ढोलताशे, डीजे, लेझर हे एकदोन दिवसांपुरते असेल, तर एक वेळ समजण्यासारखे. पण कोणताही आनंद व्यक्त करण्यासाठी हल्ली या ‘आयुधां’चा वापर केला जातो…

‘‘तुम्हाला नेहमी ‘आपले’च दोष का दिसतात? ‘त्यांचे’ का दिसत नाहीत…? त्यांच्यावरही जरा टीका करून बघा की… म्हणजे समजेल काय होते ते…’’ हा प्रतिवाद होण्याचा धोका आहेच; पण ‘आपल्या’त काय सुरू असते, ते ‘आपल्या’ला आतून नीट माहीत असते, त्यामुळे आपण ‘आपली’ चर्चा करावी, ‘त्यांचे’ ‘ते’ बघून घेतील, हे त्याचे उत्तरही तयार असायला हवे. याचे कारण असे की, आपल्या चुकांमुळे होणारे नुकसान दुसऱ्याच्या चुकांकडे बोट दाखवून झाकता येणारे नाही. संदर्भ आहे, अर्थातच नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवाचा. आणि ईदचाही. गोकुळाष्टमीच्या दिवशी कृष्णाच्या नावाखाली घातल्या जाणाऱ्या आवाजी धुडगुसाचा आणि त्याचबरोबर लग्नाच्या वरातींपासून तथाकथित कार्यसम्राटांच्या कर्तृत्वाचे कवतुक करण्यासाठी केल्या जाणाऱ्या दणदणाटाचाही. नुकत्याच झालेल्या गणेशउत्सव आणि इद ए मिलाद या उत्सवाांदरम्यान दोन्ही बाजूच्या लोकांनी ठिकठिकाणी मनसोक्त कानठळी ध्वनीनिर्मिती केली. त्यासाठी कुणी ढोलताशे वाजवले, कुणी डीजेचा वापर केला, तर कुणी लेझर बीम लाइट वापरले. ‘गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान राज्यात २१ जणांचा मृत्यू’, ‘मिरवणुकीदरम्यान नाचता नाचता एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, कानठळी संगीताचा परिणाम असण्याची शक्यता’, ‘डीजेच्या आवाजामुळे अमुकतमुक गावातील अनेकांच्या कानांच्या पडद्याला इजा’, ‘मिरवणुकीदरम्यान लेझर बीम लाइटच्या वापरामुळे काहींच्या डोळ्यांवर परिणाम’, ‘विसर्जन करताना बुडून मृत्यू’, ‘मिरवणुकीदरम्यान ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने काही जणांचा मृत्यू’, ‘उत्सवादरम्यान यंदा ध्वनी प्रदूषणाची पातळी कमी, पण अनुज्ञेय पातळीपेक्षा ती जास्तच’ या गेल्या दोन दिवसांतील राज्यभरातील बातम्या त्यामुळेच कमालीच्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत.

loksatta editorial one nation one election
अग्रलेख: होऊन जाऊ दे…!
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Loksatta editorial Narendra modi statement Karnataka govt arrested ganesh murti congress
अग्रलेख: कर्मभूमीतील धर्मकसोटी!
loksatta editorial on National Science Awards
अग्रलेख : नंदीबैल नगरी!
Loksatta editorial Loksatta editorial on Israel Hamas war akshay shinde Encounter
अग्रलेख: बुल्स इन चायना शॉप्स!
loksatta editorial marathi news
अग्रलेख : दोन ध्रुवांवर दोघे
Anura Disnayake
अग्रलेख: दक्षिणेचा ‘वाम’पंथ!
loksatta editorial on ajit ranade marathi news,
अग्रलेख : ‘माहेर’चे मस्तवाल!

गणेशोत्सवाच्या आधी पोलिसांनी राज्यभरात ठिकठिकाणी गणेश मंडळांना डीजे तसेच लेझर बीमचा वापर न करण्याबाबत तंबी दिलेली होती. पण पोलिसांचा धाक असण्याचे काही कारण नसल्यामुळे मंडळींनी या सगळ्याचा मनसोक्त वापर केला आणि उत्सव संपता संपता त्यापाठोपाठ या बातम्या आल्या. एरवी आपल्याला हवी ती उपासना करण्याचे, हवे ते उत्सव साजरे करण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेनेच दिलेले असल्यामुळे त्याबद्दल कुणी काही बोलण्याचा प्रश्न येत नाही. पण ते करत असताना इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा येत असेल, त्यांच्या जिवावर बेतत असेल, तर बोलणे क्रमप्राप्त ठरते. कुणी तरी निर्माण केलेल्या ठणठणाटामुळे कुणाच्या तरी कानांवर परिणाम होतो आहे, तर उर्वरितांनी होऊ दे व्हायचे ते असे म्हणून शांत बसायचे का? ढोलताशांच्या आवाजामुळे घरात बसलेल्या एखाद्या वृद्धाच्या हृदयात धडधड होत असेल तर त्यांनी सहन करावे, नाही तर पाकिस्तानात जावे, असे म्हणायचे का? फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण, हवेचे प्रदूषण झाले तरी चालेल, पण आम्ही आमचा आनंद असाच व्यक्त करणार हे म्हणणे मान्य करायचे का? डीजे, लेझर यांच्या परिणामाच्या नुसत्या शक्यता वर्तवल्या जात आहेत, असे म्हणून हे मुद्दे मोडीत काढणे किती योग्य आहे? मग प्रत्यक्ष परिणामांची वाट पाहायची आहे का, असा मुद्दा त्यातून उपस्थित होतो, त्याला उत्तर काय आहे? याशिवाय २४-२८ तास चालणाऱ्या विसर्जन मिरवणुका, त्यामुळे अडवले जाणारे रस्ते, सामान्य माणसाची होणारी गैरसोय या मुद्द्यांकडे आपण आणखी किती काळ हे असेच चालायचे म्हणून दुर्लक्ष करणार आहोत?

हेही वाचा : अग्रलेख: होऊन जाऊ दे…!

आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय सुधारणा हा वाद आपल्याकडे झडला आणि त्यात ‘आधी राजकीय’ वाल्यांची सरशी झाली, ही गोष्ट फार नाही- जेमतेम दीडदोनशे वर्षांपूर्वीची. गणपती या देवतेचे सार्वजनिकीकरण आणि राजकीयीकरण हे याच काळातले. पण गेल्या तीन दशकांत या उत्सवातले आणि इतर सगळेच साजरीकरण दिवसेंदिवस कमालीचे ‘आवाजी’ होत चालले आहे. आपल्या देशात चालीरीती, प्रथा-परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी सगळ्या माणसांचे कान, डोळे, हृदय, मेंदू हे अवयव अगदी एकसारखेच आहेत आणि कोणत्याही विपरीत परिस्थितीचा त्यांच्यावर सारखाच परिणाम होत असतो, हे सांगायला कुणा डॉक्टरची अजिबातच गरज नाही. सणवार साजरे करणे, लोकांना सांस्कृतिक जीवन असणे, त्यांनी ते जगणे, उपभोगणे हे सगळेच समजण्यासारखे आहे. पण ते करत असताना प्रचंड गर्दी निर्माण करणे, प्रचंड आवाज निर्माण करणे, लेझर बीमसारखे सर्वसामान्यांच्या डोळ्यांना थेट इजा करू शकणारे तंत्रज्ञान वापरणे यातून नेमके काय साधले जाते? सार्वजनिक पातळीवर आवाजाची पातळी किती असायला हवी, सणासुदीच्या काळात तिला किती उशिरापर्यंत सवलत असते, यासंबंधी न्यायालयाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यांची पायमल्ली करायला आपण इतके आतुर का असतो? ढोलताशांसारखे वाद्या जोश निर्माण करते हे खरे, पण एकदोन दिवसांसाठी सगळेच जण ते सतत वाजवायला लागले तर कानठळ्या बसायला लागतात, छातीत धडधडायला लागते. आणि हे सगळे शारीरिक परिणाम फक्त ‘टीकातुरां’बाबतच घडतात असे नाही, तर ही वाद्यो वाजवणाऱ्यांच्याही घरातील वृद्ध माणसे, लहान बाळे, पाळीव प्राणी या सगळ्यांनाच त्या आवाजाचा कमालीचा त्रास होतो. बरे, ढोलताशे, डीजे, लेझर हे सगळे त्या एकदोन दिवसांपुरते असेल, तर एक वेळ समजण्यासारखे आहे. पण आयपीएल ते आंतरराष्ट्रीय असा कोणताही सामना जिंकण्यापासून ते कुणा कार्यसम्राट नगरसेवकाच्या तथाकथित सुपुत्राच्या प्रकटदिनापर्यंत कोणताही दिवस साजरा करण्यासाठी हल्ली या वाद्यारूपी ‘आयुधां’चा वापर केला जातो. वाढदिवसाला तलवारीने केक कापण्याच्या ‘संस्कृती’त यापेक्षा वेगळी अपेक्षा करता येत नसली तरी बटबटीतपणाकडून असंस्कृतपणाकडे आपला वेगाने प्रवास सुरू आहे, हे मान्य केले पाहिजे. एके काळी ब्रिटिशांविरोधात स्थानिकांची मने चेतवण्याचे काम करणाऱ्या आणि त्यानंतर लोकांच्या सांस्कृतिक भरणपोषणात योगदान देणाऱ्या या उत्सवाचे आपण काय करून ठेवले आहे? याच उत्सवातून आता त्यात सहभागी होणाऱ्या लोकांना अंध आणि बहिरे करायचे आहे का? त्याविरोधात आजच, आत्ताच बोलत नाहीत, ते का मूक आहेत?

गणेशोत्सव नीट साजरा करणे ही गणेशोत्सव मंडळांची जबाबदारी आहे. त्यासंदर्भात अशा तक्रारी येत असताना आपल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आवर घालून त्या उत्साहाला विधायक वळण देणे हे त्यांचेच काम आहे. अनेक मंडळांनी ते याआधीच्या काळात केले आहे. काही अपवादात्मक मंडळे ते आजही करत आहेत. पण काहींची दिशा चुकली आहे, चुकते आहे. त्यांना हे कधी तरी, कुणी तरी सांगणे गरजेचे आहे की बाबांनो, जरा थांबा आणि तुम्ही काय करता आहात त्याचा विचार करा. मानवी कानांना मर्यादा आहेत, ढणढणाट ऐकून कान किटून जातात. आज तुम्ही शांततेत उत्सव साजरा कराल, तर उतारवयात नीट ऐकू शकाल.

हेही वाचा : अग्रलेख : नंदीबैल नगरी!

हीच गोष्ट विसर्जनाच्या वेळी मुलेमाणसे वाहून जाण्याबाबत, गर्दीत उत्साहाच्या भरात काही जीव जाण्याबाबत आहे. लेझरसारख्या तंत्रज्ञानाच्या वापरातून काही जणांच्या दृष्टीवर परिणाम होण्याबाबत आहे. आपण आपले, आपल्या बरोबरच्यांचे संरक्षण करू शकत नसलो, तर आपण नेमके काय साजरे करतो आहोत? असे काही साजरे करण्याचा आपल्याला अधिकार तरी आहे का? असेच करत राहिलो तर ‘शांततेचाही आवाज’ असतो आणि कधी तरी तोही ऐकायचा असतो हे आपण विसरून तर जाणार नाही ना?