प्रचारप्रसाराच्या साधनांवर पुरेपूर नियंत्रण आणि यंत्रणांना तालावर नाचवण्याइतकी सत्ता यांच्या युतीतून दडपशाहीच निर्माण होते…
योगायोगांमधून प्रतीकात्मक अर्थ शोधण्याचा प्रयास बिनडोकच ठरतो. यंदाच्या गांधी जयंतीलाच विजयादशमीही आल्यामुळे ठिकठिकाणच्या मेळावाप्रिय नेत्यांनी रेटून केलेली भाषणे आणि त्यातून गांधीजींच्या राजकारणापासून आताच्या राजकारणाचे दिसून आलेले अंतर, हा तर निव्वळ कॅलेंडरी योगायोग होता. गांधीजींचा काळ आता उरला नाही, हे उमगण्यासाठी आजकालच्या नेत्यांची भाषणे ऐकण्याची गरज नसते. तेव्हा या योगायोगाकडे कुणाचे लक्षही गेले नसेल तर बरेच. पण गांधीजींच्या काळापासून आपण किती दूर आहोत आणि ते अंतर आता किती चिंताजनक ठरते आहे हे दाखवून देणाऱ्या घडामोडी नेमक्या यंदाच्या गांधी जयंतीला घडल्या. कर्नाळ्याजवळच्या युसुफ मेहेरअली केंद्राच्या कार्यात स्वत:ला गाडून घेणारे शतायुषी कार्यकर्ते जी. जी. पारीख याच दिवशी निवर्तले. तरुण पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्गच्या साथीने गाझाकडे निघालेल्या शिडाच्या नौकांचा ताफा इस्रायलने युद्धनौका वापरून अडवला आणि तिला डांबून ठेवले. लडाखच्या स्वायत्ततेसाठी गांधीजींसारखा उपोषणाचा मार्ग स्वीकारणारे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना ‘रासुका’खाली अटक करताना सरकारने प्रक्रियेचे पालन केले नसल्याचा मुद्दा वांगचुक यांच्या पत्नीने राष्ट्रपतींना पत्र लिहून मांडल्याचे वृत्तही गांधी जयंतीला प्रसृत झाले. यापैकी जी. जी. पारीख यांचे निधन हा गांधीजींच्या मार्गावर चालणाऱ्या, खादीच्या साधेपणाला आजन्म जागणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांपैकी अखेरचे दुवेही निखळत असल्याचा संकेत. पण उरलेल्या दोन घडामोडी निव्वळ योगायोग म्हणून सोडून देता येत नाहीत.
ग्रेटा थुनबर्गला ‘ऑटिझम’ या विकाराचाच सौम्य प्रकार मानला जाणाऱ्या एककल्लीपणाची बाधा वयाच्या १२ व्या वर्षी झाली होती, हे कितीही पुन्हापुन्हा उगाळून सांगितले तरी तिच्या पर्यावरणनिष्ठ एककल्लीपणाचे मोल २०१८ पासून जगभरच्या विवेकीजनांना पटू लागले. अशा लोकांची संख्या आणि शक्ती आताशा कमीच होत असताना पर्यावरणवाद आणि मानवतावाद निराळे नाहीत, असा विश्वास ग्रेटाच्या उक्ती आणि कृतींतून वाढू लागला. हमास या दहशतवादी संघटनेने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी केलेल्या हल्ल्यात १२०० इस्रायलींना मारून २५० जणांना ओलीस ठेवण्याच्या प्रकारानंतर इस्रायलने हमासला धडा शिकवण्यासाठी सुरू केलेले प्रतिहल्ले आता मनुष्यहानीचा ६० हजारांचा आकडा पार करून गाझाच्या नरसंहाराकडे आणि पॅलेस्टिनींच्या वंशविच्छेदाकडे चालले आहेत, हे गेल्या वर्षभरात दिसले. हा संहार तातडीने थांबवा, असा आग्रह धरणाऱ्यांचे पुढारपण ग्रेटाकडे आले. तिने शिडाच्या नौकांचा ताफाच गाझा किनारपट्टीवर नेऊन मानवतावादी मदत करण्याचे आवाहन जगाला केले. अशा ४२ नौकांचा ‘ग्लोबल समद’ हा ताफा इस्रायलने अडवला. या ताफ्यात युरोपीय देशांतले काही लोकप्रतिनिधीही आहेत. पण इस्रायलने आधी ग्रेटा आणि तिच्या नौकेला लक्ष्य केले. ‘आम्हाला डांबून ठेवले आहे’ असा संदेश तिने दिला आणि इस्रायलने ‘ती सुरक्षित आहे’ असा दावा केला. हा प्रकार ओलीस ठेवण्याच्या कृतीपेक्षा निराळा म्हणता येणे कठीण. इस्रायलने गाझा प्रदेशातला संहार सुरू केल्यानंतर काही महिन्यांत पाश्चात्त्य देशांतून येणारी मदत रोखली. पाश्चात्त्य पत्रकार वा छायाचित्रकाराला तिथे जाण्यास मज्जाव केला. आमचे आम्ही पाहून घेऊ, कितीही माणसे मारू, लहान मुले/ वृद्ध अशा कितीही जणांना अन्नाविना तडफडवून मरणयातना देऊ- तुम्ही बातम्या देण्याच्याही फंदात पडू नका, असा इस्रायली रासवटपणा जगाने खपवून घेतला. त्याचे फलित म्हणजे मानवतावादी मदत करू पाहणाऱ्यांनाच डांबून ठेवणे. यावर ट्रम्पादी नेत्यांकडून विवेकी प्रतिक्रियेची अपेक्षाही नाही. पण ग्रेटा थुनबर्गसह ज्या शेदीडशे कार्यकर्त्यांना इस्रायलने ‘सुरक्षित’ ठेवले आहे, त्यांना पुन्हा आंतरराष्ट्रीय यंत्रणांच्या हवाली करणे हा किमान जागतिक संकेतांचा भाग ठरतो. तेही अद्याप झालेले नाही.
संकेत धुडकावून सत्ता राबवू नये, हा गांधीजींच्या काळात शोभणारा आग्रह. तो गेल्या ७७ वर्षांत पार लयाला गेल्याचे आपल्याकडील उदाहरण म्हणजे सोनम वांगचुक यांना झालेली अटक. ती कोणाच्या आदेशाने झाली, ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्या’ची नेमकी कोणती कलमे या अटकेस लागू पडतात, हे सरकारने आपल्याला कळवलेले नाही, म्हणून हे प्रकरण किमान कायद्याच्या दरबारात आणा, असा देहोपस्थितीचा (हेबियस कॉर्पस) अर्ज वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंग्मो यांनी आता केला आहे. तो सर्वोच्च न्यायालयाची सुट्टी संपल्यानंतर यथावकाश सुनावणीला येईल. त्याआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून ही कायदेशीर मागणी त्यांनी मांडली होती. ते पत्र गांधी जयंतीस प्रसारमाध्यमांतूनही प्रकाशित झाले. अटक योग्यच असल्याचे सांगण्यासाठी जे काही तोंडी दावे सरकारकडून करण्यात येत आहेत, त्यात लडाखमध्ये घडणाऱ्या हिंसाचाराकडे वांगचुक यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रमुख. पण ‘रासुका’खाली अटक करायची तर देशविरोधी कारवायांत गुंतल्याचे दिसले पाहिजे- त्यामुळे ‘वांगचुक यांनी आधी केलेल्या भाषणांतून कार्यकर्त्यांना चिथावणी मिळाली- ‘त्यांनी ‘अरब स्प्रिंग’चे उदाहरण भाषणात दिले… ‘स्वत:ला तरी पेटवून घ्या’ अशी भाषा केली’ वगैरे तोंडी प्रचार सरकारच्या गोटातून सध्या सुरू आहे. हे सारे आरोप कागदोपत्री असतील, तर ते कागद कुणाला दिसलेले नाहीत. इस्रायलचा प्रचार जसा अमेरिकी सत्ताधाऱ्यांना पटतो, तसा आपल्या सत्ताधारी यंत्रणांचा प्रचार लोकांना पटत असल्यास ठीक. पण ‘कायद्याची प्रक्रिया पाळली गेली नाही’ हा आक्षेप तरीही गंभीरच ठरतो. वांगचुक अटकेनंतर त्यांच्या संस्थेचा परदेशांतून निधी मिळवण्याचा परवाना सरकारने ‘नियमबाह्य कारभार’ झाल्याचे कारण देऊन रद्द केला आणि या संस्थेला दिलेली जमीनही काढून घेतली. हे नियमभंग वांगचुक यांना अटक होईपर्यंत सरकारी यंत्रणांना दिसलेच नव्हते. घोटाळ्यांच्या आरोपांतून मुक्त होण्यासाठी काय करावे याचा वस्तुपाठ नवभाजपवासी नेत्यांनी घालून दिला असला तरी वांगचुक तो कित्ता गिरवत नाहीत तोवर आरोप कायमच राहणार.
ग्रेटा थुनबर्ग आणि तिला साथ देणाऱ्यांवरही नेमके आरोप झालेलेच नाहीत. कोणाही टीकाकारांना ‘अॅन्टिसेमेटिक’ – यहुदीविरोधी ठरवण्याचा इतिहासदत्त परवाना आपल्याकडे असल्यासारखे इस्रायलचे वर्तन मात्र सुरूच आहे. पण किमान विचार करणाऱ्या कुणालाही इतिहासाइतकीच वर्तमानाची चिंता हवी. प्रचारप्रसाराच्या साधनांवर पुरेपूर नियंत्रण आणि यंत्रणांना तालावर नाचवण्याइतकी सत्ता यांच्या युतीतून दडपशाहीच निर्माण होते. हे आजच कुणी पहिल्यांदा सांगावे असे त्यात काही नाही. हिटलरचा उदय होत असताना जर्मनीच्या अटकेतून कसेबसे सुटलेल्या सौमेंन्द्रनाथ टागोर यांनीही हेच सांगणारी पत्रके इंग्लंडादी देशांत वाटली होती. हे सौमेंन्द्रनाथ रवीन्द्रनाथांचे पुतणे; पण कम्युनिस्ट विचारांचे. आजारपणात हवापालटासाठी युरोपास गेले, बर्लिनच्या डॉक्टरला भेटण्यासाठी जर्मनीत शिरले आणि अटकेनंतर ‘हिटलरच्या हत्येचा कट रचल्या’चा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. हे घडले १९३३ मध्ये, तेच वर्ष गांधीजींना ‘सविनय कायदेभंगाची दुसरी चळवळ’ सुरू केल्याबद्दल अटक करून आगाखान पॅलेसमध्ये ठेवले जाण्याचे. पण ब्रिटिशांनी खुनाबिनाचे आरोप कधी गांधींवर ठेवले नाहीत. तत्कालीन लोकही चौरीचौराच्या घटनेनंतर गांधीजींच्या अहिंसक मार्गापासून ढळले नाहीत. हिटलर आणि गांधीजी दोघांचाही प्रभाव एकाच काळात वाढू शकला, याला ब्रिटिश सभ्यपणाच जबाबदार. गांधीजींचा प्रभाव टिकवण्याचे व्रत पुढे यापैकी अनेकांनी घेतले, हा मानवी चांगुलपणाचा विजय.
जी. जी. पारीख यांना मानवी चांगुलपणाचे हे वळण पुढल्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याइतके आयुष्य मिळाले होते. शतकभरातले प्रचंड भौतिक बदल त्यांनी पाहिले, गांधीवादी प्रेरणांतून समाजवादी काम उभे करण्यासाठी जो अंगभूत सच्चेपणा आवश्यक असतो, तो याच काळात भोळसट आणि बावळट ठरू लागला. अशाही काळात ‘देशासाठी एक तास देण्याच्या, बचतीतून समाजाला वाटा देण्याच्या प्रतिज्ञांचे काय झाले?’ असे कार्यकर्त्यांना विचारण्याइतका नैतिक अधिकार ‘जी.जीं.’कडे निश्चितपणे होता. संस्था म्हणून ‘युसुफ मेहेरअली सेंटर’ त्यांच्यानंतरही समाजभावीच राहील, इतकी मशागत करूनच ते गेले. पुन्हा ‘जी.जीं.’सारखी माणसे होणार नाहीत, असे म्हणण्यास- आणि या जगातच असलेल्या सोनम वांगचुक किंवा ग्रेटा थुनबर्ग यांच्यासारख्यांकडे दुर्लक्ष करण्यास- आपण मोकळे झालो! ती मोकळीक विसरण्याची वेळ आता आली आहे.