scorecardresearch

पहिली बाजू : उदयोन्मुख अभिव्यक्तींसाठी व्यासपीठ

या योजनेअंतर्गत हिंदूी-इंग्रजी या भाषांपाठोपाठ ४५० पेक्षा अधिक प्रवेशिका मराठी भाषकांकडून प्राप्त झाल्या आहेत

ले. कर्नल (नि.) युवराज मलिक (अध्यक्ष, राष्ट्रीय पुस्तक न्यास)

देशातील तरुण लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या पंतप्रधान युवा लेखक योजनेला देशभरातून, त्यातही महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद मिळाला. निवडले गेलेले हे तरुण लेखक राष्ट्रीय चळवळया सूत्रावर आधारित पुस्तक आपापल्या भाषेत लिहिणार आहेत. त्यातून त्यांची देशाकडे बघण्याची दृष्टी अधिकच व्यापक होईल यात शंका नाही.

नवीन कल्पना आणि विचार काही वेळा स्वत:चे म्हणून एक स्थान निर्माण करतात आणि एक प्रकारची मूक क्रांती घडवून आणण्यासाठी प्रेरणा ठरतात. दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावरच ही प्रक्रिया घडल्याचे लक्षात येते. लेखकांची नवी पिढी शोधून, तिला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान युवा-मार्गदर्शन योजनेने नेमके हेच साध्य केले आहे.

शिक्षण मंत्रालयाने ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत’ या यंत्रणेबरोबर देशातील २२ अधिकृत भाषा तसेच इंग्रजीमध्ये ‘राष्ट्रीय चळवळ’ या सूत्रावर पुस्तक प्रस्ताव मागवणारी अखिल भारतीय स्पर्धा जाहीर केली. या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. २३ भाषांमधील ललित आणि ललितेतर अशा दोन्ही प्रकारांमध्ये भारताची राष्ट्रीय चळवळ, इतिहासातील क्रांतिकारक अनाम वीर, अज्ञात स्थळे, स्त्री नेत्या इ. विषयांवर १६ हजारांहून अधिक पुस्तकांचे प्रस्ताव प्राप्त झाले. अलीकडेच (माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी) त्यातील ७५ लेखकांच्या संदर्भातील निकाल जाहीर झाले असून संबंधित योजनेच्या माध्यमातून त्यांची पुस्तके विकसित करण्याचा प्रवास सुरू झाला आहे.

अशा आव्हानात्मक अखिल भारतीय स्पर्धेसाठी पाच हजार शब्दांमध्ये सारांश आणि प्रकरण-आखणीसह पुस्तक-प्रस्ताव सादर करणे ही मुळातच एक अनोखी सुरुवात आहे. विचार करणे, वाचणे, लिहिणे या कृती आणि क्रांतिकारक- राष्ट्रवीर व त्यांच्या योगदानाबद्दल समजून घेऊन त्याबद्दल लिहिणे या कल्पनेला किती उच्च पातळीवरचे प्राधान्य आहे, हे ही योजना अधोरेखित करते. किंबहुना बारकाईने पाहिले तर पंतप्रधान युवा योजना इथे एक महत्त्वाचे व्यासपीठ बनण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण ती केवळ तरुण लेखकांना प्रोत्साहन देत नाही, तर ब्रिटिश वसाहतवादाच्या जोखडातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना संपूर्ण देशाला ज्या अग्निदिव्यातून जावे लागले त्याबद्दल जाणून घेण्याच्या आणि त्याचे दस्तावेजीकरण करण्याच्या कल्पनेला प्रोत्साहन देते. तरुण पिढी या योजनेच्या माध्यमातून इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन समजून घेणार आहे, इतिहासाचा नव्याने शोध घेणार आहे, संशोधन करणार आहे.  या सगळय़ातून एक प्रकारचे वैचारिक मंथनही हे तरुण लेखक करणार आहेत. निवड झालेल्यांपैकी काही जण तर जेमतेम १५ वर्षांचे आहेत.

या संपूर्ण प्रक्रियेतून समोर आलेला एक प्रमुख पैलू म्हणजे ७५ लेखकांच्या अंतिम यादीमध्ये अंतिम यादीत ३८ पुरुष आणि ३७ स्त्रिया आहेत. म्हणजेच तरुण लेखक तसेच लेखिकांची संख्या समसमान आहे. महत्त्वाचे म्हणजे हे अत्यंत सहजपणे घडले आहे. यातून असे म्हणता येईल की, गेल्या अनेक वर्षांपासून मुलींसाठी मोठय़ा प्रमाणावर राबवले जात असलेले सक्षमीकरणाचे कार्यक्रम प्रभावी ठरले आहेत. लैंगिक समानता ही या योजनेतून समोर येणारी सर्वात चांगली बाब आहे.

या योजनेअंतर्गत हिंदूी-इंग्रजी या भाषांपाठोपाठ ४५० पेक्षा अधिक प्रवेशिका मराठी भाषकांकडून प्राप्त झाल्या आहेत. (या स्पर्धेसाठीचा मराठी भाषिक युवा लेखकांचा प्रतिसाद पाहता मराठी भाषा आणि तिला अभिजात दर्जा मिळावा यासाठीचे प्रयत्न हा लेखाचा वेगळा विषय होऊ शकतो!) सध्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार (एन.ई.पी.) प्रादेशिक भाषा, शिक्षणातील मातृभाषेचे स्थान आणि देशाच्या इतिहासात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण योगदान हे इथे पुन्हा एकदा अधोरेखित करता येईल! इतिहासकाळापासून ते आजपर्यंत मराठी माणूस दिल्लीच्या तख्तावर आपली अस्मिता, अभिरुची, अभ्यासपूर्ण संशोधन वृत्ती, साहित्य, संस्कृती यांच्या माध्यमातून आपली मान नेहमीच उंचावत आहे याची यातून प्रचीती येते.

महाराष्ट्रातून चौघे

या योजनेअंतर्गत विविध भाषिक तसेच परंपरांची पार्श्वभूमी असलेले तरुण लेखक एकत्र येतील, आपल्या पुस्तक प्रकल्पांच्या माध्यमातून राष्ट्रीय चळवळीच्या विविध ज्ञात-अज्ञात पैलूंचा शोध घेतील. हे पैलू जाणून घेण्यासाठी आणि त्याबद्दल लिहिण्यासाठी त्यांचे एकत्र येणे ही गोष्ट साहित्य हे देशातील सांस्कृतिक-साहित्यिक जाण आणि एकात्मता यासाठी एक साधन कसे बनू शकते, याचे उत्तम उदाहरण ठरणार आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या युवा तरुण लेखकांमध्ये महाराष्ट्राच्या विविध विभागांतून चार स्पर्धकांची निवड झाली आहे. अनुक्रमे ध्रुव पटवर्धन, श्रेयस कोल्हेकर, प्रवीण नवासे, कीर्ती फाटे हे ते चार जण. त्यांनी सादर केलेले वेगळे विषय हे त्यांचे वेगळेपण ठरले आहे. 

ही राष्ट्रीय लेखक मार्गदर्शन योजना सर्व प्रमुख भारतीय भाषांमधील भावी लेखकांना लेखनाच्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करता यावे यासाठी प्रयत्न करतेच, त्याबरोबरच या भावी लेखकांना देशाच्या बहुभाषिक रचनेबाबत मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करण्यावरही तिचा भर आहे, हे तर स्पष्टच आहे. त्यामुळे संबंधित लेखकांच्या जडणघडणीच्या प्रक्रियेत तिचे योगदान मोलाचे ठरू शकते.

तरुण लेखकांना देशाच्या बहुभाषिक रचनेची चांगली समज असेल, त्यांच्याकडे त्याबाबतचा विशाल दृष्टिकोन असेल तर त्यांना देशातील जटिल वास्तव आणि देशाचा सांस्कृतिक-साहित्यिक वारसा घडवणारे बहुमितीय पैलू चांगल्या प्रकारे समजून घेता येतील. त्यातून पंतप्रधानांची ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना पुढे नेता येईल. पंतप्रधान युवा योजनेअंतर्गत प्रकाशित केलेली पुस्तके नंतर इतर भारतीय भाषांमध्ये अनुवादितही केली जाणार असल्याने, हे राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या ‘एक: सूते सकलम्’ या ब्रीदवाक्याशी सुसंगत असेल.

एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, ‘‘२१वे शतक हे ज्ञानाचे आणि सुज्ञ मानवी शक्तीचे युग असेल, तर या शक्तीचा गौरव करण्यासाठी (आपण) पुस्तकांशी घट्ट नाते निर्माण केले पाहिजे.’’ देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमांचा एक भाग म्हणून विचारवंतांची तरुण पिढी घडवण्याच्या राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पाची जबाबदारी राष्ट्रीय पुस्तक न्यासावर सोपवली जाणे ही खरोखरच विशेष बाब आहे. नोबेल पारितोषिक विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या पुढे दिलेल्या अमर ओळी प्रत्यक्षात आणण्यासाठी काही निवडक लेखक प्रयत्न करतील आणि राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडतील अशी आशा आहे :

जेथे मन निर्भय असते आणि मान ताठ असते;

जेथे ज्ञान मुक्त असते;

जेथे देशांतर्गत अरुंद िभतींनी जगाचे तुकडे केलेले नसतात;

जेथे खोल सत्यातून शब्द बाहेर पडतात;

जेथे अथक परिश्रम पूर्णत्वाच्या दिशेने आपले हात पसरतात..

(या लेखाचे मराठी शब्दांकन राष्ट्रीय पुस्तक न्यासाचा (नॅशनल बुक ट्रस्ट) मराठी विभाग पाहणाऱ्या निवेदिता मदाने-वैशंपायन यांनी केले आहे.)

मराठीतील सर्व पहिली बाजू ( Pahili-baaju ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pm yuva mentorship scheme pm yuva yojana for writers get good response from maharashtra zws

ताज्या बातम्या