इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या यंदाच्या पर्वाचा अखेरचा सामना जवळपास तिसऱ्या दिवसापर्यंत लांबला. अहमदाबादप्रमाणेच देशातील इतर काही भागांमध्ये अवकाळी पावसाने अवेळी धुमाकूळ घातला हे खरे असले, तरी नरेंद्र मोदी स्टेडियमच्या तुलनेत ईडन गार्डन्स, चिन्नास्वामी, वानखेडे किंवा चेपॉक या पारंपरिक मैदानांवर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था उत्तम असते, हे पुन्हा एकदा दिसून आले. सहसा क्रीडा जगतात अशा बडय़ा लीगचे अंतिम सामने शनिवारी खेळवण्याची पद्धत आहे. त्यामुळे पावसामुळे पहिल्या नियोजित दिवशी व्यत्यय आला, तर दुसऱ्या दिवशी रविवारी लढत पूर्ण करता येते. परंतु असा काही विचार आयपीएलच्या नियोजनात पूर्वीही होत नव्हता नि सध्या होण्याची शक्यता नाही. या विलंबामुळे जागतिक कसोटी अंतिम सामन्यासाठी काही खेळाडू एक दिवस उशिराने इंग्लंडमध्ये दाखल होतील. तसेही या अत्यंत महत्त्वाच्या सामन्याआधीच आयपीएल स्पर्धा आल्यामुळे आपले किती खेळाडू तंदुरुस्त व ताजेतवाने राहतील, असा प्रश्न उपस्थित झाला होताच. त्या वेळी कर्णधार रोहित शर्मासकट बहुतेक प्रमुख खेळाडूंनी त्यांच्या तंदुरुस्तीची जबाबदारी फ्रँचायझींवर ढकलली होती. गंमत म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयनेही हीच भूमिका घेतली. फ्रँचायझींनी या सूचनेकडे किती लक्ष पुरवले आणि रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, मोहम्मद शामी अशा अनेकांच्या तंदुरुस्ती/विश्रांतीविषयी कोणती पावले उचलली, हे स्पष्ट झालेले नाही. आयपीएलच्या नित्य कोलाहलात या मुद्दय़ांकडे दुर्लक्ष करणे कदाचित फ्रँचायझींसाठी चालून जाईलही. पण या देशातील क्रिकेट आणि क्रिकेटपटूंचे पालकत्व असलेल्या बीसीसीआयलाही बहुधा या स्पर्धेपायी हाती आलेल्या मलिद्यामध्येच रस असावा.

आपला क्रिकेट संघ टप्प्याटप्प्याने इंग्लंडमध्ये दाखल होत आहे. ७ जून रोजी लंडनमधील ओव्हल मैदानावर अंतिम सामना होत आहे. ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर प्रतिस्पध्र्याविरुद्ध आयपीएलमधील पाटा खेळपट्टय़ांवरील दे-मार क्रिकेट फार साह्यभूत ठरणार नाही. इंग्लंडमध्ये विशेषत: जून-जुलैमध्ये चेंडू अधिक िस्वग होतो. अशा वातावरणात आपल्या फलंदाजांना सरावासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. आयपीएलमध्ये यशस्वी ठरलेल्या सर्वच फलंदाजांना – उदा. शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे – बदललेल्या खेळपट्टीशी आणि वातावरणाशी जुळवून घ्यावे लागेल. रोहित शर्मासारख्या फलंदाजाला येथेच फारसा सूर गवसला नव्हता, त्यामुळे त्यांच्यापुढील आव्हान अधिक खडतर राहील. तशात आपला प्रमुख मध्यम-तेज गोलंदाज जसप्रीत बुमरा जायबंदी असल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे पारडे जड राहील.

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
Glenn Maxwell makes bizarre comment on Virat Kohli
T20 World Cup : ‘मला आशा आहे की विराट कोहलीची निवड होणार नाही’, आरसीबीच्या ‘या’ खेळाडूचे चकित करणारे वक्तव्य
IPL 2024 Performance of 5 impact players
IPL 2024 : शिवम दुबे ते साई सुदर्शनपर्यंत ‘या’ ५ ‘इम्पॅक्ट प्लेयर्स’नी पहिल्या १० दिवसात गाजवलं मैदान
Big blow to Sunrisers Hyderabad team in IPL 2024
IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का! ‘हा’ प्रमुख खेळाडू टाचेच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकणार

आता थोडेसे प्रत्यक्ष स्पर्धेविषयी. साखळी टप्प्यात सर्वात यशस्वी ठरलेल्या दोन संघांमध्येच अंतिम सामना खेळवला गेला आणि चेन्नईने पाचव्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरले. या संघाच्या विजयात अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, तुषार देशपांडे या मराठी क्रिकेटपटूंचा हातभार लागला ही आपल्यासाठी नक्कीच समाधानाची बाब. महेंद्रसिंग धोनीचे नेतृत्व हा चेन्नईच्या दीर्घकालीन यशाचा प्रमुख घटक नि:संदेह ठरतो. चाळिशी ओलांडलेल्या या क्रिकेटपटूच्या निवृत्तीची चर्चा गेली काही वर्षे सुरू असली तरी खेळण्याची ऊर्जा आणि जिंकण्याची भूक या अवलिया खेळाडूमध्ये अजूनही शाबूत आहे. आयपीएललाच सर्व काही मानणारी येथील मंडळी मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्माने मिळवलेल्या पाच अजिंक्यपदांकडे बोट दाखवत असत. आता तशी पाच अजिंक्यपदे धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्जनीही मिळवलेली आहेत. शिवाय धोनीच्या खात्यात दोन आयसीसी अजिंक्यपदे आहेत. त्या आघाडीवर विराटला काहीच मिळवता आले नाही आणि रोहित अजूनही त्या वाटेवर धडपडतो आहे. धोनीच्या आयपीएलमधील कामगिरीची खुमारी आयसीसी जेतेपदांमुळे वाढते. उलट पाच-पाच आयपीएल जेतेपदे मिळवूनही आयसीसी अजिंक्यपदाअभावी रोहित शर्मा निस्तेज ठरतो!
आयपीएलचा अंतिम सामना झाला, ते नरेंद्र मोदी स्टेडियम हे देशातील प्रमुख क्रीडा केंद्र बनवण्याचा देशातील सत्ताधीशांनी चंग बांधला आहे. अहमदाबाद शहराची उमेदवारी २०३६ ऑलिम्पिकसाठी पुढे करण्याची चर्चा जोरात सुरू आहे. यंदाचा क्रिकेट विश्वचषक भारतातच होत असून, त्याचा अंतिम सामनाही अहमदाबादेतच खेळवला जाणार, हे नक्की. म्हणजे आयपीएल, विश्वचषक, बडय़ा संघांचे कसोटी किंवा टी-२० सामने हे नरेंद्र मोदी स्टेडियममध्येच खेळवण्याचा खटाटोप भारताचे व्यापक आणि विस्तारित क्रिकेट वैभव पाहता हास्यास्पद ठरतो. शिवाय खेळपट्टीचा दर्जा, स्टेडियममधील सुविधा अशा अनेक निकषांवर हे संकुल सर्वोत्तम असेल तर हा अट्टहास समजण्यासारखा आहे. पण तसे काही असल्याचा पुरावा सापडत नाही. धावांचा आणि पैशांचा पाऊस आयपीएलला नवा नाही. यंदा प्रत्यक्ष पावसाने अंतिम सामनाच जवळपास धुऊन टाकला, हीच काय ती नवलाई!