१२४. आंतरिक घडण : २

साधनपंथावर येण्याआधी ही जाणीव नव्हती तेव्हा आपण विकारांमागे सहज वाहावत जात होतो.

मनुष्याच्या अंत:करणात स्वाभाविक स्फुरण असतं ते विकाराचंच. काम-क्रोधादि विकारांचाच सहज प्रभाव माणसाच्या जगण्यावर, वागण्या-बोलण्यावर असतो. साधना सुरू झाली आणि ती सातत्यानं होऊ लागली की आपल्या अंत:करणातील विकारांचं हे स्वाभाविक स्फुरण जाणवू लागतं. साधनपंथावर येण्याआधी ही जाणीव नव्हती तेव्हा आपण विकारांमागे सहज वाहावत जात होतो. विकारांनुरूप अभिव्यक्त होत होतो. साधनेनं विकारांची जाणीव झाली, त्यापायी मनाचं गुंतणं आणि फरपटणंही उमगू लागलं. तरी तेवढय़ानं जगण्यातली विकारशरणता नष्ट मात्र होत नाही, पण विकारशरणता कमी होत नसल्याची आणि सद्गुरूशरणता साधत नसल्याची सल मात्र वाढू लागते. ही विकारशरणता कमी व्हावी आणि सद्गुरू तन्मयता वाढावी, यासाठीचा एकमात्र आधार आहे सद्गुरूंनी सांगितलेलं साधन! कारण सद्गुरूंचा सहवास सतत मिळणं कठीण आहे, सद्ग्रंथ वाचून किंवा सद्विचार ऐकून नेहमी सत्संग मिळवणं कठीण आहे, पण साधनेत राहून आंतरिक सत्संग प्राप्त करणं शक्य आहे. ही नामसाधना खोलवर जायला हवी. आता नाम खोलवर जाणं म्हणजे कुठे जाणं? तर जिथून विकारांचं स्फुरण होतं तिथवर नाम पोहोचलं पाहिजे! जर तिथवर नाम पोहोचलं तर गेल्या भागात म्हटलं त्याप्रमाणे ‘मी’पणा क्षीण होऊ लागतो. सभोवतालच्या घटनांमागे वाहावत जाणं कमी होतं. एखाद्या घटनेनं मनाला ‘मी’पणामुळे धक्का बसण्याचं प्रमाण कमी होतं. अनुकूल आणि प्रतिकूल प्रसंगांमध्ये मनाचं समत्व टिकून राहातं. आता अशी आंतरिक स्थिती ही नामसाधनेतला सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे, हे लक्षात घ्या. नामसाधनेचं ते शिखर नव्हे! तर ही स्थिती कशानं शक्य आहे? तर ती केवळ ‘‘सदा सर्वदा नाम वाचे वसो दे’’ याच स्थितीनं शक्य आहे. नाम खोलवर म्हणजे आंतरिक स्फुरण जिथून होतं तिथवर पोहोचल्यावरच शक्य आहे. सभोवतालच्या घटनांमागे वाहावत जाणं कमी झालं नसेल, एखाद्या घटनेनं मनाला ‘मी’पणामुळे धक्का बसण्याचं प्रमाण कमी झालं नसेल, अनुकूल आणि प्रतिकूल प्रसंगांमध्ये मनाचं समत्व उरत नसेल तर आपला नामाभ्यास कमी पडत आहे, यात शंका नाही! मग यावर उपाय काय? तर,  सदा सर्वदा नाम वाचे वसो दे!! वैखरीनं सदोदित नामच घ्यायचा प्रयत्न करीत राहायचं. मग हे नाम कसं चालतं? जगाचा प्रभाव कमी झालेला नाही, जग हाच सुखाचा आधार आहे, अशी मनाची सुप्त धारणा अद्याप आहे, जगातल्या मान-अपमान, लाभ-हानी, यश-अपयशानं मन अद्याप दोलायमान होत आहे आणि तरीही नेटानं आपण नाम घेत असू तर काय स्थिती होते? ज्या नामाची गोडी संतांनी अभंगांतून गायली, ज्या नामानं कित्येक पापीही भवसागर तरून गेल्याचे दाखले संतसाहित्यानं ठायी ठायी मांडले, त्या नामातली गोडी आपल्याला काही केल्या उमगत नाही! प्रामाणिक साधकांना माझं हे सांगणं कठोर वाटेल. त्यांची आधीच क्षमा मागतो. पण ‘‘अमृताहुनि गोड नाम तुझे देवा’’ हे ऐकताना आपली मान डोलते, पण अंत:करण काही हलत नाही! कारण ना आपल्याला अमृताचीच गोडी माहीत ना नामाची. मग अमृतापेक्षा नामाची गोडी जास्त आहे, हे तरी कुठून कळावं? तरीही मार्ग एकच, सदोदित नाम घेत राहाणं. आता असं नाम घेऊ लागलो तरी त्या नामाचं निव्वळ शब्दरूपच जाणवत असतं आणि मग हे शब्दरूप नाम सदोदित घेणं आपल्याला ‘व्यावहारिक’ वाटत नाही! मनात आणि जनात कित्येक तास वायफळ बोलण्यात सरले तरी त्या शब्दांना आपण कंटाळत नाही, पण सदोदित नाम म्हणजेच सदोदित काही शब्दं उच्चारत राहाण्याचा मात्र आपल्याला वीट येतो! म्हणूनच पुढल्याच श्लोकात समर्थ स्पष्ट बजावतात, ‘‘मना वीट मानू नको बोलण्याचा!!’’  मनोबोधातील या अत्यंत गूढ श्लोकाकडे आता वळू!

-चैतन्य प्रेम

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sant ramdas swami philosophy

ताज्या बातम्या