थंड हवेच्या झुळकांवर स्वार झालेली मावळतीची किरणे अधिकच कोवळी झाली. भोसले महालासमोर स्वयंचलितरथांचा आलिशान ताफा दाखल झाला आणि मनसबदाराने हसतमुखाने बुधोजीराजांचे स्वागत केले. सेवकांनी कमरेत झुकून बुधोजीराजांना कुर्निसात केला आणि गालात हसत त्याचा स्वीकार करून राजे सहकुटुंब दिवाणखान्यात दाखल झाले. जवळपास साडेचार तासांच्या खड्डेमय प्रवासाने शिणलेल्या राजांचा थकवा महाल न्याहाळताना पार पळून गेला. मुदपाकखान्यात खाशा पाहुणचाराची तयारी सुरू होती. राजे प्रसन्न झाले. रयतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यभर केलेल्या प्रवासाचा शीण घालविण्यासाठी आमच्या महाली काही काळ मुक्काम करून सेवेची संधी द्यावी, अशी विनंती खुद्द भोसलेंनीच केल्याने नकार देणे शक्यच नव्हते. वहिनीसाहेब, बाळराजे व मोजक्या कबिल्यासह राजेंची स्वारी महाबळेश्वरी दाखल झाली होती. शीण संपताच पुन्हा मोहिमेवर दाखल होण्याचा बेत आखण्यात आला होता. संध्याकाळ सरली. राजांनी सहकुटुंब खास सातारी भोजनाचा आस्वाद घेतला. महालाच्या आवारातील हिरवळीवर हलकासा फेरफटका मारला आणि ते दालनात येऊन बिछान्यावर पहुडले. राजांना कोणताही त्रास होणार नाही हे पाहण्याच्या सक्त सूचना सेवकांना देऊन मनसबदार मुक्कामी परतले. काही वेळातच राजांचा डोळाही लागला. अचानक आसपास कानठळ्या बसविणारे नाद सुरू असल्याची जाणीव राजांना झाली आणि ते उठून बसले. या सक्त पर्यावरणस्नेही वातावरणात कानठळ्या बसविणारे भेसूर सूर? एवढय़ा रात्री?.. राजे चक्रावले. त्यांना संतापदेखील आला आणि सेवकास बोलावून आवाज बंद करण्यास फर्माविले. तरीही सेवक खाली मान घालून येका जागी उभाच!.. राजांना कळेना. त्यांनी थेट सरदार कदमांशी संवाद साधला आणि आवाजाचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले. तिकडे राजधानीत सारे सरकार धास्तावले. राजेंची मर्जी फिरली तर काय होणार या काळजीने कदमांचे काळीज कलकलू लागले. त्यांनी चक्रे फिरविली, तरीही बाहेर ढणढणाट सुरूच होता. कुणी तरी कानात सांगितले, ‘साहेब, तो तर मोठय़ा साहेबांच्या स्नेही कुटुंबातील सोहळा आहे. आवाज बंद केला तर प्रकरण वपर्यंत जाईल’.. इकडे राजे तळमळतच होते. रात्री कधी तरी राजांच्या डोळ्यास डोळा लागला. काहीसे नाराज होऊनच राजे परतीच्या प्रवासास लागले. ते परतले पण तिकडे महाबळेश्वरी भोसले महालाशेजारी, पर्यावरणाचे नियम न पाळता ध्वनिप्रदूषण करणाऱ्या त्या वास्तूला टाळे लागले. तेथील वीज गेली. पाणीही बंद झाले. ‘ज्या राज्यात नियमांची पायमल्ली होते, त्यांना क्षमा नाहीच!’.. सरदार कदमांनी खुलासा केला. रात्री उशिरा कधी तरी राजे मुक्कामावर पोहोचताच फटाक्यांची बेधुंद आतषबाजी झाली. फटाक्यांच्या आवाजाने आसपासची जनता डोळे चोळत जागी झाली. राजे परतल्याची वर्दी अवघ्या राजधानीत पोहोचली होती! .. (तळटीप- या नोंदीतील पात्रे, प्रसंग काल्पनिक आहेत. त्यांचा इतिहास वा वर्तमानाशी संबंध नाही. भासलाच, तर तो योगायोग समजावा!)
संग्रहित लेख, दिनांक 28th Dec 2017 रोजी प्रकाशित
राजे परतले; पण..
थंड हवेच्या झुळकांवर स्वार झालेली मावळतीची किरणे अधिकच कोवळी झाली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 28-12-2017 at 01:41 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Noise pollution in maharashtra