सोने हे एक गुंतवणुकीचे साधन आहे आणि अन्य गुंतवणुकींप्रमाणे त्याच्याही दरात चढउतार होऊ शकतो असे अनेक अर्थतज्ज्ञांना वाटू लागले आहे. त्यामुळेच सोन्याचा विचार पारंपरिक प्रघातांपलीकडे जाऊन करावयास हवा, असा त्यांचा सल्ला आहे.
अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हचे, म्हणजे त्या देशाच्या रिझव्‍‌र्ह बँकेचे, प्रमुख बेन बर्नाके ही जागतिक वित्तीय व्यवस्थापनाच्या अनुषंगाने एक अतिमहत्त्वाची व्यक्ती. डॉलर हे अमेरिकेचे राष्ट्रीय चलन असले तरी ते जागतिक चलनही आहे आणि फेडच्या प्रमुखाकडे या जागतिक चलनाच्या व्यवस्थापनाची सूत्रे असतात, हे लक्षात घेता बर्नाके यांचा अधिकार लक्षात यावा. अशा अत्यंत महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीस नुकतेच सोन्याच्या घसरत्या दराबद्दल विचारण्यात आले. मुद्दा असा होता की अमेरिका हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठेदार देश आहे आणि तरीही अजूनही आहे ते सोने कमी करावे असे त्या देशास का वाटत नाही. टेक्सास येथील रिपब्लिकन लोकप्रतिनिधी रॉन पॉल यांनी नेमका हाच प्रश्न बर्नाके यांना विचारला. निमित्त होते ते आर्थिक घसरणीचे. अशा वेळी अमेरिकी सरकारने आपल्याकडील अतिरिक्त सोने साठा बाजारात विकून चार पैसे कमावण्याची गरज होती. पण ते झाले नाही. त्या संदर्भातच फेडप्रमुख बर्नाके यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यास त्यांनी एका शब्दांत उत्तर दिले. ते म्हणजे परंपरा. सोने खरेदी करीत राहावे आणि साठवून ठेवावे असे काहीही विशेष कारण नाही. तरीही ते केले जाते याचे कारण म्हणजे फक्त परंपरा, असे बर्नाके म्हणाले. फक्त सोन्याच्याच बाबतीत ही परंपरा तयार का झाली यामागेही महत्त्वाचे कारण आहे. ते असे की सोन्यास जवळपास चार हजार वर्षांचा इतिहास आहे आणि या काळात सोन्याने कधीही धक्के दिलेले नाहीत. सोने कधीही प्रचंड प्रमाणात उपलब्ध झाले नाही वा सोन्याची प्रचंड टंचाईही कधी निर्माण झाली नाही. सोन्याने बाजारपेठीय उपलब्धता-अनुपलब्धता या खेळात कधीही सहभाग घेतलेला नाही आणि त्यामुळे सोन्यास कायमच एक आदरयुक्त पाठिंबा सातत्याने राहिलेला आहे.
त्याचमुळे बेन बर्नाके यांचे हे उत्तर विद्यमान वातावरणात आपल्याकडेही चपखल लागू व्हावे. अमेरिका आज जगातील सर्वात मोठा साठेदार असून त्या देशाकडे तब्बल ८१३३ टन इतके सोने आहे. आजमितीला याची किंमत जवळपास ३२,७०० कोटी डॉलर्स इतकी होते. परंतु अर्थव्यवस्था ओढग्रस्त आहे म्हणून सोने विकून चार पैसे गाठीला बाळगावेत असे त्या देशास वाटले नाही. अमेरिकेच्या खालोखाल सर्वाधिक सोने साठा, ३७४५ टन इतका, जर्मनीकडे आहे. यातील बराचसा अमेरिकेतच ठेवून देण्यात आला असून त्याचे कारण दुसऱ्या महायुद्धोत्तर शीतयुद्धात आहे. त्या वेळी सोविएत रशियाच्या आक्रमणाची फिकीर असल्याने जर्मनीने आपला मोठा सोने साठा हा अमेरिकेत ठेवून दिला. हेतू हा की रशियाचे आक्रमण झालेच तर हे सोने शत्रुपक्षाच्या हाती लागू नये. युरोपीय खंडाच्या आर्थिक तंगीतील काही दिवस जर्मनी या देशासही कठीण गेले. परंतु त्या देशानेही सोने विकून पैसे उभे करण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचेही कारण बर्नाके यांनी दिले तेच आहे. परंतु आता सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली ती हे दोन देश सोने साठा विक्रीस काढणार असल्याच्या वृत्तामुळेच. तसे अर्थातच झाले नाही. पण परिणाम व्हायचा तो झालाच. अमेरिका वा जर्मनीबाबत ही अफवा उठली याचे कारण सायप्रस. युरोपीय खंडात आर्थिक विवंचनेने काहूर उठलेले असून त्यास जबाबदार असणाऱ्या अनेक देशांमध्ये सायप्रस या किंचित देशाचा मोठा समावेश आहे. या देशाचे कर्ज त्याच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कैक पटींनी वाढलेले असून ते कसे फेडले जाणार, हा जागतिक चिंतेचा विषय झालेला आहे. या दिवाळखोरीतून बाहेर पडण्यासाठी युरोपीय बँकेने सायप्रससाठी मदत योजना जाहीर केली. अशी मदत ही कडक अटी घेऊन येते. सायप्रस या देशास त्या अटी जाचक वाटतात. तेव्हा त्यास पर्याय म्हणून स्वत:च्या मालकीचे सोने विकावयाचे आणि पैसे उभे करायचे असा पर्याय या देशाने निवडल्याची वार्ता सर्वत्र पसरली आणि त्यामुळे सोन्याच्या भावात मोठय़ा प्रमाणावर घसरण सुरू झाली. वास्तवात यात नवीन काही नाही. अशाच आर्थिक संकटात सापडलेल्या स्पेनने २००० सालापासून आपल्या मालकीचा सोन्याचा साठा जवळपास निम्म्याने कमी केला. तेव्हापासून ४६ टक्के सोन्याची विक्री या देशाने केलेली आहे. परंतु स्पेनने हे टप्प्याटप्याने केले. त्यामुळे जागतिक सुवर्ण बाजारावर त्याचा तितका परिणाम झाला नाही. परंतु सायप्रसचा झाला. कारण सायप्रस एकगठ्ठा सोने विक्री करू पाहत होता.
या काळात अर्थातच अन्य देश सोन्याची खरेदी करीत राहिले. त्याचेही कारण अर्थातच बर्नाके म्हणतात त्याप्रमाणे परंपरा हेच आहे. भारतासारख्या वातावरणात तर ते कारण अधिकच लागू पडते. गेल्या दोन वर्षांतील आकडेवारी हे कारण अधोरेखित करते. २००८ साली ६७९ टन इतके सोने भारताने आयात केले होते तर २०११ साली हेच प्रमाण ९७५ टनांवर गेले. या सोने आयातीतील महत्त्वाचे परकीय चलन जळत असल्याने त्याचा परिणाम अखेर आपल्या चालू खात्यातील तुटीवर झाला आणि अखेर सोने खरेदीवर अधिक शुल्क आकारण्याची वेळ केंद्र सरकारवर आली. परंतु आता जागतिक बाजारातच सोन्याचे भाव गडगडल्याने भारतीयांच्या सुवर्णहव्यासाने अचानक उसळी घेतली आणि देशभरात गेल्या काही दिवसांत हजारो किलो सोन्याची विक्री झाली. पुढील महिन्यात अक्षय्य तृतीया आणि लग्नसराईचा हंगाम लक्षात घेता यात आणखी काही हजार किलोंनी वाढ होईल यात शंका नाही.
हे असे होते याचे साधे कारण म्हणजे सर्वसामान्यास अजूनही सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित वाटते. परंतु या सर्वमान्य गृहीतकाचाच फेरविचार करण्याची वेळ आली आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. सोन्याच्या किमती कायम फक्त वर वरच जातात असे मानण्याचा प्रघात आहे आणि त्यामुळे अडीअडचणीच्या वेळेसाठी असावे म्हणून अनेक घरांत जमेल तसतसे सोने साठवले जाते. परंतु सोने हे फक्त गुंतवणुकीचे साधन आहे आणि अन्य गुंतवणुकींप्रमाणे त्याच्याही दरात चढउतार होऊ शकतो असे अनेक अर्थतज्ज्ञांना वाटू लागले असून त्यामुळे सोन्याचा विचार पारंपरिक प्रघातांपलीकडे जाऊन करावयास हवा, असा त्यांचा सल्ला आहे. अर्थात आपल्याकडे या प्रघातास तितक्याच सबळ समजाचा छेद जातो. त्यानुसार कितीही संकट आले तरी सोने विकून पैसा उभा करणे हे आपल्याकडे अशुभ मानले जाते. या शुभाशुभाच्या धुवट कल्पनांमुळे ज्या उद्दिष्टांसाठी सोन्यात गुंतवणूक केली जाते ते उद्दिष्टच फसते आणि सोने हे केवळ बँकेतील लॉकर्सची भर करण्यापुरतेच उरते.
हे वास्तव आहे. तेव्हा या सोन्यात किती अडकायचे याचा बुद्धिनिष्ठ विचार रुजवण्याची आपल्याकडे गरज आहे. नपेक्षा केवळ मुहूर्तासाठी रांगा लावून सोने खरेदी करणारे गुरुपुष्याचे बळी वाढतच जातील.