भावना शहारे
आपण अनेकदा म्हणतो “मुलं मोठी झाली की शिकतील, नोकरी करतील, स्वतः उभं राहतील.” पण खरं सांगायचं तर मुलं मोठेपणी जे काही करतात, त्याची पायाभरणी बालपणातच होते. जेव्हा एखादं मूल खेळतं, गोष्टी ऐकतं, काहीतरी रंगवतं, मित्रांशी बोलतं तेव्हा ते फक्त वेळ घालवत नाही, तर आयुष्यभर उपयोगी पडणाऱ्या गोष्टी शिकत असतं. म्हणूनच आयुष्याची खरी सुरुवात शिकण्यापासूनच होते आणि ती सुरुवात बालपणातच व्हायला हवी.

तीन ते सहा वर्षांचं वय हे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वात महत्त्वाचं असतं. या काळात मुलांची मेंदूविकासाची गती अतिशय जलद असते. या वयात त्यांना फक्त ओळख, वाचन किंवा लेखन शिकवायचं नसतं, तर विचार करायला, बोलायला, प्रश्न विचारायला आणि अनुभवातून शिकायला संधी द्यायची असते.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये या वयाला ‘मूलभूत स्तर’ (Foundational Stage) असं नाव दिलं आहे. या स्तरात पूर्वप्राथमिक शिक्षण आणि बालसंगोपन यावर भर देण्यात आला आहे. यात मुलांच्या शरीर, भावना, भाषा, विचार आणि कल्पकतेचा सर्वांगीण विकास व्हावा, हे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) यांनी तयार केलेल्या ‘पूर्वप्राथमिक शिक्षण आराखड्या’तही याच गोष्टींना विशेष स्थान दिलं आहे.

अंगणवाड्या या फक्त पोषण किंवा आरोग्य सेवा देणाऱ्या संस्था नसून, त्या मुलांच्या शिकण्याच्या प्रवासाची पहिली शाळा आहेत. इथे मुलं खेळतात, गाणी म्हणतात, चित्रं काढतात, गोष्टी सांगतात आणि गटात काम करतात. या सगळ्या क्रियाकलापांतून मुलं आयुष्यभर लागणाऱ्या कौशल्यांचं पायाभरण करतात. जेव्हा मुलं खेळतात उड्या मारतात, धावतात, चेंडू पकडतात तेव्हा ती फक्त मजा करत नाहीत. ती शरीराचा ताळमेळ, शिस्त आणि संयम शिकत असतात. गाणी म्हणणं, गोष्टी ऐकणं, संवाद साधणं यामुळे त्यांची भाषा समृद्ध होते आणि आत्मविश्वास वाढतो. पुढे कोणत्याही कामात बोलण्याचं आणि ऐकण्याचं कौशल्य फार महत्त्वाचं ठरतं.

अंगणवाडीत जेव्हा मुलं मोजणी, रंग, आकार, वर्गीकरण यावर काम करतात, तेव्हा ती विचार करायला आणि निरीक्षण करायला शिकतात. हीच सवय पुढे अचूकपणे काम करणं, निर्णय घेणं आणि जबाबदारीनं वागणं शिकवते. गटात खेळणं, गाणी म्हणणं, नाटकं करणं या क्रियाकलापांतून मुलं सहकार्य, वाटून घेणं आणि गटात निर्णय घेणं शिकतात. पुढे हेच टीमवर्क कोणत्याही नोकरीत, व्यवसायात किंवा उद्योगात उपयोगी ठरतं.

चित्रकला, हस्तकला, नृत्य, गाणी अशा सर्जनशील क्रियांमधून मुलं स्वतः विचार करून काहीतरी तयार करतात. त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि नवीन कल्पना मांडण्याची सवय लागते. हीच सर्जनशीलता पुढे त्यांना उद्योजकतेकडे किंवा नवीन काम सुरू करण्याकडे प्रेरित करते. अंगणवाडीत मुलांना स्वतःचं काम स्वतः करण्याची सवय लावली जाते खेळणी जागेवर ठेवणं, स्वतःची पिशवी सांभाळणं, मित्राला मदत करणं. या छोट्या जबाबदाऱ्या मुलांमध्ये स्वावलंबन आणि जबाबदारीची भावना निर्माण करतात. आयुष्यभरासाठी ही सवय त्यांच्यासोबत राहते. खेळ, गोष्टी आणि अनुभव यांच्या माध्यमातून मुलं जग पाहायला आणि समजून घ्यायला शिकतात. शिक्षण म्हणजे फक्त माहिती मिळवणं नव्हे, तर जगण्याचं कौशल्य मिळवणं. राष्ट्रीय शिक्षण धोरणात सांगितलं आहे की मुलांना लहानपणापासून विचार करायला, शोध घ्यायला आणि चुका करून शिकायला प्रोत्साहन द्यावं. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास, कल्पकता आणि समस्यांचं निराकरण करण्याची क्षमता वाढते.

या प्रवासात पालक आणि समाज यांची भूमिका महत्त्वाची आहे. फक्त सेविका शिकवून पुरेसं होत नाही. जेव्हा पालक मुलांशी बोलतात, खेळतात, त्यांना गोष्टी सांगतात, तेव्हा मुलांचं शिकणं अधिक खोलवर होतं. गावातील शेतकरी, कारागीर, बचतगटातील महिला, शिक्षक हे सगळे मुलांसाठी जिवंत उदाहरणं असतात. त्यांनी मुलांना आपलं काम दाखवलं, त्यांच्याशी संवाद साधला, तर मुलांना समजतं की शिकणं म्हणजे फक्त शाळेचं शिक्षण नाही, तर आयुष्याशी जोडलेलं ज्ञान आहे.

आज देशभरात ‘कौशल्य भारत अभियान’, ‘आत्मनिर्भर भारत’ अशा योजना राबवल्या जात आहेत. पण या योजनांसाठी खरा पाया बालपणातच घातला जातो. कारण लहान वयात रुजवलेली शिकण्याची सवय आणि काम करण्याची वृत्ती पुढे कोणत्याही क्षेत्रात उपयोगी पडते. कौशल्य विकास म्हणजे फक्त हाताचं काम नाही, तर विचार करण्याची, संवाद साधण्याची, निर्णय घेण्याची आणि जबाबदारी स्विकारण्याची तयारी आहे. ही सगळी कौशल्यं अंगणवाडीतच खेळता खेळता मुलांमध्ये विकसित होतात.

चार वर्षांचं मूल जेव्हा आत्मविश्वासानं गोष्ट सांगतं, मित्राला मदत करतं, किंवा नियम पाळून खेळतं, तेव्हा त्यानं फक्त खेळ नाही, तर आयुष्याचं पहिलं शिक्षण घेतलेलं असतं. अशी मुलं पुढे विचारशील, आत्मनिर्भर आणि जबाबदार नागरिक बनतात.

शिकण्यापासून उपजीविकेपर्यंतचा/रोजगारापर्यंत प्रवास मोठा आहे, पण त्याची पहिली पायरी अंगणवाडीच्या दारातूनच सुरू होते. लहान हातात शिकण्याची सवय, लहान मनात कुतूहल आणि लहान डोळ्यांत स्वप्नं हीच महाराष्ट्राच्या भविष्यासाठी खरी गुंतवणूक आहे. बालपणात रुजलेलं शिक्षण म्हणजे फक्त शालेय यश नव्हे, तर आयुष्यभर जगण्याची ताकद आहे.
लेखिका ‘मुक्तांगण एज्युकेशन ट्रस्ट’च्या नांदेड येथील ‘अंगणवाडी ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट’च्या समन्वयक आहेत.
bhavnashahare12@gmail.com