05 June 2020

News Flash

टाळेबंदीच्या काळात २४ लाखांचा मद्यसाठा जप्त

करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात वाढत असल्याने केंद्र सरकारने २१ दिवसांची टाळेबंदी जाहीर केली आहे.

१५ दिवसांत ४९ गुन्हे दाखल; १० वाहनांवर कारवाई

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात टाळेबंदीच्या काळात बेकायदा मद्यविक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागीय पथकाने कारवाई केली असून या कारवाईत जिल्ह्य़ातून २४ लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत विभागाने मद्याची वाहतूक करणारी एकूण १० वाहने जप्त केली असून ४९ गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी ३९ जणांना अटक करण्यात आली असून या पुढेही अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विभागाने कंबर कसली आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात वाढत असल्याने केंद्र सरकारने २१ दिवसांची टाळेबंदी जाहीर केली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे मद्यपींचे हाल झाले असून या संधीचा फायदा घेत ठाणे जिल्ह्य़ात गुप्तपणे मद्याची विक्री दुप्पट-तिप्पट दराने करत आहेत. मद्याची दुकाने बंद असल्याने जिल्ह्य़ातील विविध भागात काही जणांनी गावठी दारूच्या भट्टय़ा सुरू केल्या असून या दारूचीही जास्त दराने विक्री होत आहे. याबाबत टाळेबंदीच्या काळात राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागीय कार्यालयात वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारीनुसार राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने २३ मार्च ते ८ एप्रिल या टाळेबंदीच्या काळात ठाणे जिल्ह्य़ातील भिवंडी, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ तालुक्यांत विविध ठिकाणी असलेल्या गावठी दारूच्या भट्टय़ा उद्ध्वस्त केल्या आहेत. तसेच जिल्ह्य़ात विविध भागात अवैध दारूची वाहतूक करणारी १० वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत उत्पादन शुल्काच्या पथकाने एकूण २४ लाख १९ हजार ४९५ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला असून अवैध मद्यविक्रीप्रकरणी ४९ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी ३९ आरोपींना अटक केली आहे. यापुढेही जिल्ह्य़ात बेकायदा दारू विक्री होणार नाही, यासाठी उत्पादन शुल्क विभाग प्रयत्न करत असून विशेष पथकाच्या माध्यमातून बेकायदा दारू बनवणाऱ्यांवर व विक्री करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

मार्च महिन्यात ५७ लाखांचा मद्यसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाने मार्च महिन्यात अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाईचा बडगा उगारला होता. या कारवाईत पथकाने जिल्ह्य़ातील विविध ठिकाणांहून ५७ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. तसेच अवैधरीत्या मद्यविक्री करणाऱ्यांविरोधात १९२ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामधील १३२ जणांना अटक करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2020 1:53 am

Web Title: 24 lakhs worth of liquor seized during lockdown in thane zws 70
Next Stories
1 ऑनलाइन फसवणुकीपासून सतर्क राहा
2 टाळेबंदीतील उल्लंघनामुळे भाजीपाला बांधावरच
3 जैववैद्यकीय कचऱ्याची समस्या
Just Now!
X