मुद्दा आयुर्वेदात काय सांगितले आहे अथवा नाही, हा अजिबात नाही. तर त्यात जे सांगितलेले आहे ते शास्त्रकाट्याच्या कसोटीवर आपण आज आजमावून पाहणार की नाही, हा आहे…

सर्वोच्च न्यायालयाने ज्यांस कथित औषधांच्या दाव्याबाबत यथेच्छ फटकारले त्या बाबा रामदेव यांच्या कथित संशोधन केंद्राचे उद्घाटन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सात वर्षांपूर्वी केले होते याचा विचार आता करण्यात अर्थ नाही. या बाबा रामदेवांस अर्थशास्त्रात किती गती आहे आणि काळ्या पैशाबाबत त्यांनी व्यक्त केलेल्या अभ्यासपूर्ण विचारांचे आता काय झाले, हे विचारण्यातही काही अर्थ नाही. किंवा जवळपास एक तपापूर्वी अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सामील असलेले हे योगगुरू पोलीस-योग अनुभवायची वेळ आल्यावर स्त्रीवस्त्रांतून पदनेती करते झाले याचे स्मरण करण्याचीही गरज नाही. असे आणखीही काही मुद्दे सांगता येतील. पण त्यांचा दाखला सर्वोच्च न्यायालयाने ज्या प्रकरणी त्यांच्या औषध दाव्यांस निर्वस्त्र केले त्या विषयावर देणे अगदीच अप्रस्तुत ठरेल. कारण हा विषय बाबा, त्यांची ऊटपटांगगिरी, भगव्यावस्त्रांकित सन्याशासमोर शरणागत होणारे राजकारणी इत्यादी संदर्भात नाही. मुद्दा आहे बाबांच्या या कथित औषधांबाबत केला जाणारा दावा. हे बाबांचे दावे आणि पूर्वी मुंबईच्या लोकगाड्यांत मिरगी, ‘कमजोरी’ इत्यादी आजारांवर जालीम ‘औषधे’ देणाऱ्या बंगाली बाबांच्या जाहिराती यांत काडीचाही फरक नाही. फरक असलाच तर ही औषधे देणाऱ्यांच्या वस्त्ररंगात आहे. ते बंगाली बाबा काळ्या कफन्या घालत. या बाबांची कफनी भगवी असते. एरवी दोघांच्याही औषधांची (?) गुणवत्ता एकसमान असू शकते आणि त्यांच्या ग्राहकांचा आर्थिक स्तर वगळता बौद्धिक स्तरही समान. त्या बाबांच्या कारवाया स्थानिक पोलीसही रोखत. पण सत्ताधारी समवेत असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयासही भीक न घालणे या बाबांस परवडू शकते. हे वास्तव वगळून या बाबांच्या औषधांसंदर्भात उपस्थित झालेल्या मुद्द्यांची दखल घ्यायला हवी.

हेही वाचा >>> अग्रलेख : करेक्ट कार्यक्रम!

कारण ते नागरिकांच्या आयुर्वेदाबाबतच्या गैरसमजांवर आधारित आहेत. आपल्याकडील एक मोठा वर्ग जे जे आयुर्वेदिक ते ते सुरक्षित असे मानतो. यात शिकले-सवरलेलेही आले. या औषधांचे काही सहपरिणाम वा दुष्परिणाम नसतात, म्हणून ती सुरक्षित असे या मंडळींचे म्हणणे. विचारशक्तीच्या कितव्या शिशुवर्गात यांचा समावेश होतो हे यावरून कळेल. याचे कारण असे की ज्याचे ज्याचे म्हणून परिणाम होतात त्या प्रत्येकाचे काही ना काही सहपरिणाम असणारच असणार. हा विज्ञानाचा नियम सर्वांस लागू होतो. तेव्हा ज्या औषधांचे सह/दुष्परिणाम नाहीत हे या मान्यवरांचे म्हणणे खरे असेल तर त्या औषधांचे मुळात परिणामच काही नसतात हे सत्य. ‘साईड इफेक्ट्स’ नाहीत या दाव्यातून काही ‘इफेक्ट’च नाही, हे वैज्ञानिक वास्तव समोर येत असते. पण हे सत्य समजण्याचाच अभाव असल्याने जनसामान्य या कथित औषधांच्या मागे धावतात आणि बाबा रामदेवासारखी वैदू मंडळी आयुर्वेदावरील जनतेच्या अंधविश्वासाचा गैरफायदा घेतात. यातून खरी बदनामी होते ती आयुर्वेदाची हे भान ना नागरिकांस असते ना त्या आधारे आपल्या तुंबड्या भरभरून भरणाऱ्या बाबांस ते असते. सध्याही तेच सुरू आहे. बाबा रामदेव हे पतंजलीच्या नावे आपली वैदूगिरी करतात आणि ती खपवून घेतली जाते. कोणी कोणत्या नावे काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न. शालेय स्तरावर अत्यंत जुजबी भाषा शिकविणारा वैय्याकरणी पाणिनीच्या नावे उद्या शिकवण्या करू लागला आणि ग्राहक ते गोड मानून घेत असतील तर इतरांस तक्रार करण्याचे काही कारण नाही. परंतु शरीर, मन आणि निसर्ग यांच्या संतुलनाचे उच्चकोटीचे शास्त्र मांडणाऱ्या महर्षी पतंजलीच्या नावे एखाद्या वैदूची उत्पादने विकली जात असतील तर ती विकणाऱ्यापेक्षा विकत घेणाऱ्यांचा दोष अधिक.

तेव्हा काही गंभीर आजार आपल्या (अर्थातच कथित) औषधांनी हमखास बरे होतात असे बाबा सांगत असतील तर तो विश्वास ठेवणाऱ्यांचा दोष अधिक. अन्य कोणते क्षेत्र असते तर या अशा दाव्यांकडे दुर्लक्ष करता आले असते. पण या वैदूच्या उत्पादनांचा संबंध जीवनमरणाशी असल्याने त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली हे उत्तम झाले. जनसामान्यांस एखाद्या घटकास औषध म्हणवून घेण्यासाठी काय काय दिव्यातून जावे लागते हे ठाऊक नसते. अलीकडच्या काळातील ‘प्रॉडक्ट पेटंट’ आणि ‘प्रोसेस पेटंट’ या पद्धतींशीही त्याचा परिचय असण्याची शक्यता नाही. आणि त्यामुळे आधुनिक वैद्यकशास्त्रात एकाच नावाचे औषध दोन कंपन्या बाजारात आणू शकत नाहीत, पण आयुर्वेदात मात्र एकच औषधनाम अनेक कंपन्यांच्या उत्पादनांचे असू शकते हे जनसामान्यांस कसे माहीत असणार? दोन वर्षांपूर्वीच्या करोनाकाळात तर या वैदूंनी मांडलेला उच्छाद अजूनही अनेकांच्या मनात ताजा असेल. कसलेकसले काढे आणि वाफारे घेऊन अनेकांचे घसे सोलवटले आणि करोना परवडला पण ही बोगस औषधे नकोत असे म्हणण्याची वेळ अनेकांवर आली. पण तसे कोणी जाहीर म्हणणार नाही. स्वत:च्या मूर्खपणाची जाहीर कबुली देणे तसे अवघडच असते. म्हणून गर्भसंस्काराची भाषा करणाऱ्या आणि वाफाऱ्यांनी करोनास दूर ठेवण्याचा दावा करणाऱ्या पुण्यातील एका वैदूच्या मरणाचे कारण लपवून ठेवण्याची वेळ संबंधितांवर आली. त्यात आयुर्वेद हे तर प्राचीन शास्त्र. त्याच्या नावे बोटे कशी मोडणार असाही प्रश्न काहींस पडला असणार.

हेही वाचा >>> अग्रलेख: दादांचे पत्र!

पण मुद्दा आयुर्वेदात काय सांगितले आहे अथवा नाही, हा अजिबात नाही. तर त्यात जे सांगितलेले आहे ते शास्त्रकाट्याच्या कसोटीवर आपण आज आजमावून पाहणार की नाही, हा आहे. ही शास्त्रकाट्याची कसोटी फार महत्त्वाची. ती आधुनिक वैद्यकाच्या अनेक घटकांस वारंवार लावली जाते आणि त्यांचे परीक्षणही सातत्याने होत असते. तथापि बाबा रामदेव यांच्यासारखे वैदू या शास्त्रकाट्याच्या कसोटीस बगल देतात आणि आयुर्वेदाच्या पुण्याईवर आपली उत्पादने सामान्यांच्या गळ्यात मारतात. याकडे एकवेळ काणाडोळा करता आला असता. पण शास्त्रीय कसोटीवर जोखली न गेलेली आपली उत्पादने खपवताना आधुनिक वैद्यकाच्या नावे रामदेव आणि तत्सम बाबा ज्या कंड्या पिकवतात त्या खऱ्या आक्षेपार्ह. हे पाप दुहेरी. आधी आपली दुय्यम किंवा तिय्यम कथित औषधे जनसामान्यांच्या भावनेस हात घालून विकायची आणि त्याचवेळी जनतेने जी औषधे खरे तर घ्यायला हवीत त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण करायचा. त्यामुळे बाबा रामदेव यांस यावेळी ‘इंडियन मेडिकल कौन्सिल’ सारख्या संघटनेनेच न्यायालयात खेचले. यासाठी या वैद्यक संघटनेचे आभार मानावेत तितके थोडे. गेल्या खेपेस सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेवांच्या कथित औषधांवर जाहिरात बंदी केल्यावर दुसऱ्याच दिवशी बाबांच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाने ज्याबाबत बंदी घातली होती तीबाबतची विधाने केली गेली. वैद्यक संघटनेने हा तपशील न्यायालयात सादर केला. यावरून; “कोणतीही यंत्रणा आपले काडीचेही नुकसान करू शकत नाही” याची किती खात्री बाबा रामदेवांस आहे हे यावरून लक्षात येते. सत्ताधाऱ्यांच्या प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष आशीर्वादाखेरीज हे इतके धैर्य अंगी येणे अशक्य. त्यामुळे बाबा रामदेवांइतकेच त्यांचे सत्ताधारी आधारस्तंभही दोषी ठरतात. खरे तर ज्या उद्योगाचे उद्घाटन देशातील सर्वोच्च सत्ताधीशाहस्ते होते त्याच्या उत्पादनाने साऱ्या देशाला फसवले असे उद्गार सर्वोच्च न्यायालयास काढावे लागत असतील तर हे प्रकरण किती गंभीर आहे हे कळू शकेल. त्यामुळे या अशा बोगस बाबांची बनवेगिरी रोखण्यात न्यायालयास सुजाण आणि ज्ञानप्रेमी नागरिकांनी साथ द्यायला हवी. तिचा अभाव असल्याने हे असले उद्योग आणि बाबा सोकावतात. सर्वोच्च न्यायालयाच्या फटकाऱ्याने तरी या सर्वांचे डोळे उघडतील ही आशा.