राहुल गांधींचे काय होणार हे त्यांचा पक्ष पाहून घेईल. त्यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात-स्थित न्यायालयांवर जे काही भाष्य केले त्याची चिंता मात्र आपण जरूर करायला हवी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दोन दिवसांनी का असेना, पण लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे सदस्यत्व पुनस्र्थापित केले ते योग्य झाले. त्यामुळे परत त्यासाठीची कज्जेदलाली टळली. राहुल गांधी यांना ‘मोदी’ बदनामीप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा जाहीर झाल्या झाल्या त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा, त्यापाठोपाठ त्यांचा बंगला काढून घेण्याचा प्रशासकीय झपाटा लोकसभा सचिवालयाने दाखवला तितकी गती या उलट प्रक्रियेत नव्हती, हे मान्य. तसे होणेही साहजिक म्हणायचे. सद्य:स्थितीत सर्वोच्च सत्ताधिकाऱ्यास न दुखावण्याचा कल सगळीकडेच दिसून येत असेल तर एखादे खाते त्यास अपवाद ठरेल असे मानणे हा भाबडा आशावाद झाला. जे झाले त्यामुळे खरे तर राहुल गांधी यांची राजकीय उंची वाढण्यास मदत झाली. हे साध्य करण्यासाठी राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षास प्रदीर्घ काळ जितके कष्ट करावे लागले असते त्याच्या काही अंश कष्टांत सत्ताधारी पक्षाने गांधी यांचे काम करून दिले. ‘मोदी’ आडनावावरून त्यांनी काही भाष्य केल्याने त्यांना शिक्षा झाली आणि पुढचे रामायण घडले. राहुल गांधी यांचे विधान असंस्कृत आणि बेजबाबदारपणाचे निदर्शक होते, असे भाजपचे म्हणणे. ते खरेच म्हणायचे. कारण ‘जर्सी गाय’, ‘५० कोटी रु.ची गर्लफ्रेंड’, ‘काँग्रेसी विधवा’ अशी सुसंस्कृत आणि अभिजात विधाने ऐकायची सवय झाल्यावर ‘मोदी’ आडनावावरून राहुल गांधी यांनी केलेले विधान त्या सर्वास फारच मचूळ आणि म्हणून हीन दर्जाचे वाटले असणे शक्य आहे. यासाठी सुरत न्यायालयाने राहुल यांस दोषी ठरवले आणि थेट दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. उच्च न्यायालयानेही ती कायम केली. पुढे सर्वोच्च न्यायालयाने ती स्थगित केली आणि म्हणून राहुल यांस पुन्हा संसदेत येऊ देण्यावाचून सत्ताधीशांस गत्यंतर राहिले नाही. अशा तऱ्हेने राहुल गांधी एकदाचे लोकसभेत येते झाले. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे जे काही भले व्हायचे आहे ते होईल. त्याची चिंता आपण वाहण्याचे कारण नाही. पण राहुल गांधी यांच्या खटल्याच्या सुनावणीच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाने गुजरात-स्थित न्यायालयांवर जे काही भाष्य केले त्याची चिंता मात्र आपण जरूर करायला हवी. एखाद्या राज्यातील न्यायालयांबाबत सर्वोच्च न्यायालयास अशी काही टिप्पणी करावी असे वाटत असेल तर ते निश्चितच गंभीर ठरते.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court comment on gujarat high court over in rahul gandhi case zws
First published on: 08-08-2023 at 03:49 IST