उज्वलकुमार म्हस्के
महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्ह्यांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रामुख्याने जून महिन्याच्या मध्यावर होते. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील पालकांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा हा एक मोठा पर्याय बनला आहे. एकेकाळी ‘सरकारी शाळा’ म्हणजे दुर्लक्षित, खचलेली आणि मागे पडलेली अशी समाजाची समजूत होती, ती आज हळूहळू बदलत चालली आहे. हे चित्र बदलण्यासाठी अनेक शिक्षक, स्थानिक समाज आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी एकत्र येऊन नवनिर्मितीचा इतिहास घडविला आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांचा कायापालट

गेल्या काही वर्षांत अनेक जिल्हा परिषद शाळांनी स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. शिक्षकांनी आपल्याच पगारातून शाळा रंगविल्या. स्मार्ट टिव्ही, प्रोजेक्टर, संगणक, ई-लर्निंग साहित्य खरेदी केले. काही ठिकाणी ग्रामपंचायत, स्थानिक दाते, एनजीओ आणि माजी विद्यार्थ्यांनी मिळून भक्कम पाठिंबा दिला.

छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जळगाव मेटे येथील जिल्हा परिषद शाळा लोकसहभागातून आमूलाग्र बदल घडवून आणणारी शाळा ठरली आहे. बीड जिल्ह्यातील संदीप पवार सर यांची जरेवाडीची जिल्हा परिषद शाळा ही राज्यातील प्रसिद्ध अशी विविध उपक्रमशील आदर्श शाळा म्हणून घडविली गेली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील पिंपळनेरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने संपूर्ण डिजिटल शिक्षण प्रणाली उभी करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. त्या धर्तीवर पुणे, सोलापूर, सातारासह गडचिरोली, यवतमाळ अशा दुर्गम भागातही शिक्षकांनी नवे प्रयोग सुरू केले आहेत.

संगणकीय शिक्षणात आघाडीवर

‘डिजिटल इंडिया’ संकल्पनेचा ग्रामीण महाराष्ट्राने योग्य अर्थाने स्वीकार केला आहे. अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये आज स्मार्ट क्लासरूम, इंटरनेट-सुविधा, टॅब्लेट, आणि डिजिटल कंटेंटसह शिक्षण दिले जाते. मुलं ‘कोडिंग’, ‘सॉफ्ट स्किल्स’, ‘ऑनलाइन क्विझ’ अशा कौशल्यांमध्ये पारंगत होत आहेत. यातून शहरी आणि ग्रामीण भागातील तफावत कमी होत असल्याचं चित्र आहे.

सेमी इंग्रजी शिक्षणाची भरारी

गावातील मुलांना मातृभाषेच्या आधारावर शिकवूनही इंग्रजीसारख्या आंतरराष्ट्रीय भाषेची तयारी करून देणे हे आव्हान होते. त्यासाठी ‘सेमी इंग्रजी’ माध्यम ही उत्तम संकल्पना ठरली. अनेक जिल्हा परिषद शाळांनी प्राथमिक स्तरापासून विज्ञान, गणित, संगणक या विषयांचे इंग्रजी माध्यमात अध्यापन सुरू केले आहे. या प्रयोगामुळे ग्रामीण मुलांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आहे. सन २०२५-२६ पासून जिल्हा परिषद शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्ननुसार इयत्ता पहिलीपासून इंग्रजी शिकविले जाणार आहे. ही जिल्हा परिषद शाळांसाठी एक नवीन उपलब्धी ठरणार आहे.

सर्वांगीण विकासाचे केंद्रबिंदू

जिल्हा परिषद शाळांमध्ये अभ्यासाबरोबरच विविध सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडा, आणि वैज्ञानिक उपक्रमांची रेलचेल आहे. शालेय साहित्य संमेलन, विज्ञान प्रदर्शन, आनंद नगरी, स्नेह संमेलन, योग शिबिरे, बालसभांद्वारे मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवून आणला जात आहे.

पुणे जिल्ह्यातील ध्येयवेड्या दत्तात्रय वारे गुरुजींनी वाबळेवाडीची शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची बनविली आहे. बीड, अहिल्यानगर जिल्ह्यातील काही शाळांनी ‘कविता वाचन मंच’,‘बालविज्ञान परिषद’, ‘कृषी प्रयोगशाळा’, ‘क्लायमेट क्लास’ असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला नवे पंख दिले आहेत.

शासकीय सुविधा आणि सुशोभीकरण

सरकारच्या माध्यमातून ‘मध्यान्ह भोजन योजना’, ‘मोफत पाठ्यपुस्तके’, ‘गणवेश योजना , विविध शिष्यवृत्ती योजना,उपस्थिती भत्ता,‘शालेय वाहतूक भत्ता’ आदी योजनांचा लाभ ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळत आहे. याशिवाय शिक्षकांनी स्वखर्चातून आणि सीएसआर फंडाच्या साहाय्याने शाळांचे कॅम्पस सुंदर, रंगीबेरंगी, स्वच्छ आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे बनवले आहेत.

“एका रंगीबेरंगी भिंतीवर लिहिलेलं स्वप्न एखाद्या बालकाच्या आयुष्याला दिशा देऊ शकतं” – या विचारांना अनुसरून अनेक शिक्षकांनी शाळा आकर्षक केल्या आहेत.

पालकांचा विश्वास

अनेक पालक आता खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषद शाळांकडे वळत आहेत. त्यांच्या मते, केवळ फी कमी असण्यामुळे नव्हे तर गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञान साक्षरता आणि विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांची तळमळ यामुळे जिल्हा परिषद शाळा अधिक विश्वसनीय बनल्या आहेत. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी राज्यस्तरावर चमकत आहेत. शासनाच्या विविध उपक्रमात या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रात आदर्श ठरलेल्या अनेक शाळांना भेटी देण्यासाठी इतर राज्यातून शिक्षक,अधिकारी शिष्टमंडळे येत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे जिल्हा परिषदेच्या शाळांचे वैशिष्ट्य ठरले आहे.

“गरिबांचा नव्हे, गुणवत्तेचा ब्रँड” – हे आज जिल्हा परिषद शाळांचे प्रतिमा-वाक्य ठरू शकते. शिक्षक, पालक आणि समाज यांच्या सहकार्याने या शाळा केवळ गावातील नव्हे तर राज्याच्या, देशाच्या उज्ज्वल भविष्याची शैक्षणिक शिदोरी ठरत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हा परिषद शाळांनी शिक्षणात सामाजिक समता, आर्थिक न्याय, आणि संधींची समानता या बाबतीत समाजाला दिलेला धडा विसरता येणार नाही.ही शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचं केंद्र नसून परिवर्तनाचं साधन बनत चालली आहे. यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याचा विश्वासाने हात धरून त्याला जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकवावे –हीच आपल्या उज्वल भविष्यासाठी पहिली पायरी ठरेल.
ujwalkumar429@gmail.com