अतुल सुलाखे

श्रीमद्भागवताच्या सातव्या स्कंधातील नवव्या अध्यायात एक सुंदर स्तोत्र आहे. प्रल्हादाने भगवान श्रीनृसिंहाची केलेली ती स्तुती एकदा तरी ऐकली पाहिजे. हिरण्यकशिपूचा  वध केल्यावर आपले उग्र रूप तसेच ठेवून श्रीनृसिंह दरबारातील अन्य लोकांकडे मोर्चा वळवतात. त्यामुळे सर्व जण भयभीत होतात. अपवाद केवळ प्रल्हादाचा. तो नृसिंहाची स्तुती करून त्यांना शांत करतो. ‘समोर कोणतेही संकट आले तरी घाबरून जायचे नाही.’ बालरूपातील त्या महाभागवताने विश्वाला नि:शस्त्र निर्भयता अशा रीतीने शिकवली.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
balmaifal, symbol of revolution, dr ambedkar balmaifal
बालमैफल: क्रांतीचे प्रतीक
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

या स्तोत्रात पुढे प्रल्हाद सांसारिक दु:खातून मुक्ततेचे वरदान मागतो. त्यासाठी गरजेचे असणारे आत्मज्ञान त्याला हवे आहे. तथापि स्वत:प्रमाणे त्याला सर्वाचीच मुक्ती हवी आहे. तो दयादक्ष आहे. खरा आणि सात्त्विक नेता आहे.

त्याच्या मते देव, मुनी आदी उच्च कोटीचे आत्मे केवळ स्वत:पुरतीच मोक्षाची इच्छा राखतात. प्रल्हाद म्हणतो, ‘मी असा स्वार्थी नाही. या असहाय जीवांना सोडून मला मोक्षपद नको.’  सारांश प्रल्हादाची साधना सामुदायिक आहे. निर्भयता, नम्रता आणि आत्मज्ञान यांचा तिला आधार आहे. प्रल्हादाच्या नृसिंह स्तुतीचा एवढा तपशील सांगितला कारण परंपरेत प्रल्हादाला मोठे महत्त्व आहे. भागवत धर्मातील आद्य भगवद्भक्त म्हणून प्रल्हादाचे नाव घेतले जाते. प्रल्हाद, अंगद अशी परंपरा सुरू होते आणि ती तुकोबांच्यापाशी थबकते. प्रल्हाद दैत्यांमधेही श्रेष्ठ आणि भक्तांमधेही श्रेष्ठ आहे.

वारकरी संप्रदाय, प्रल्हादाला पूजनीय मानतो हे स्वाभाविक आहे. तथापि  स्थितप्रज्ञ म्हणून विनोबा ज्याप्रमाणे पुंडरीकाला  शरण होते त्याप्रमाणे आदर्श सत्याग्रही म्हणून गांधीजी प्रल्हादाच्या चरित्राकडे पाहात होते. समोर कितीही भयावह परिस्थिती असली तरी तिला घाबरायचे नाही. सत्याग्रहाचा आरंभ निर्भयतेने होतो. प्रल्हाद नेमकी हीच शिकवण देतो. मनात भीती असेल तर अहिंसा आणि सत्याग्रह या मार्गाचे आचरण अशक्य आहे.

तथापि एकटी निर्भयता हे दमनाचे साधन बनते. त्यामुळे निर्भयतेला जोड म्हणून अहिंसा हवी. प्रल्हादाने अभय सांगितले तर गांधीजींनी अहिंसा. पुढे प्रल्हाद आणि मागे गांधी अशी सत्याग्रही सेना तयार झाली.

याखेरीज गांधींजीची आणखी दोन योगदाने आहेत. एक चरख्याचा प्रसार आणि दोन स्वातंत्र्याची आकांक्षा जनतेमध्ये जागी करणे. चरखा आणि सत्याग्रह या दोन गोष्टी मोक्षापेक्षा कमी नाहीत. कर्मयोग आणि आत्मज्ञान यांच्यापर्यंत पोहोचण्याचा तो सहज सोपा मार्ग आहे. विनोबा चरख्याची महती सांगताना म्हणाले होते की, गांधीजी नसते तरी देशाला स्वातंत्र्य मिळाले असते; मात्र चरखा ही गांधीजींनी राष्ट्राला दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे.

अभय, कर्मयोग आणि आत्मज्ञान हा साम्ययोगाचाही गाभा आहे. प्रल्हादाचे चमत्काररूप जीवन चरित्र आपल्याला ठाऊक असते. तथापि कित्येक शतके आपल्याला या बालभक्ताने प्रतिकाराचा अहिंसक मार्ग शिकवला. आणि एका नेत्याने तो आत्मसात केला. त्याचा विकास केला. सत्याग्रह म्हटले की जगाला गांधीजींची आठवण होते. तथापि या मार्गाचा जनक म्हणून प्रल्हादाचेही नाव घ्यायला हवे. थोडक्यात महाभागवत आणि महात्मा ही जोडी मानव समूहाला चिरंतन मार्गदर्शन करेल अशी त्यांची कामगिरी आढळून येते.

jayjagat24@gmail.com