scorecardresearch

साम्ययोग : भेद-भावनेचे मूळ

तुकोबांचा वरील अभंग कोणत्याही काळातील माणसाच्या दु:खाचा नेमका वेध घेणारा आहे. आपण साम्याकडून भेदाकडे का जातो याचेही मूळ तिथे सांगितले आहे.

पंचभूतांचिये सापडलों संदी।

घातलोसे बंदी अहंकारे।।

    – तुकोबा

तुकोबांचा वरील अभंग कोणत्याही काळातील माणसाच्या दु:खाचा नेमका वेध घेणारा आहे. आपण साम्याकडून भेदाकडे का जातो याचेही मूळ तिथे सांगितले आहे. विनोबा हा विचार कालसुसंगत करतात. कुटुंब, समाज, धर्म, देश यांच्यापलीकडे साम्याची व्याप्ती वाढवण्याऐवजी ती अधिकाधिक संकुचित कशी होईल, याकडे आपले पूर्ण लक्ष असते. मुळात ब्रह्म-साम्याच्या अलीकडच्या पायऱ्या या एरवीही संकुचित आहेत. त्यातच त्यांची उभारणी विषमतेच्या पायावर झाली असेल तर ही संकुचितता अधिकच घातक होते.

विषमतेची एवढी ओढ आपल्याला का असावी? गीता प्रवचनांमध्ये विनोबांनी याची कारणमीमांसा केली आहे. स्वधर्म अत्यंत सहज प्राप्त आहे. माणसाला जशी आई असते तसाच स्वधर्मही असतो, असे सांगून झाल्यावर विनोबा मुख्य मुद्दय़ाकडे वळतात. स्वधर्म इतका सहज प्राप्त आहे, की माणसाच्या हातून सहज त्याचेच आचरण व्हावे. पण अनेक प्रकारच्या मोहांमुळे ते होत नाही, अथवा फार मुश्किलीने होते. आणि झाले तरी त्यात विष कालवले जाते.

स्वधर्माच्या मार्गात काटे पसरवणाऱ्या मोहाची बाह्य़ रूपे तर असंख्य आहेत. तथापि त्यांचे विश्लेषण केले म्हणजे त्या सर्वाच्या मुळाशी जी एक मुख्य गोष्ट दिसून येते ती संकुचित आणि उथळ देहबुद्धी. मी आणि माझ्या शरीर-संबंधांची माणसे एवढीच माझी व्याप्ती. त्याबाहेरचे सर्व परके, अथवा दुश्मन, अशी भेदाची भिंत ती उभी करते, आणि मी किंवा माझे म्हणून मानलेले जे, त्यांचेही ती शरीरच पाहते.

देहबुद्धीच्या या दुहेरी कोंडीत सापडून आपण तऱ्हेतऱ्हेची डबकी निर्माण करू लागतो. बहुतेक सगळे याच कार्यक्रमात असतात. कोणाची डबकी लहान तर कोणाची मोठी. परंतु काही झाले तरी ती डबकीच. या शरीराच्या त्वचेइतकीच त्यांची खोली. कोणी कुटुंबाभिमानाचे डबके करून राहतो, कोणी देशाभिमानाचे डबके करून राहतो. ब्राह्मण-ब्राह्मणेतर डबकी, हिंदु-मुसलमान डबकी, एक ना दोन, अनंत डबकी. जिकडे पहाल तिकडे तीच ती. त्याशिवाय आपणास जगवतच नाही. परंतु याचा परिणाम काय होतो? परिणाम एकच. हीन विचारांचे जंतू आणि स्वधर्मरूप आरोग्याचा नाश. समर्थानी वर्णन केलेल्या अवस्थेच्या अगदी विपरीत, असा हा विचार आहे. देहाचे सुख तेच आणि तेवढेच सुख!

विनोबांचे हे विवेचन आपल्या रोजच्या जगण्याशी जोडणे अवघड नाही. आपण केवळ देहाचे सुखदु:ख कुरवाळत बसलो, तर आपल्या हातून एकही चांगली गोष्ट घडणार नाही.

लौकिकातील एखादी गोष्ट आपल्याला भव्य आणि सुंदर वाटते ती देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यानेच होते. ही भव्यता, क्षेत्र, व्यक्ती, विशिष्ट कार्य यांच्याशी जोडलेली नाही. प्रत्येक व्यक्ती समत्वाशी निसर्गत:च जोडलेली असते फक्त तिला या बंधनाची जाणीव नसते. या बंधनाचे वर्णन तुकोबांनी अप्रतिम शब्दांत केले आहे.

आपल्या आपण बांधविला गळा।

नेणें चि निराळा असतां ही।।

इथे आपल्या असंख्य समस्यांचे मूळ आहे. गरज आहे ती केवळ देहबुद्धीच्या विळख्यातून बाहेर पडण्याची.

– अतुल सुलाखे

  jayjagat24@gmail.com   

मराठीतील सर्व साम्ययोग ( Samyayog ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Samyayog root discrimination man vinoba family society religion country ysh

ताज्या बातम्या