उल्हासनगर : शहरात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही विनापरवानगी विविध प्रकारची दुकाने सुरू करण्याचा प्रताप उल्हासनगरातील काही व्यापाऱ्यांनी सुरूच ठेवला आहे. बंदी असतानाही दुकाने खुली ठेवल्याने अशा ११ दुकानदारांवर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तर अकारण दुचाकीवर सहप्रवाशाला घेऊन फिरणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

उल्हासनगर शहरात करोनाबाधित रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. शहरातील तीन विभागात समुह संसर्ग झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शहरात करोनाबाधितांची संख्या काही दिवसांत २००च्या जवळ पोचली आहे. त्यानंतरही शहरातील व्यापारी आणि नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवडय़ात छुप्या पद्धतीने विनापरवानगी दुकाने उघडून व्यवसाय करणाऱ्या  दुकानगारांवर सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने कारवाई केली होती. त्यानंतरही दुकाने सुरू असल्याने महापालिका आयुक्तांच्या आदेशावरून विविध प्रभागातील व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शनिवारी ११ व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यात कपडे, चप्पल आणि इतर अत्यावश्यक सेवेत मोडत नसलेल्या दुकानांचा समावेश आहे. त्यासोबतच विनाकारण दुचाकीवर सहप्रवाशाला घेऊन फिरणाऱ्या १५० प्रवाशांच्या वाहनांच्या चाव्या यावेळी जप्त करण्यात आल्या. शासनाकडून जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत दुकाने बंद ठेवावी असे आवाहन सहायक आयुक्त शिंपी यांनी केले आहे. तर नियमांचे पालन न झाल्यास कारवाई सुरूच राहील, असेही शिंपी यांनी स्पष्ट केले आहे.