सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूक, इन्स्टाग्रामसह मेटाच्या ठप्प झालेल्या सेवा आता सुरू झाल्या आहेत. फेसबूक आणि इन्स्टाग्राम सुरू झाल्याने युजर्सनी सुटकेचा निःश्वास सोडला. मंगळवारी रात्री ९.१० वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार) भारतासह जगभरात मेटाच्या सेवा ठप्प झाल्या होत्या. दरम्यान, तब्बल ५० मिनिटांनंतर रात्री १० वाजता मेटाच्या सेवा सुरळीत झाल्या. तासभर फेसबूक आणि इन्स्टाग्राम बंद असल्याने युजर्स वैतागले होते. त्यांनी त्यांची नाराजी एक्ससारख्या इतर मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर व्यक्त केली. सोशल मीडिया नेटवर्कबाबतच्या घडामोडींची माहिती देणाऱ्या डाऊनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार रात्री ९ ते रात्री १० वाजेपर्यंत मेटासह गूगलच्या सेवांमध्येदेखील अडथळे येत होते.

रोबोज डॉटइन टेकचे सीईओ मिलिंद राज यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, मी स्वतः अनेकवेळा फेसबूक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट लॉग इन करण्याचा प्रयत्न केला. तसेच नेमकी अडचण काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, मी लॉग इन करू शकलो नाही. मला वाटतंय की, हा एक ग्लोबल सायबर अटॅक होता.

रात्री ९ वाजल्यापासून फेसबूकसह इन्स्टाग्राम, मेसेंजर, थ्रेड आणि मेटाचे इतर सर्व प्रकारचे अ‍ॅप्लिकेशन्स आणि संकेतस्थळं बंद होती. दरम्यान, सेवा सुरळीत झाल्यानंतरही मेटाकडून कोणतंही अधिकृत निवेदन आलेलं नाही. यापूर्वीदेखील जेव्हा-जेव्हा फेसबूकची सेवा ठप्प झाली होती तेव्हादेखील मेटाने कधी सेवा ठप्प होण्याचं कारण स्पष्ट केलं नव्हतं. मेटाने यावेळीदेखील फेसबूक डाऊन का झालेलं याबाबतची माहिती दिली नाही.

मेटाच्या सेवा बंद असताना एक्सवर नेटीझन्समध्ये यावर चर्चा करत होते. एक्सवर #instagramdown, #whatsappdown, #CyberAttack असे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होते. या हॅशटॅगसह नेटीझन्स फेसबूक, मेटा हॅक झालं असल्याची भीती व्यक्त करत होते. तर काहींना त्यांचा डेटा चोरीला जाण्याची भीती सतावत होती. काही युजर्सना वाटत होतं की, भारत सरकारने देशात मेटाच्या सेवा बंद केल्या असाव्यात. फेसबूक डाऊन झाल्याने काही युजर्सना केंब्रिज अ‍ॅनालिटिका फेबसूक डेटा लीक प्रकरणाची आठवण झाली. त्यावेळीदेखील युजर्सचे अकाऊंट्स आपोआप लॉग आऊट होत होते. मेटाच्या टीमने काही तासांनंतर मेटाच्या सेवा सुरळीत केल्या होत्या. परंतु, काही दिवसांनी फेसबूक डाऊन काळात कोट्यवधी युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एलॉन मस्कचा चिमटा

दरम्यान, फेसबूक, इन्स्टाग्रामच्या सेवा ठप्प असताना एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचे मालक एलॉन मस्क यांनी एक्सवर एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, तुम्ही जर ही पोस्ट वाचू शकत असाल तर याचा अर्थ आमचा सर्व्हर सुरळीतपणे काम करत आहे.