सर्वात सुरक्षित आणि सवरेत्कृष्ट हार्डवेअर वापरलेला स्मार्टफोन अशी ओळख असलेल्या अ‍ॅपल कंपनीने नुकतेच आपल्या नवीन उत्पादनांची घोषणा केली. यामुळे तंत्रप्रेमी
आणि अ‍ॅपल चाहत्यांमध्ये गेले पंधरा दिवस याचबाबत चर्चा सुरू आहे. या वेळी जाहीर केलेल्या उत्पादनांचे विविध पैलू हळूहळू समोर येऊ लागले आहेत. पाहू या अ‍ॅपलची नवी मेजवानी काय आहे ती.

अ‍ॅपल वॉच
अ‍ॅपलने घडय़ाळाची सुधारित आवृत्ती बाजारात आणली आहे. यामध्ये फेसबुक मेसेंजरपासून ते आरोग्यविषयक अ‍ॅप्सचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्यासाठीच्या अ‍ॅपमध्ये आता गर्भवती महिलेल्या गर्भाच्या हृदयाचे ठोकेही ऐकू येणार आहे. तर खास खेळाडूंसाठी अ‍ॅपलने विशेष घडय़ाळे आणि बँड्स बाजारात आणले आहेत. हे घडय़ाळ वॉच ओएस२ वर काम करते.

आयपॅड प्रो
अ‍ॅपलने नव्याने सादर केलेला आयपॅड अ‍ॅपलच्या आत्तापर्यंतच्या सर्व आयपॅडपेक्षा जलद असणार आहे. यामध्ये ए९एक्स थर्ड जनरेशनची ६४ बीट चिप वापरण्यात आली आहे. ही चीप यापूर्वीच्या ए८एक्स प्रोसेसरच्या तुलनेत १.८ पट जलद असणार आहे. या आयपॅडमध्ये बहुस्क्रीनचा पर्याय देण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये चार स्पीकर देण्यात आले आहेत. यामुळे आयपॅड एअर २च्या तुलनेत तिप्पट आवाज या आयपॅडला असणार आहे. हा आयपॅड ६.९ मि.मी. इतक्या जाडीचा असून त्याचे वजन ७१२ ग्रॅम आहे. तर याचा डिस्प्ले १२.९ इंच इतका आहे. यामध्ये सॉफ्टवेअर कीबोर्ड असला तरी अ‍ॅपलने आयपॅडसोबत कीबोर्डचे कव्हर दिले आहे. याशिवाय यामध्ये पेन्सिल स्टायलस देण्यात आले आहे. तसेच आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये १० तासांचा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. याशिवाय या आयपॅडमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि एक्सेल हे दोन्ही सॉफ्टवेअर्स एकाचवेळी बाजूबाजूला चालविता येणार आहेत. अडोबेनेही आयपॅडमध्ये फोटोशॉप फिक्स आणि स्केचसारखे अ‍ॅप्स दिले आहेत. याशिवाय यामध्ये माणसाच्या शरीररचनेसंदर्भातील थ्रीडी अ‍ॅप देण्यात आले आहे. हे अ‍ॅप रुग्ण आणि डॉक्टरला उपयुक्त ठरणार आहेत. हा आयपॅड करडा, चंदेरी आणि सोनेरी रंगांत उपलब्ध होणार आहे. याची किंमत ७९९ डॉलर्सपासून पुढे असणार असून तो नाव्हेंबरमध्ये उपलब्ध होणार आहे.

अ‍ॅपल टीव्ही
अ‍ॅपल टीव्हीमध्ये नवीन ओएस देण्यात आली असून यामध्ये ६० पेड अ‍ॅप स्ट्रिमिंग उपलब्ध आहे. यामध्ये अत्याधुनिक हार्डवेअर वापरण्यात आले आहे. या टीव्हीचे नियंत्रण टचपॅड रिमोट आणि सिरीच्या माध्यमातून करता येणार आहे. यामध्ये गेम्सचे विशेष आकर्षण असणार आहे. यातील गेम्सचे सर्व नियंत्रण रिमोटवर असेल. तसेच नवीन अ‍ॅपल टीव्हीच्या रिमोटमध्ये सिरीसाठी वेगळे बटन देण्यात आले आहे. यामध्ये अ‍ॅप्स, आयटय़ून्स, नेटफिक्ससारख्या अ‍ॅप्ससाठी युनिव्‍‌र्हसल सर्चचा पर्याय देण्यात आला आहे. सिरी व्हॉइसच्या सर्चच्या माध्यमातून आपल्याला टीव्ही मालिकाही शोधता येणार आहे. तसेच सिरी आपल्याला कार्यक्रमही सुचविणार आहे. नवीन अ‍ॅपल टीव्हीमध्ये एचडी स्क्रीनसेव्हर असून आपल्या ठिकाणाच्या वेळेनुसार दिवस आणि रात्रीसाठी वेगवेगळे असणार आहे.
आयफोन ६ एस आणि आयफोन ६ एस प्लस
अ‍ॅपलने नऊ महिन्यांत आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लसची १८ कोटी ३० लाखांहून अधिक उपकरणे विकून एक नवा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. या दोन्ही फोनला अ‍ॅपलच्या आधीच्या फोनच्या तुलनेत मोठी स्क्रीन देण्यात आली होती. यामुळे कंपनीला चांगली बाजारपेठ लाभली. या सर्वाचाच विचार करून अ‍ॅपलने आयफोन ६ एस आयफोन ६ एस प्लस सादर केला. यामध्ये थ्रीडी टच स्क्रीन देण्यात आला आहे. या फोनमध्ये आम्ही खूप काही बदल केल्याचे अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुक यांनी या वेळी स्पष्ट केले. या फोन चंदेरी, सोनेरी, राखाडी या रंगांमध्ये उपलब्ध आहे. आयफोन ६ एसचा स्क्रीन ४.७ इंचांचा आहे तर ६एस प्लस हा ५.५ इंचांचा आहे. या दोन्ही फोनचे वजन हे आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लसच्या तुलनेत काही ग्रॅमने जास्त आहे. या फोनमध्ये अ‍ॅपल वॉच, मॅकबुक आणि मॅकबुक प्रोप्रमाणे फोर्स टच देण्यात आला आहे. याला थ्रीडी टच असे म्हटले आहे. तसा हा नवीन शोध म्हटला गेला असला तरी यापूर्वी ब्लॅकबेरीने २००८मध्ये प्रथम अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. यामध्ये देण्यात आलेल्या अ‍ॅपल मॅपमध्ये आपण शोधत असलेल्या ठिकाणावर जास्त वेळ बोट ठेवल्यावर तेथे जाण्याचा रस्ता आपलाला सांगितला जातो. अ‍ॅपल म्युझिकमध्येही एखाद्या गाण्यावर जास्त वेळ बोट ठेवल्यावर ते गाणे प्लेलिस्टमध्ये अ‍ॅड होते. अशाच प्रकारची सुविधा अ‍ॅप्स, मेसेजिंग आणि ई-मेल्ससाठी आहे. या दोन्ही फोनमध्ये १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला असून त्याला दोन एलईडी फ्लॅश लाइट देण्यात आले आहेत. दोन्ही फोनचा फ्रंट कॅमेरा हा पाच मेगापिक्सेलचा आहे. यामध्ये व्हिडीओसाठी फोर केची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये अ‍ॅपलने ए९ ही चिप वापरली आहे. त्याचबरोबर दोन जीबी रॅम वापरण्यात आली आहे. यामुळे फोनचा काम करण्याचा वेग वाढला आहे. आयफोन ६एसमध्ये १७१५ एमएएच तर आयफोन ६ एस प्लसमध्ये २७५० एमएएच इतक्या क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.