बँक व सहकार क्षेत्र हे विश्वासार्हतेवर अवलंबून आहे. या दोन्ही व्यवस्था यशस्वी वाटचाल करण्यासाठी विश्वासार्हता महत्त्वाची असते. या व्यवस्थेत अलीकडे चुकीची माणसे शिरली आहेत. त्यामुळे ही क्षेत्रे बदनाम होत आहेत. व्यवस्थेला कीड लावणाऱ्या अशा व्यक्तींना वेळीच दूर सारण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
‘कोकण नागरी सहकारी बँक असोसिएशन’च्या नवीन कार्यालय आणि प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी आमदार संजय केळकर, असोसिएशनचे अध्यक्ष विलास देसाई, संस्थापक संचालक वामनराव साठे उपस्थित होते. वाणिज्य बँकांना कोटय़वधींची कर्जे मिळतात. त्याप्रमाणे सहकारी बँकांना अशा प्रकारची कर्जे मिळण्यासाठी मध्यवर्ती बँकेवर सरकारचे नियंत्रण असले पाहिजे. कोकण सहकारी बँक असोसिएशनने कोकणातील बँकांचा विचार न करता राज्यभरातील वित्तसंस्थांचा विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले.