२९०. नामौषधी!

मनुष्याचा देह लाभूनही जो नामविन्मुख आहे तो श्वापदासारखाच आहे, असंही तो फटकारतो.

‘मनोबोधा’चा ९०वा श्लोक नामाची महती गाऊन केवळ थांबत नाही, तर ज्याच्या चारही वाणींत राम नाही, अर्थात ज्याच्या जाणिवेत शाश्वताला सर्वोच्च स्थान नाही; त्याचं जीवन व्यर्थ आहे, असं सांगतो. मनुष्याचा देह लाभूनही जो नामविन्मुख आहे तो श्वापदासारखाच आहे, असंही तो फटकारतो. आता या नामाची आणखी एक मोठी खुबी आहे. ती समजून घेतली तर या श्लोकावर आणखी प्रकाश पडतो. वेद, शास्त्रांचे श्रेष्ठ आचार्य आणि पुराणांचे रचयिते वेदव्यास यांनीही नामाची महती गायली आहे, असं समर्थ सांगतात. याचाच अर्थ विपुल अशा ज्ञानाच्या संग्रहापेक्षा जगण्यातील अज्ञान घालविणारे असे भगवंताचे स्वल्प, सोपे नामच प्रभावी आहे. साधी गोष्ट पाहा. रोगाचं उत्तम ज्ञान आहे, रोगाची कारणं, लक्षणं ओळखता येतात, पण औषधयोजनेचं ज्ञान नाही तर त्या रोगज्ञानाचा काय उपयोग? तुम्हाला कोणता रोग झाला आहे, तो कशामुळे होऊ  शकतो, तो न होण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी होती; हे सारं सांगता आलं, पण आता तो आटोक्यात आणून दूर करण्यासाठी कोणतं औषध घ्यावं, हे जर सांगता येत नसेल तर आधीच्या ज्ञानाचा काय उपयोग? तसं व्यासांनी ज्ञान खूप सांगितलं, पण अज्ञान दूर करण्याचा ‘बहू आगळा’ उपायही सांगितला तो हरिनामाचा! ज्ञानेश्वर माऊलीही म्हणतात, ‘चहूं वेदीं जाण साहिशास्त्रीं कारण, अठराही पुराणें हरिसी गाती!’ आता अज्ञान दूर करता येणं ही नामाची मोठी खुबी आहे, मोठं वैशिष्टय़ आहे. ती कशी?

श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत की, ‘‘अज्ञान ओळखता येणं हेच खरं ज्ञान आहे!’’ एकदा का अज्ञान उमगलं की ते ओसरतच. मग ज्ञानही आपोआप येतंच. समजा आपल्याकडे सोन्याचा एक दागिना वाडवडिलांपासून आहे आणि तो आपण असोशीनं जपतोही आहोत. कालांतरानं सुवर्णकारानं पारखलं आणि सांगितलं की हा दागिना अस्सल नाही, तर ती असोशी उरेल का? तसं बाह्य जग जे आहे, दृश्य म्हणजे दिसणारं जग जे आहे ते जसं भासतं तसंच खरं वाटत असतं. पण आपण जाणतो, पाहतो, कल्पना करतो तसंच जागाचं स्वरूप नाही, हे जर उमगलं, त्याचं खरं निस्सार, अशाश्वत, चंचल स्वरूप उमगलं तर त्यात मनाचं गुंतणं आपोआप कमी होईल ना? आणि हे उमगतं ते केवळ नामानं! कारण नाम खरंच ‘बहू आगळं’ आहे! या श्लोकाच्या विवरणात समर्थभक्त ल. रा. पांगारकर यांनी तुलसीदास यांच्या ‘रामायणा’तील एक वचन उद्धृत केलं आहे. एका चौपाईत तुलसीदास नामाचं आगळं सामथ्र्य प्रकाशित करीत म्हणतात, ‘‘अगुनसगुनबिच नाम सुसाखी। उभयप्रबोधक चतुर दुभाखी।।’’ म्हणजे अगुन अर्थात निर्गुण आणि सगुण यांच्यात नाम हे ‘सुसाखी’ म्हणजे उत्तम साक्षी आहे. नाम या दोहोंतला दुवा आहे. साखळी आहे. उभय अर्थात सगुण आणि निर्गुण या दोहोंचे ज्ञान करून देणारा तो उत्तम दुभाषी आहे! अर्थात परमात्म्याचे सगुण रूप आणि निर्गुण रूप या दोन्हींतला नाम हा दुवा आहे. सगुण आणि निर्गुण हे दोन्ही नामानं जोडलेलं आहे. नाम हे सगुणाकडून निर्गुणाकडे घेऊन जातं. अगदी त्याचप्रमाणे जगाचं सगुण अर्थात व्यक्त, दृश्य रूप आणि त्याच अव्यक्त रूप यांच्यातला दुवाही नामच आहे! दृश्य, व्यक्त जगाच्या प्रभावातून नामच सोडवतं आणि निरासक्तीच्या जाणिवेत स्थिर करतं. आधी जगाच्या आसक्तीनं भौतिक वस्तुमात्रांत जीव अडकत होता. आता त्यांचं खरं स्वरूप कळल्यानं भौतिकात असूनही त्याच्या प्रभावात जीव अडकत नाही. तेव्हा भवरोगानं ग्रासलेल्या जीवाला भवप्रभावातून मुक्त करणारं नाम हेच प्रभावी औषध आहे! याच स्थितीचं वर्णन करताना श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणतात की, ‘‘डोळे उघडे ठेवूनही जग नाहीसं होईल तर ते केवळ नामानंच होईल!’’

चैतन्य प्रेम

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Samarth ramdas philosophy

ताज्या बातम्या