डॉ. किशोर पाकणीकर
या वर्षीच्या अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकाचा निकाल जाहीर होताच जगभरात चर्चा सुरू झाली. पुरस्कार जोएल मोक्यिर, फिलिप एघिऑन आणि पीटर ह्युविट या तीन नामांकित शास्त्रज्ञांना देण्यात आला. या तिघांनी दाखवून दिले की एखाद्या समाजाची खरी प्रगती केवळ संसाधनांवर अवलंबून नसते, तर त्या समाजात नवोन्मेषाची (इनोव्हेशन) भावना किती खोलवर रुजलेली आहे यावर अवलंबून असते. लोक जेव्हा नवनव्या कल्पना साकार करतात, जुनी पद्धत सुधारतात आणि काहीतरी वेगळे करून पाहतात, तेव्हाच अर्थव्यवस्था पुढे सरकते. त्यांनी या प्रक्रियेला ‘क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन’ असे नाव दिले आहे, म्हणजे जुन्या गोष्टी संपल्या तरी त्यातून काहीतरी नवीन जन्म घेते. बदल म्हणजे नाश नव्हे, तर नवा आरंभ आहे.

या विचारातून आपल्याला एक सोपा पण फारच खोल संदेश मिळतो. जर आपण नवीन कल्पनांना स्वीकारले नाही, तर आपण मागे पडतो. बदलाला विरोध करणारा समाज स्थिर दिसतो, परंतु प्रत्यक्षात तो मागे जात असतो. उलट, जो समाज धैर्याने नवे विचार स्वीकारतो, तोच खऱ्या अर्थाने प्रगत होतो. नोबेल पुरस्काराचा हा गाभा केवळ अर्थशास्त्रापुरता मर्यादित नाही, तर तो प्रत्येक क्षेत्रासाठी लागू होतो, मग ते विज्ञान, शिक्षण, प्रशासन, उद्योग किंवा वैयक्तिक जीवन असो.

आज अनेक समृद्ध देश वृद्धांची वाढती लोकसंख्या, मंदावलेली उत्पादनक्षमता आणि वाढती सामाजिक विषमता यांचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर नवोन्मेष म्हणजे त्या समाजासाठी प्राणवायू आहे. जुने मार्ग सोडून नवे विचार स्वीकारले, तर देश अधिक लवचिक, गतिमान आणि सक्षम बनतो. भारतासारख्या तरुण आणि उत्साही देशासाठी ही कल्पना अधिकच महत्त्वाची आहे. आपल्या देशात कल्पकतेचा खजिना आहे. फक्त त्याला योग्य दिशा, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले, तर भारत जगाचा नवोन्मेषक नेता होऊ शकतो.

भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. परंतु ही वाढ दीर्घकाळ टिकवायची असल्यास ती ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित असली पाहिजे. शिक्षण, संशोधन, पायाभूत सुविधा आणि डिजिटायझेशनमध्ये सातत्याने गुंतवणूक करणे अत्यावश्यक आहे. आपल्याकडे असलेल्या प्रतिभावान तरुणांना प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य आणि समाजाच्या गरजा ओळखून काम करण्याची संधी मिळाली, तर भारताची उंची जगाच्या नकाशावर निश्चितच वाढेल.

नवोन्मेष म्हणजे नेहमी मोठे प्रयोग किंवा मोठ्या प्रयोगशाळांतील संशोधन नव्हे. भारतासाठी नवोन्मेषाचा अर्थ आहे कमी खर्चात मोठा परिणाम साधणारे उपाय. शेतकऱ्यांसाठी स्वस्त सौरपंप, कमी वीज लागणारी यंत्रे, स्वच्छ पाण्यासाठी सोपे फिल्टर, लहान शहरांत आरोग्य तपासणीसाठी पोर्टेबल साधने ही सगळी उदाहरणे दाखवतात की नवोन्मेष साधेपणातही शक्य आहे. स्वच्छ ऊर्जेवर चालणाऱ्या बस, कचऱ्याचे पुनर्वापर करणाऱ्या यंत्रणा आणि पाण्याचे पुनर्वापर तंत्र हे सर्व दाखवतात की नवोन्मेष हा केवळ विज्ञानाचा भाग नाही, तो जीवनशैलीचा भाग बनू शकतो.

भारताने नवोन्मेषाचे अर्थशास्त्र वेगळ्या दृष्टिकोनातून समजून घ्यायला हवे. पश्चिमेकडील देशांमध्ये नवोन्मेषाचा उद्देश प्रामुख्याने आर्थिक वाढ असतो. परंतु भारतासाठी तो सामाजिक बदल आणि जीवनमान उंचावणे हा असावा. उदाहरणार्थ, ग्रामीण भागात शुद्ध पाणी उपलब्ध करून देणारे उपाय, लहान शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेवर चालणारे सिंचनपंप, कमी खर्चात रोगनिदान करणारी उपकरणे किंवा जैविक कचऱ्याचे खतामध्ये रूपांतर करणारी तंत्रे ही केवळ तांत्रिक नव्हेत, तर सामाजिक नवोन्मेषाची उदाहरणे आहेत. अशा कल्पना समाजात समता आणि आत्मनिर्भरता वाढवतात.

नवोन्मेषाची प्रक्रिया नेहमी ‘वरून खाली’ चालते असे नाही. अनेकदा नवे विचार समाजाच्या तळातून निर्माण होतात. गावातील कारागीर, शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी किंवा लघुउद्योजकांकडे असणाऱ्या कल्पना आश्चर्यकारक असतात. त्यांना तांत्रिक मदत आणि संधी मिळाली, तर त्या कल्पना मोठ्या शोधांमध्ये रूपांतरित होऊ शकतात. म्हणून शासन आणि उद्योग यांनी अशा लोकांसाठी ‘इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटर्स’ स्थापन करणे आवश्यक आहे. तिथे त्यांच्या कल्पनांना दिशा मिळेल, तांत्रिक व आर्थिक मदत मिळेल आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळेल.

नवोन्मेष फुलण्यासाठी सर्वांत मोठी गरज आहे खुल्या मनाची. नवीन कल्पना नेहमी जुन्या चौकटींना आव्हान देतात आणि म्हणूनच त्या सुरुवातीला विरोधाला सामोऱ्या जातात. परंतु इतिहास सांगतो की विरोधाच्या मातीमध्येच बदलाची बीजे रुजतात. आपण वेगळ्या विचारांना ऐकण्याची, समजून घेण्याची आणि त्यांना संधी देण्याची तयारी ठेवली, तरच आपण नवोन्मेषक समाज म्हणून पुढे येऊ शकतो. खुले मन म्हणजे फक्त सहनशीलता नव्हे, तर दुसऱ्याच्या विचारातून शिकण्याची तयारीही आहे.

आपल्या समाजातील आणखी एक अडथळा म्हणजे अपयशाची भीती. ‘अपयश म्हणजे अपमान’ असा विचार आपल्या मनात खोलवर बसलेला आहे. परंतु नवोन्मेषात अपयश हा प्रवासाचा अविभाज्य भाग असतो. जगातील अनेक प्रसिद्ध शोध अपयशांच्या मालिकेतूनच पुढे आले आहेत. थॉमस एडिसनने एकदा म्हटले होते, ‘मी अपयशी झालो नाही, मी फक्त हजार मार्ग शोधले जे उपयुक्त ठरत नाहीत.’ ही वृत्तीच खरी वैज्ञानिक वृत्ती आहे. जेव्हा आपण अपयशातून शिकतो, तेव्हाच खरी प्रगती सुरू होते.

आज जगात कल्पना, ज्ञान आणि माहिती यांचे प्रवाह सीमांच्या पलीकडे गेले आहेत. भारताने या प्रवाहांत सक्रिय भूमिका घेतली पाहिजे. आपल्या संशोधन संस्थांनी आणि उद्योगांनी जगभरातील प्रयोगशाळांशी सहकार्य केले, तर भारताचे नाव जागतिक विज्ञानात अधिक ठळक होईल. हवामान बदल, ऊर्जा सुरक्षा, अन्नसाखळी, जलव्यवस्था आणि आरोग्य या क्षेत्रांत भारतात होत असलेले प्रयोग जगाला दिशा देऊ शकतात.

परंतु केवळ तंत्रज्ञानाने प्रगती होत नाही. समाजात नवोन्मेषाची संस्कृती रुजली पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात, शिक्षण, प्रशासन, उद्योग किंवा गावपातळीवरील कामांत नवीन विचारांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे. समाजात ‘हे आधीच चालते आहे, बदलायची गरज नाही’ असा विचार प्रचलित आहे. परंतु हीच मानसिकता प्रगतीला अडवते. बदलासाठी धैर्य, प्रयोग करण्याची तयारी आणि खुले मन या तीन गोष्टी नवोन्मेषाची खरी पायाभरणी करतात.

नवोन्मेष फक्त काही मोजक्या लोकांपुरता मर्यादित नसावा. तो लोकशाहीसारखा सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणूनच ‘डिजिटल इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ सारखे कार्यक्रम महत्त्वाचे आहेत. ते फक्त आर्थिक वाढीसाठी नाहीत, तर नवोन्मेषाला सर्वसामान्यांच्या हातात देण्यासाठी आहेत. जेव्हा एखाद्या तरुणाच्या मनात निर्माण झालेली कल्पना समाजासाठी फायदेशीर ठरते, तेव्हाच देशाची खरी शक्ती प्रकट होते.
भारतात नवोन्मेषासाठी ‘शाळा ते उद्योग’ असा सलग प्रवास घडवावा लागेल. लहानपणापासूनच मुलांना प्रश्न विचारण्याची, प्रयोग करण्याची आणि कल्पना मांडण्याची सवय लावली पाहिजे. महाविद्यालयात ‘इनोव्हेशन क्लब्स’ सुरू व्हावेत. उद्योगांनी शैक्षणिक संस्थांना प्रत्यक्ष प्रकल्प देऊन नव्या कल्पनांना वाव द्यावा. शासनाने अशा कल्पनांना आकार देण्यासाठी निधी, मार्गदर्शन आणि संरक्षण पुरवावे. अशा एकत्रित प्रयत्नांतूनच नवोन्मेषाची चळवळ व्यापक होईल.

विज्ञान आणि समाज यांच्यात संवाद अत्यंत आवश्यक आहे. संशोधकांनी आपल्या कामाबद्दल लोकांशी संवाद साधला पाहिजे. जेव्हा विज्ञान प्रयोगशाळेच्या भिंती ओलांडून लोकांच्या जीवनात पोहोचते, तेव्हाच त्याचा खरा अर्थ साकार होतो. नवोन्मेष म्हणजे लोकांसाठी बदल घडवणारा प्रयत्न आहे. म्हणून तो लोकांच्या सहभागाशिवाय शक्य नाही.

नोबेल समितीचा संदेश स्पष्ट आहे. स्थिरता म्हणजे मागे जाणे आणि बदल म्हणजे वाढ. जो समाज बदलांना घाबरत नाही, तोच भविष्य घडवतो. भारताकडे ज्ञान आहे, कौशल्य आहे आणि अपरंपार क्षमता आहे. आता गरज आहे ती धैर्याने नवोन्मेष स्वीकारण्याची. नवोन्मेष म्हणजे केवळ नवीन यंत्र, तंत्र वा प्रयोग नव्हे. ती विचार करण्याची वृत्ती आहे, जी सांगते की ‘जग बदलते आहे, आपणही बदलू या.’ जर आपण हा बदल मनापासून स्वीकारला, मन खुले ठेवले आणि प्रयोगशीलतेला सन्मान दिला, तर भारताचा प्रवास आत्मनिर्भरतेपासून नवोन्मेषावर आधारित प्रगतीकडे होईल. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने श्रीमंत असा देश बनू.

kpaknikar@gmail.com
(लेखक पुणे येथील आघारकर संशोधन संस्थेचे माजी संचालक आणि आयआयटी मुंबई येथे अभ्यागत प्राध्यापक आहेत.)