09 March 2021

News Flash

यूपीएससी

मित्रांनो, भूगोल या उपघटकावर जे प्रश्न विचारले जातात, त्यात अनेक प्रश्न भूरूपांशी संबधित असतात.

भूगोल : अभ्यासाचे नियोजन
वाऱ्यामुळे तयार होणारी भूरूपे
मित्रांनो, भूगोल या उपघटकावर जे प्रश्न विचारले जातात, त्यात अनेक प्रश्न भूरूपांशी संबधित असतात. म्हणूनच भूरूपात हवेमुळे तयार होणारी भूरूपे, नदीमुळे तयार होणारी भूरूपे, हिमनदीमुळे तयार होणारी भूरूपे यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. आज आपण वाऱ्यामुळे तयार होणाऱ्या भूरूपांचा अभ्यास करणार आहोत. त्रिविध स्वरूपातील वारा ओसाड व वाळवंटी प्रदेशात जास्त प्रभावी असतो. या वाऱ्यामुळे वाळवंटी प्रदेशात विविध भूआकार निर्माण होतात.
वारा प्रामुख्याने खनन, वहन आणि संचयन करत असल्यामुळे विविध भूआकारांची निर्मिती होते.
वाऱ्याचे खनन कार्य- वाऱ्याचे खनन प्रामुख्याने पुढील प्रकारे घडत असते-
= अपवहन : वाळवंटी प्रदेशात वाऱ्याचा वेग जास्त असल्याने वाऱ्याबरोबर अनेक लहान कण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जातात, त्यास अपवहन असे म्हणतात. जिथून हे पदार्थ उचलून नेले जातात तेथील भाग उघडा पडतो व तिथे लहान खड्डे पडतात.
= अपघर्षण : वाऱ्याबरोबर अनेक पदार्थ वाहत असताना या पदार्थाचा आघात वाऱ्याच्या मार्गातील खडकांवर किंवा
भूपृष्ठावर होऊन मार्गातील खडक गुळगुळीत व चकचकीत होतात, या क्रियेस अपघर्षण असे म्हणतात.
= संन्निघर्षण : वाऱ्याबरोबर वाहत असणाऱ्या वाळूच्या कणांचा आघात वाऱ्याच्या मार्गातील खडकांवर किंवा भूपृष्ठावर होऊन त्या कणांचे तुकडे होतात. वाळूचे कण फुटतात व कणांचा आकार लहान लहान होत जातो, त्यास संन्निघर्षण असे म्हणतात.
वाऱ्याच्या खननामुळे निर्माण झालेली भूरूपे :
= अपवहन खळगे : वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या आघाताने खडकाज्ञाचे तुकडे होऊन तसेच खड्डय़ाच्या जागी कधी पाणी साचून खडक कुजून कमकुवत होतात. हे तुकडे वाऱ्याबरोबर वाहत जाऊन तेथे खळग्यांची निर्मिती होते. या खळग्यांनाच अपवहन खळगे असे म्हणतात. अशी उदाहरणे सहारा, आफ्रिकेतील कलहरी, आशियातील मंगोलिया, पश्चिम ऑस्ट्रेलिया इत्यादी वाळवंटी प्रदेशात
अपवहन खळगे आहेत.
२) भूछत्र खडक : वारा वाहत असताना वाऱ्याबरोबर वाळूचे अनेक कण वाहत असतात. अशा वेळी वाऱ्याच्या मार्गात एखादा शिलाखंड आल्यास व वाऱ्याची दिशा सतत बदलत राहिल्यास शिलाखंडाच्या पायथ्यापासून एक ते दीड मीटर उंचावर असलेल्या भागाची चोहोबाजूंनी घर्षणाने झीज होते. त्याला छत्रीसारखा आकार प्राप्त होतो. अशा वैशिष्टय़पूर्ण शिलाखंडाच्या आकारास भूछत्र खडके असे म्हणतात. अशी उदाहरणे सहारा व इराणच्या वाळवंटात
मोठय़ा प्रमाणात आहेत.
३) झ्युजेन : वाळवंटी प्रदेशात क्षितिजसमांतर कठीण व मृदू खडकांचे स्तर एकमेकांवर आडवे असल्यास व त्यात जोड किंवा संधी असल्यास ऊन, वारा आणि जास्तीत जास्त तापमान व कमीत कमी तापमान यामुळे जोड रुंदावत जाते. अशा वेळी कठीण खडकाची फारशी झीज होत नाही. जो आकार प्राप्त होतो त्यास झ्युजेन असे म्हणतात. झ्युजेनची उंची साधारण ४० ते ४५ मीटपर्यंत असते.
अशी भूरूपे अरेबिया, इजिप्त व लिबियाच्या वाळवंटी प्रदेशात आढळतात.
४) यारदांग : वाळवंटात ज्या ठिकाणी कठीण आणि मृदू खडक हे लंबवत स्थितीत वाऱ्याच्या दिशेला समांतर व एकानंतर एक असतील किंवा एकमेकांना समांतर असतील तर अशा वेळी वाऱ्याच्या खननामुळे मृदू खडकाची जास्तीत जास्त झीज होऊन मृदू खडक किंवा स्तर नाहीसा होऊन यारदांग तयार होतात. अशी यारदांगे मध्य आशिया खंडातील गोबीच्या वाळवंटात, दक्षिण अमेरिकेतील अटाकामाच्या वाळवंटात आढळतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2016 1:05 am

Web Title: upsc test paper
टॅग : Upsc Exam
Next Stories
1 एमपीएससी
2 यूपीएससी
3 एमपीएससी
Just Now!
X