत्रात अशी माघार समजू शकते, पण आता शाळा सुरू झाल्या आहेत. मुलांची शालेय अभ्यासक्रमाची धारणा तयार होत आहे. या सर्व घटनांचा परिणाम यंदाच्या शैक्षणिक वर्षावर झाला तर नुकसान कोणाचे? तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या मनात एखाद्या भाषेविषयी अढी निर्माण झाली तर नुकसान कोणाचे? याचा गांभीर्याने विचार होईल की शासनाची माघार याचा जल्लोष होईल हे आज सांगणे अवघड आहे. कोणत्याही बाबीवरून राजकारण कसे होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे आपले राज्य असे वाटते. ● प्रभू अग्रहारकर