आयपीएल २०२५ मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुच्या विजयाचा आपल्याला राजकीय लाभ होईल, असे कर्नाटक काँग्रेसला वाटले असावे. परंतु ते दुर्दैवी ठरले. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला असता तर कदाचित, ते गेलेली पत पुन्हा प्राप्त करू शकले असते. पण त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा बळी देण्याचा आणि आरसीबीचा संघ व व्यवस्थापकांवर खापर फोडण्याचा पर्याय स्वीकारला! हा अतिशय स्वार्थी निर्णय होता आणि नक्कीच काँग्रेस पक्षावर उलटू शकतो.

वेस्ट इंडिजचे लेखक व्ही. एस. नायपॉल यांनी क्रिकेटला एक विशेष स्थान असल्याचे म्हटले होते, कारण या खेळाने त्यांच्या देशातल्या नागरिकांवर जादू केली होती. ते म्हणाले होते, ‘वेस्ट इंडिज म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे वेस्ट इंडिज.’ या शतकात ती भूमिका भारत पार पाडत असल्याचे दिसते. धार्मिक विद्वेषाने गेल्या दशकात अर्ध्या देशाला वेढा घातला. पण क्रिकेटप्रेम मात्र मला आठवते तसे देशातील जवळपास सर्व नागरिकांच्या मनात खोलवर रुजलेले आहे. भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामना खेळतो तेव्हा आपल्या सर्वांचे डोळे टीव्हीच्या पडद्याला चिकटलेले असतात. मी मुंबईत जन्मलेला आणि आता ९६ वर्षे वय असलेला नागरिक आहे. पण ‘मुंबई इंडियन्स’चा (एमआय) सामना असतो, तेव्हा मीदेखील तो न चुकता पाहतो.

सुशोभा बर्वे नावाच्या एका महाराष्ट्रीय महिलेने ‘सांप्रदायिक सलोखा’ हे आपल्या आयुष्याचे ध्येय म्हणून स्वीकारले आहे. त्यांनी मुंबई शहरातल्या पोलीस ठाण्यांत टेनिस-बॉल क्रिकेट सामने खेळवण्यात यावेत अशी कल्पना सुचवली होती. पोलीस आणि शहरातल्या तरुणांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण व्हावेत, हा त्यामागचा उद्देश होता. झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि एकमेकांचा द्वेष करणाऱ्या दोन समुदायांतल्या तरुणांचा या उपक्रमात सहभाग असावा, असा त्यांचा आग्रह होता. प्रत्येक पोलीस ठाण्याने एक अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी प्रतिनिधी म्हणून निवडणे अपेक्षित होते. स्थानिक मोहल्ला समितीचे सदस्य संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीतल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या तरुणांतून १८ ते २५ वर्षे वयोगटातल्या तरुणांची निवड करतील, अशी योजना होती.

आता हे तरुण दरवर्षी या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. दोन समुदायांतील वाद शमवणे आणि त्याच वेळी झोपडपट्टीवासीय आणि पोलीस यांच्यातला दुरावा कमी करणं ही दोन्ही उद्दिष्टे त्यातून साध्य झाली. दोन गटांना एकत्र आणण्याच्या क्रिकेटच्या क्षमतेची ही यशस्वी चाचणी ठरली. तो प्रयोग आता काळाच्या कसोटीवर सिद्ध झाला आहे. विशेषत: शहरांतील दंगलप्रवण भागांत. जिथे वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वत: सहभागी झाले, तिथे याचे अधिक चांगले परिणाम दिसतात.

आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) टी-२० क्रिकेट संघ काही प्रमाणात राज्यांच्या (गुजरात, राजस्थान, पंजाब) स्तरावर परंतु बहुतांश प्रमाणात शहर स्तरावर (मुंबई, बेंगळूरु, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, लखनऊ) उभारण्यात आले आहेत. या व्यवस्थेचे सौंदर्य असे, की प्रत्येक संघातले खेळाडू भारतभरातून आणि अगदी परदेशातूनही लिलावाद्वारे निवडले जातात. या वर्षी स्पर्धा जिंकणाऱ्या आरसीबी (रॉयल चॅलेंजर्स, बेंगळूरु) संघात बेंगळूरु किंवा कर्नाटक राज्यातला एकही खेळाडू नव्हता. तरीही, राज्यातल्या रहिवाशांचे आणि तिथल्या सरकारचं वर्तन संघावर मालकी हक्क असल्यासारखे होते.

कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने आरसीबीचे यश आनंदाने साजरे केले आणि बेंगळूरु विमानतळावर या संघाचे आगमन होताच संपूर्ण संघाला बसने विधानसौधात (कर्नाटकातील विधान भवन) नेण्याचा आदेश काढला. तिथे कॅबिनेट मंत्री आणि इतर आमदारांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. त्यांनी पोलिसांना फोनवर तोंडी आदेश दिले की, ‘बंदोबस्ता’साठी पुरेसा वेळ नाही, हे आम्ही जाणतोच, मात्र तरीही संपूर्ण सहकार्य करा.

विजेत्या संघाने आधीच इन्स्टाग्रामवरच्या एका संदेशात म्हटले होते की, विजयी मिरवणूक आयोजित करण्यात यावी. हा संदेश त्या दिवशी सकाळी सात वाजता देण्यात आला. विधानसौधात संघाचा सत्कार सकाळी साडेदहा वाजता करण्याची योजना आखण्यात आली. क्रिकेटमधल्या विजयात प्रत्येक समर्थकाला, अगदी ज्यांनी कधीही बॅट वा बॉलला हातही लावलेला नाही, अशांनाही प्रफुल्लित करण्याची क्षमता असते.

मुख्यमंत्र्यांना अर्थातच अपेक्षा होती की पोलीस आयुक्त या प्रसंगी सक्षमपणे उभे राहतील. पण ही दुर्दैवी दुर्घटना घडली, तेव्हा त्यांनी ताबडतोब जबाबदारी झटकून टाकली आणि आयुक्त व खालील श्रेणीतील आणखी चार जणांना निलंबित केले. आता आपत्तीला कारणीभूत ठरलेल्या घटनांच्या विविध पैलूंची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे. असे केल्याने आपल्यावरचे आणि आपल्या सरकारवरचे संकट टळेल, असे मुख्यमंत्र्यांना वाटले असावे.

पोलिसांना अधिक चांगली कामगिरी बजावता आली असती, असे मलाही वाटते, मात्र सरकारने विधानसौधात स्वागत समारंभ आयोजित करून पोलिसांवरचा भार विनाकारण वाढवला. त्या ठिकाणी बरेच कर्मचारी तैनात करावे लागले असतील. तिथे छोटीशी दुर्घटना घडली असती, तरी सारे काही उद्ध्वस्त झाले असते. सरकारला आणि सरकार चालवणाऱ्या पक्षाला आरसीबीच्या विजयाचे श्रेय हवे होते, तर त्यांनी स्टेडियमवर झालेल्या दुर्घटनेची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे. पंडित नेहरू पंतप्रधान असताना मोठा रेल्वे अपघात झाला तेव्हा माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री रेल्वेमंत्री होते. अतिशय कर्तव्यदक्ष व्यक्ती असलेल्या शास्त्रींनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता.

मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी किंवा अधिक नेमकेपणाने सांगायचे तर विधानसौधमध्ये झालेल्या कार्यक्रमात खेळाडूंच्या डोक्यावर फेटे बांधताना आणि खांद्यावर शाल पांघरताना ठळकपणे दिसले, त्या उपमुख्यमंत्र्यांनी पायउतार होणे अपेक्षित होते. त्यातून जनक्षोभ शांत झाला असता.

आरसीबी संघ व त्याच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हे नोंदवण्याची मुख्यमंत्र्यांनी आणि पोलिसांनी फारसा विचार न करता जी तातडी दाखवली ती अत्यंत दु:खद आहे, एवढे तरी निश्चितच म्हणावे लागेल. माझी आशा आहे की शहाणपणाचे सल्ले प्रभावी ठरतील आणि विराट कोहली व त्याचे संघसहकारी यंदा आयपीएल चषक जिंकल्याबद्दल वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत डांबले जाणार नाहीत!

फक्त ३५ हजार प्रेक्षक बसू शकतील अशा चिन्नस्वामी स्टेडियममध्ये तीन लाख क्रिकेटप्रेमींची गर्दी लोटल्याचे वृत्त आहे. ते गृहीत धरणे गरजेचेच होते. राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वत: पोलीस व्यवस्थेवर लक्ष ठेवणे आवश्यक होते. एवढ्या मोठ्या गर्दीला हाताळण्याचा मुंबई शहर पोलिसांना बराच अनुभव आहे. १९८३ मध्ये लॉर्ड्स येथे झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामान्यात वेस्ट इंडिजवर विजय मिळवून कपिलदेव यांचा संघ परतला तेव्हा मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यापासून ते जिथे अंतिम सोहळा पार पडला होता, त्या वानखेडे स्टेडियमपर्यंत विजेत्यांचे स्वागत करण्यासाठी प्रचंड गर्दी लोटली होती.

२००७ मध्ये जेव्हा भारताने दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे खेळला गेलेला टी-२० विश्वचषक जिंकला तेव्हा सांताक्रूझ विमानतळावरून दक्षिण मुंबईतील स्टेडियमकडे जाणाऱ्या या वीरांना अधिकाधिक चाहत्यांना पाहता यावे, त्यांचे स्वागत करता यावे, यासाठी एका खुल्या डबल-डेकर बसची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळेच स्टेडियमकडे जाणाऱ्या अनेकांना आधीच पांगवणे शक्य झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लेखक मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत.