डोळय़ांस पट्टी बांधून ‘राज्य’ घेण्यासही अनेक इच्छुक आणि ज्याच्यावर ‘राज्य’ आहे त्यास बिलगण्यासही अनेक इच्छुक; अशी स्थिती महाराष्ट्रात सध्या आहे..

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींची तुलना आंधळी कोशिंबीर या खेळाशी होऊ शकेल. अर्थात या खेळात एक निरागसता असते. ती सध्याच्या राजकीय हालचालींत अजिबात नाही. उलट निरागसतेच्या अगदी विरोधी भावना या राजकीय कोशिंबिरीत शिगोशीग भरलेली दिसते. आणखी एक फरक या आणि निरागस आंधळ्या कोशिंबिरीत आढळेल. या खेळात ज्याच्यावर ‘राज्य’ असते त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यास इतरांना स्पर्शून ‘बाद’ करावे लागते. राजकीय आंधळ्या कोशिंबिरीतील चित्र याच्या बरोबर उलट. लहानग्यांच्या या खेळात ‘राज्य’ कसे आपल्यावर येणार नाही, यासाठी स्पर्धा असते. येथे सर्व प्रयत्न राज्य आपल्यालाच कसे मिळेल याचे. त्यासाठी अनेक स्पर्धक स्वत:च्याच डोळ्यांस पट्टी आणि गुडघ्यांस बाशिंग बांधून तयार. लहानग्यांच्या आंधळ्या कोशिंबिरीत ज्यावर ‘राज्य’ येते त्याच्यापासून स्वत:स दूर राखण्याचा प्रयत्न अन्य स्पर्धकांचा असतो. येथे ही बाबही अगदी उलट. ज्याच्यावर राज्य आहे त्याच्या हातास आपण कसे लवकरात लवकर लागू असाच स्पर्धक खेळाडूंचा प्रयत्न या राजकीय आंधळ्या कोशिंबिरीत दिसतो. यामुळे एक विचित्र कुंठितावस्था राज्याच्या राजकारणात आलेली दिसते. डोळ्यांस पट्टी बांधून ‘राज्य’ घेण्यासही अनेक इच्छुक आणि ज्याच्यावर ‘राज्य’ आहे त्यास बिलगण्यासही अनेक इच्छुक; अशी ही विचित्र परिस्थिती. तिची दखल घ्यावी लागते याचे कारण हे असले बाल-शिशू राजकारण महाराष्ट्र पहिल्यांदाच अनुभवत असावा म्हणून.

यास जबाबदार एकमेव घटक. केंद्रीय यंत्रणांच्या सौजन्याने सत्ताधाऱ्यांच्या दबावास बळी पडून आपलेच घर स्वहस्ते भेदून घेणारे राजकीय नेते. याआधी महाराष्ट्राने कधी पक्षांतरे पाहिली नाहीत असे नाही. खुद्द बाळासाहेब ठाकरे हयात असतानाही शिवसेना फुटली आणि काँग्रेसच्या फुटींची तर मोजदाद नाही. तीच गत काँग्रेसच्या मुळांतून जन्मास आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही. तथापि गेल्या दोन वर्षांत जे काही झाले ते अभूतपूर्व होते. स्वत: अन्य पक्षांत जाण्याऐवजी पक्ष संस्थापकांनाच घराबाहेर काढण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी अनुभवला. त्याच्या बऱ्यावाईटाची चर्चा करण्याचे कारण नाही. राजकारणात प्रत्येक शेरास सव्वाशेर भेटत असतो या ‘न्यायाने’ जे काही झाले ते झाले. तथापि जे काही झाले त्याचा परिणाम असा की भाजपेच्छुक आणि भाजप-मार्गे सत्ताइच्छुक नेत्यांची संख्या कमालीची वाढली. एखाद्या छिद्र पडलेल्या होडीतील प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी त्यातल्या त्यात बऱ्या नौकेचा आधार घ्यावा आणि अशा आधार शोधणाऱ्यांची संख्या हाताबाहेर गेल्याने ती बरी नौकाही बाग-बुग करू लागावी असे भाजपचे होत असावे. त्या पक्षाकडे हौशे, नवशे, गवशे गर्दी करत होतेच. पण आता ज्येष्ठांतही ती स्पर्धा सुरू झाली असून भाजपच्या नौकेचे रूपांतर मुंबईतील गर्दीकालीन लोकलच्या डब्यात होते की काय, असे वाटण्याजोगी परिस्थिती दिसते. भाजपचे ‘श्री’ हे निवडणुकांचे कार्य सिद्धीस नेण्यास नि:संशय समर्थ आहेत हे खरे. पण त्यामुळे परिस्थितीचा गुंता उलट आणखी वाढतो. कसे ते लक्षात घ्यायला हवे.

उदाहरणार्थ ठाणे हा मतदारसंघ. हे उपनगर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यक्षेत्र. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचाच उमेदवार असावा ही अपेक्षा काही गैर नाही. खरे तर ही अगदी किमान अपेक्षा. पण मुख्यमंत्री असूनही शिंदे यांस ही साधी इच्छाही अद्याप तरी पूर्ण करता आलेली नाही. त्यांच्या पक्षाकडे उमेदवार नाही; सबब ही जागा आम्हास द्या असा भाजपचा युक्तिवाद. यातील पहिला भाग खराच. पण या निवडणुकांत पंतप्रधानांचा चेहरा हा एकमेव घटक निर्णायक ठरणार असेल तर शिंदे गटातील हा उभा राहिला काय किंवा तो राहिला काय? अखेर हा विजय भाजपचाच असणार. तेव्हा भाजपने इतके ताणायचे आणि स्वत:च आयात केलेल्या, स्वत:च प्राणप्रतिष्ठा केलेल्या ‘आपल्याच’ मुख्यमंत्र्यांवर ही वेळ का आणायची?

वास्तविक प्रतिपक्षासही स्वमिठीत घेण्याच्या भाजपच्या अलीकडे वारंवार दिसू लागलेल्या दुर्मीळ गुणांमुळे राष्ट्रवादीचे एके काळी भ्रष्टाचारी म्हणून हिणवले गेलेले, यांना पाडा असे आवाहन ज्यांच्याबाबत देशाच्या सर्वोच्च नेत्याने केले होते असे, ज्यांच्यावर तब्बल ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप होता असे इत्यादी अनेकांस भाजपने उदार अंत:करणाने प्रेमालिंगन दिले, त्यांना आपले म्हटले. असे असतानाही मग छगन भुजबळ यांच्यासारख्यांस नाशिक मतदारसंघातून उमेदवारी देण्यास भाजपने विरोध का बरे करावा? भले तो असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मतदारसंघ! पण ज्या उदार अंत:करणाने शिंदे आणि त्यांच्या साथीदारांस भाजपने आपले मानले, ज्या विशाल दृष्टिकोनातून अजित पवार आणि त्यांच्या सिंचन-सवंगड्यास भाजपने पापमुक्त केले, त्यांच्यासाठी भाजपने एवढेही करू नये, ही बाब दु:खदायक! यातून भाजप अन्य पक्षीयांस ते आत येईपर्यंत करकमलांनी कुरवाळतो आणि एकदा का ही मंडळी आत आली की त्यांस पदचरणांनी तुडवाळतो असे चित्र निर्माण होण्याचा धोका आहे. या ‘चारसो-पार’ जाणाऱ्या महायुतीची ही तऱ्हा. तिचेच प्रतिरूप तीस आव्हान देण्याच्या वल्गना करणाऱ्या महाविकास आघाडीतही दिसून येते. उद्धव ठाकरे यांची ‘मशाल’ कोणी हाती घ्यावी तर त्याच्या मुखी अचानक ‘तुतारी’ वाजू लागते आणि ती खाली ठेवावी तर समोर ‘पंजा’ उभा ठाकतो. त्यामुळे कोणी काय करावे आणि कोण काय करणार, याचा अंदाज अद्याप तरी या आघाडीच्या सूत्रसंचालकांस आहे, असे दिसत नाही. शिवसेना काय करते ते काँग्रेसला केल्यावर कळते आणि राष्ट्रवादी काय करू इच्छितो त्याची पूर्वकल्पना अन्य दोघांस असतेच असे नाही.

यास जबाबदार आहे ते भाजपचे घाऊकपणे पक्ष दुभाजनाचे राजकारण. इतका काळ भाजपस एकच पवार वा एकच ठाकरे यांस ‘हाताळावे’ लागत होते. आता पवारही दोन आणि ठाकरे दोन अधिक एक एकनाथ शिंदे. या घोळातल्या घोळात नक्की कुठे आहेत याबाबत चतुर संभ्रम निर्माण करणारे आणि तरीही हे कोणत्या मार्गाने कोठे जाणार आहेत याचा पुरता अंदाज सर्वांस आहे असे प्रकाश आंबेडकर, दिशा हरवून दशा झालेले रामदास आठवले आणि राज ठाकरे यांचे आपापले पक्ष, ओेवैसी यांची राखीव फौज आणि वर पुन्हा या सर्व पक्षांतले नाराज! हे एकत्र केले तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा जत्रेत भल्या मोठ्या पातेल्यांत शिजवला जाणारा खिचडा कसा झालेला आहे हे लक्षात येईल. इतके दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात उभय बाजूंनी ‘हम दो आणि हमारे (फार फार तर) दो’ इतक्याच युत्या, आघाड्या होत्या. तेव्हा कोणा दोघांत राजकीय संसाराची सुरुवात होत असे. पण अलीकडे मुळात संसाराची सुरुवातच तिघांनी होऊ लागली असून एकाचे दुसरा ऐकत नाही आणि दुसऱ्याचे तिसरा अशी स्थिती. त्यामुळे हे त्रिकोणांचे त्रांगडे हाताळायचे कसे हे उभय बाजूंनी कळेनासे झाले आहे. अखेर महाराष्ट्राच्या सुज्ञ मतदारांनाच यातील एकेक कोन कमी करावा लागेल. कारण अवघ्या ४८ जागांसाठी ही स्थिती तर पुढे होऊ घातलेल्या २४८ जागांच्या विधानसभा निवडणुकांत या त्रांगड्याची- आणि पर्यायाने महाराष्ट्राचीही- आणखीच त्रेधा उडणार हे निश्चित.