19 February 2020

News Flash

सक्रिय साथीदार

प्रकाशने मेडिकलला असतानाच मंदाच्या रूपाने स्वत:साठी जोडीदार निवडली होती.

पॉवरलूम युनिट उभे करणारे दिलीप हेर्लेकर

आनंदवनात दाखल होणाऱ्या कुष्ठरुग्णांचा सतत वाढणारा टक्का बघता मला डॉक्टर या नात्याने आरोग्यविषयक प्रश्नांना प्राधान्य देणं गरजेचं होतं. पर्यायाने माझा बहुतांशी वेळ दवाखान्यातच जात असे. मला पूर्ण जाणीव होती, की आनंदवनवासीयांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणं, शेती पद्धतीत सुयोग्य बदल घडवून आणणं, नव्या जलस्रोतांचा विकास करणं, हेसुद्धा तितकंच गरजेचं आहे. परंतु यासाठी आवश्यक होतं मनुष्यबळ आणि ते तयार करणं मला वेळेअभावी शक्य होत नव्हतं. त्यामुळे दवाखान्यातील कामाचा भार वाटून घेणाऱ्या एका सहकाऱ्याची मला नितांत आवश्यकता होती.

प्रकाशने मेडिकलला असतानाच मंदाच्या रूपाने स्वत:साठी जोडीदार निवडली होती. पण मला तेव्हा ते ‘साधलं’ नव्हतं आणि नंतर काही केल्या माझं लग्न जमेना. तेव्हा मला दोनशे पन्नास रुपये मानधन मिळत असे. एवढय़ा पैशात संसार चालवणारी आणि आनंदवनात कुष्ठरुग्णांच्या सहवासात आपले आयुष्य घालवू इच्छिणारी मुलगी मिळणे अवघड. म्हणून ‘वधू पाहिजे’ या सदराखाली ‘रोहिणी’त जाहिरातही देऊन झाली, पण मुहूर्त काही लागत नव्हता! अखेर मुहूर्त लागलाच; तोही डॉक्टरच्या रूपाने! कसा ते थोडक्यात सांगतो..

आनंदवनाच्या कार्यावर ‘साधना’ मासिकात छापून आलेला लेख वाचून प्रभावित झालेली औरंगाबादची डॉक्टर भारती वैशंपायन एक दिवस अचानक आपल्या आईसोबत आनंदवनात दाखल झाली. त्या वेळी बाबा सोमनाथला होते. भर पावसात आलेल्या या मायलेकींचा इंदूने ताबाच घेतला. त्यातून भारती डॉक्टर आहे, उपवर आहे हे कळल्यावर इंदूमधील वरमाय एकदम जागृत झाली! तिने माझी ओळख करून दिली व मलाच आनंदवन दाखवण्याची जबाबदारीही दिली. मीही थोडा भाव खाऊन घेतला त्या निमित्ताने! भारतीचे वडील भाऊसाहेब वैशंपायन खासदार होते आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामात स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, अनंतराव भालेराव यांच्यासोबत सक्रिय होते. आई प्रतिभाताई औरंगाबादच्या शारदा मंदिर शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. या मानवतावादी विचारसरणीच्या समाजसेवी दांपत्याच्या पोटी तोच वारसा घेऊन जन्माला आलेली भारती इंदूला सर्वार्थाने भावली. इंदूने नंतर पत्र लिहून त्यांच्याकडे माझ्यासाठी भारतीला सरळ मागणीच घातली. ‘आपली वैद्यकीय पदवी कधीही पैसा कमावण्यासाठी वापरायची नाही’ हे तत्त्व बाळगणाऱ्या भारतीच्या मनाने तर लगेचच होकार दिला. नंतर २७ नोव्हेंबर १९७६ रोजी औरंगाबादला आमचा विवाह संपन्न झाला आणि ‘माझं लग्न कसं होणार..’ हा उर्वरित सगळ्यांना लागलेला घोर कायमचा मिटला.

लग्नानंतर भारतीने वध्र्याच्या गांधी मेमोरियल लेप्रसी फाऊंडेशनमध्ये कुष्ठरोगाच्या उपचारांसाठी आवश्यक असलेलं दीड महिन्याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर सकाळी चार तास आनंदवन लेप्रसी हॉस्पिटलमध्ये ओपीडी सांभाळू लागली. भारती बालरोगतज्ज्ञही होती. त्यामुळे सकाळच्या ओपीडीनंतर भारतीने दुपारच्या वेळात अंधशाळेतील विद्यार्थी, संधीनिकेतनमधील प्रशिक्षणार्थी आणि आनंदवनातील इतर मुलांवरही उपचार सुरू केले. आनंदवनाच्या आजूबाजूच्या खेडय़ांत त्या काळी आरोग्यसेवा म्हणून नव्हतीच. त्यामुळे आनंदवनात  मुलांवर मोफत उपचार होतात, हे कळल्यानंतर तिथली बायकापोरंही भारतीकडे येऊ  लागली.. आणि अशा प्रकारे कुष्ठरुग्णांव्यतिरिक्त इतरांसाठी एका छोटय़ाश्या खोलीतून सुरू झालेलं हे काम ‘आनंदवन जनरल हॉस्पिटल’मध्ये रूपांतरीत झालं. वर्ष होतं १९७८. ‘आनंदवन जनरल हॉस्पिटल’ची सगळी व्यवस्था पूर्णपणे भारतीने लावली. कुष्ठमुक्त, अपंग आणि इतर स्वयंसेवकांमधून आपली टीम उभी केली.

१९४० च्या दशकापासून कुष्ठरोगावरील उपचारांमध्ये भारतात डीडीएस (डायअमिनो डायफेनिल सल्फोन) हे औषध दिलं जायचं. याला ‘डॅप्सोन’ असंही म्हणतात. हे औषध जेव्हा नव्याने वापरात आलं त्या वेळी त्याची परिणामकता उत्तम होती. मात्र साठीच्या दशकाच्या मध्यात डॅप्सोनला दाद न देणाऱ्या जीवाणूंची आणि पर्यायाने या जीवाणूंच्या संसर्गाने पछाडलेल्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली. त्यामुळे कुष्ठरोगाच्या उपचारासाठी नवी औषधं आणि उपचार पद्धती शोधण्याचं आव्हान शास्त्रज्ञांपुढे उभं ठाकलं. यातनं ‘मल्टि-ड्रग थेरपी’ (एमडीटी) म्हणजेच ‘बहुविध उपचार पद्धती’ जन्माला आली. ‘एमडीटी’मध्ये डॅप्सोनच्या जोडीला रिफँपिसिन व क्लोफॅझिमिन या जीवाणूप्रतिबंधक औषधांचा उपयोग होऊ  लागला. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनुसार ऐंशीच्या दशकापासून कुष्ठरोगावर उपचारासाठी बहुविध उपचार पद्धती सर्वत्र मोठय़ा प्रमाणात वापरली जाऊ  लागली. आनंदवनातही आम्ही ही उपचार पद्धती लगेचच अमलात आणली. १९६० मध्ये इंदूने पुढाकार घेत कुष्ठरुग्णांना Right to Companionship, Right to Sexuality मिळवून दिले होते. दरम्यानच्या काळात संशोधनाने हे सिद्ध झालं, की कुष्ठरोग आनुवंशिक नाही. आता बहुविध उपचार पद्धतीमुळे उपचारही प्रभावीपणे होऊ  लागले. पूर्णपणे बरे झालेल्या कुष्ठरुग्णांना अपत्य होऊ  देण्यात कुठलाही धोका नाही. भारतीने हे बाबांना पटवून देत आनंदवनातील कुष्ठमुक्त दांपत्यांना संततीसुखाचा अधिकार म्हणजेच Right to Parenthood मिळवून दिला.

भारतीच्या रूपाने मला लेप्रसी हॉस्पिटलमध्ये भक्कम आधार मिळाला, तरी हा आनंद फार काळ टिकला नाही. याचं कारण ‘आनंदवन जनरल हॉस्पिटल’ची वाढलेली जबाबदारी. त्यामुळे लेप्रसी हॉस्पिटलची जबाबदारी सांभाळण्यासाठी पुन्हा एका डॉक्टरची गरज मला भासू लागली. हा माझा भार कायमचा हलका केला तो डॉ. विजय पोळ याने. डॉ. विजय बाबांच्या मोठय़ा बहिणीचा मुलगा. पोळ परिवार रायपूरजवळील बेमेतरा या गावचा. डॉ. विजय याची १४ वर्ष बेमेतऱ्याला प्रायव्हेट प्रॅक्टिस होती. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायीकरणामुळे त्याला म्हणावं तसं मानसिक समाधान मिळत नव्हतं. त्याचे मोठे भाऊ  अ‍ॅड. सुहास पोळ यांचा बाबांशी पत्रव्यवहार होता. त्यात बाबांनी डॉ. विजय याला आनंदवनातलं काम बघण्यासाठी एकदा पाठवून द्यावं असं लिहिलं होतं. १९८४ साली आमची लहान बहीण बिजलीच्या लग्नाच्या निमित्ताने डॉ. विजय आनंदवनात आला. त्या वेळी आनंदवन बघून इथे काम करण्याची ओढ त्याच्या मनात उत्पन्न झाली. त्याने इथे पूर्णवेळ काम करण्याची इच्छा बाबांकडे व्यक्त केली. बाबांनी त्याला इथल्या वास्तवाची, कसोटय़ांची जाणीव करून दिली. पण डॉ. विजय याचा निर्धार पक्का होता. तो सपत्नीक आनंदवनात डेरेदाखल झाला. लगेचच त्याने वध्र्याला गांधी मेमोरियल लेप्रसी फाउंडेशनमध्ये कुष्ठरोगाचं प्रशिक्षण घेतलं आणि काम सुरू केलं. आनंदवन लेप्रसी हॉस्पिटलची जबाबदारी मी हळूहळू त्याच्याकडे सोपवली. डॉ. विजय अगदी सहजपणे कामाशी समरसून गेला. कुष्ठमुक्त मंडळींमधून त्याने आरोग्य कार्यकर्त्यांची नवी फळी उभारली. स्वत:मधली शिस्त आणि टापटीप प्रत्येकाच्या अंगी रुजवली. आपल्या कर्तव्यनिष्ठेला त्याने नवनव्या कल्पनांची जोड दिली. शासकीय नियमावलीनुसार रुग्णांच्या, रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या आहाराच्या, औषधांच्या, वैद्यकीय साहित्याच्या नोंदी करणं सुरू केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, डॉ. विजय याने आपल्या अंगीभूत आत्मीयतेमुळे लवकरच कुष्ठरुग्णांना आपलंसं करून घेतलं.

याच दरम्यान आनंदवनाला मिळालेला आणखी एक खंदा कार्यकर्ता म्हणजे मुंबईचा दिलीप हेर्लेकर. फिनले मिलमध्ये काम करणारा दिलीप व्ही.जे.टी.आय.चा टेक्स्टाइल इंजिनीअर. १९८३ च्या मित्रमेळाव्याला तो आला होता. आनंदवनातील कापडाची, तसंच हॉस्पिटलसाठी बँडेजेसची वाढती गरज, शिवाय आनंदवनात तयार होणाऱ्या कापडाची बाहेर वाढलेली मागणी यासाठी हँडलूम्सच्या जोडीने आनंदवनात पॉवरलूम्स बसवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. मात्र यासाठी सरकारदरबारी मान्यता घ्यावी लागत असल्याने हे काम लालफितीच्या कारभारात अडीच-तीन वर्ष रखडलं होतं. दिलीप टेक्स्टाइल इंजिनीअर असल्याने मी या सर्व गोष्टी त्याच्या कानावर घातल्या आणि यात काही मार्ग निघू शकेल का, अशी विचारणा केली. हा विचार डोक्यात ठेवून मुंबईला परतलेल्या दिलीपने स्वत:च्या प्रबळ इच्छाशक्तीच्या आणि प्रयत्नांच्या जोरावर, फिनले मिलमधील आपले वरिष्ठ अधिकारी विवेक तोंडापूरकर यांच्या मदतीने अक्षरश: तीन आठवडय़ांच्या कालावधीत पॉवरलूम्स बसवण्यासाठी आवश्यक असलेला परवाना म्हणजे ‘टेक्समार्क’ आनंदवनाला मिळवून दिलं! आपली नोकरी सांभाळत हे काम मार्गी लावणाऱ्या दिलीपने आता पॉवरलूम्स विकत आणून आनंदवनात फिट करण्याची जबाबदारीही स्वत:च्या खांद्यावर घेतली. त्या दिवसांत बाबा प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारांसाठी मुंबईला होते. बाबांना भेटून पॉवरलूम्स खरेदीसंबंधी चर्चा करावी या उद्देशाने दिलीप त्यांना भेटायला गेला असता त्यांनी दिलीपच्या हातात कोरा चेकच ठेवला! बाबांनी दिलीपमधल्या सचोटीची आणि निरलसपणाची पारख आधीच केली होती. दिलीपने आपलं कौशल्य पणाला लावत, आधी वापरलेल्या पण चांगल्या स्थितीतील चार पॉवरलूम्स शोधून काढल्या आणि त्या विकत घेऊन आनंदवनात बसवल्या. दिलीपची ओळख होऊन अजून सहा महिनेही झाले नव्हते आणि आनंदवनात त्याच्या अथक प्रयत्नांनी यंत्रमाग धडधडू लागले. कुष्ठमुक्तांना पॉवरलूम्स चालवण्याचं, त्यांची देखभाल करण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी दिलीपने सोबतीला आपल्या मिलमधून एक फोरमन आणि एक फिटर अशी जोडगोळी आणली होती. दिलीपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने हे शक्य झालं. पॉवरलूम्समुळे आनंदवनाची कापडाची, बँडेजेसची गरज भागलीच, पण मोठय़ा प्रमाणावर कापडविक्रीही होऊ  लागली. हळूहळू नव्या पॉवरलूम्सची भर पडू लागली, तसा कामाचा आवाकाही खूप वाढत गेला. ‘एल अँड टी’सारख्या मोठय़ा कंपन्यांनाही कापड पुरवलं जाऊ लागलं.

कोरा चेक देत बाबांनी दाखवलेला विश्वास दिलीपच्या मनात घर करून राहिला आणि आनंदवनात पॉवरलूम्स बसवून देणारा दिलीप पुढे दीड वर्षांनी मुंबईतली फिनले मिलमधली आपली नोकरी सोडून चक्क पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून सहकुटुंब दाखल झाला. १९८५ मध्ये बाबांनी संधीनिकेतनच्या अधीक्षकपदाची धुरा दिलीपकडे सोपवली. त्यामुळे पॉवरलूम्ससोबत सगळ्या उद्योगधंद्यांची जबाबदारी दिलीपकडे आली. तंगडतोड करत उद्योगांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची खरेदी करण्यापासून ते ऑफिसमध्ये बसून रात्री जागरण करत हिशेब तपासण्यापर्यंत प्रत्येक कामात दिलीपचा सक्रिय सहभाग असे. त्यालाही माझ्यासारखी प्रयोगशीलतेची आवड. त्यामुळे माझ्या विविध प्रयोगांना पाठिंबा देणारा हक्काचा माणूस मला मिळाला आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातलं माझं बौद्धिक एकटेपण भरून निघालं. बाबा आणि इंदूचं प्रेम सगळ्यांनाच मिळालं, पण दोघांचाही समान विश्वास कमावलेलं माणूस दिलीपशिवाय दुसरं कुणीच नाही! मूल्यं, सचोटी, ध्येयनिष्ठा हे शब्द दिलीपपुढे खुजे ठरतात, याबद्दल दिलीपच्या कार्याशी परिचित कुणाचंही दुमत नसेल.

मी आनंदवनात डॉक्टर म्हणून काम सुरू केल्यानंतर आरोग्य क्षेत्राशिवाय ज्या काही इतर क्षेत्रांत कामं केली, प्रयोग केले त्याविषयी पुढे सांगेनच. पण हे सगळं जे मी करू शकलो ते डॉ. भारती, डॉ. विजय पोळ, दिलीप हेर्लेकर या सर्वानी आपापल्या भूमिका समर्थपणे पार पाडल्यामुळेच.

– विकास आमटे

vikasamte@gmail.com

First Published on October 1, 2017 3:03 am

Web Title: vikas amte marathi articles on leprosy
Next Stories
1 एकलव्य विद्यापीठ
2 अश्रूंच्या नात्याचं करुणोपनिषद
3 मुक्काम : लोक-बिरादरी
Just Now!
X