वाढता ताण, कौटुंबिक कारणे देत पालिकेची मानद सेवा कमी करण्यास सुरुवात; आयुक्तांची पत्राद्वारे नाराजी

भगवान मंडलिक, लोकसत्ता

school bus operators oppose govt decision to start for pre primary to grade 4 classes from 9 am
शाळांच्या वेळांमधील बदलः बसचालक आक्रमक, पालकांनाही आर्थिक भुर्दंड
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
TCS Recruitment 2024
TCSमध्ये होणार पदवीधर उमेदवारांची भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख अन् प्रक्रिया
national pension scheme marathi news
मार्ग सुबत्तेचा : राष्ट्रीय निवृत्ती योजना (एनपीएस): फायदे आणि तोटे

डोंबिवली : करोनाविरोधातील लढाईत सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या खासगी डॉक्टरांची फळी आता कमी पडू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्नात असलेल्या कल्याण-डोंबिवली पालिकेसमोर नवेच आव्हान उभे राहिले आहे. पालिकेला गेल्या दोन महिन्यांत करोना साथ प्रतिबंधासाठी शहरातील विविध वैद्यकीय संघटनांमधील काही खासगी डॉक्टरांचे साह्य़ मिळत होते. मात्र, आता त्यातील काहींनी पालिकेतील मानद सेवा कमी करण्यास सुरुवात केली आहे.

खासगी डॉक्टरांनी पालिका प्रशासनाच्या साह्य़ाने १५ आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून साथ प्रतिबंध रुग्णालय, तापाचे दवाखाने पूर्ण क्षमतेने चालविण्यात महत्त्वाची कामगिरी केली होती. परंतु, टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात काही डॉक्टरांनी अनपेक्षित माघार घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी याबद्दल काही डॉक्टरांजवळ पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.

रुग्ण सेवेसह पर राज्यांतील श्रमिकांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याचे काम पालिकेच्या मानद सेवेतील खासगी डॉक्टर करीत आहेत.

पालिका रुग्णालयांत वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या मोजकी आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांच्या उपस्थितीमुळे पालिकेला हद्दीत कोविड रुग्णालय, १३ नागरी आरोग्य केंद्रे, तापावरील दवाखान्यांतून सेवा देणे शक्य झाले. ही सेवा दोन महिने काही खासगी डॉक्टरांकडून स्वयंस्फूर्त सुरू होती.

मात्र, आता चित्र बदलत आहे. काही डॉक्टर स्वत:चे खासगी दवाखाने चालविण्यात सक्रिय झाले आहेत. ‘आता आमचे कौटुंबिक रुग्ण दवाखान्यात येऊन बसू लागले आहेत. त्यांची सेवाही महत्त्वाची असल्याने तेथे जाणेही गरजेचे आहे, असे काही खासगी डॉक्टरांनी खासगीत सांगितले.

‘चक्राकार पद्धती पाळायला हवी’

चक्राकार पद्धतीने काम करताना त्या वेळेत सेवेकरी खासगी डॉक्टर हजर झाला नाही तर इतर डॉक्टरांवर त्याचा अनावश्यक ताण येतो. अलीकडेच तीन डॉक्टरांनी पालिकेत मानद सेवा देण्यास नकार दिल्याने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या तीन डॉक्टरांना पत्र पाठवून सेवेत केलेल्या कसुरीची नोंद घेऊन नाराजी व्यक्त केली आहे. या पत्राची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे.

चक्राकार पद्धतीने खासगी डॉक्टर दोन ते तीन दिवस सेवा दिल्यानंतर उर्वरित आठ दिवस डॉक्टर  कुटुंबापासून विलगीकरणात आहेत. ते पूर्ण झाले की पुन्हा सेवेत येत आहेत. डॉक्टर सेवा देत नाहीत असे म्हणणे चुकीचे आहे.

-डॉ. मंगेश पाटे, करोना प्रतिबंधित दक्षता पथक प्रमुख

दोन महिने खासगी डॉक्टर पालिकेत समर्पित भावनेने  वैद्यकीय सेवा देत आहेत. आताही त्यांच्या सेवा सुरू आहेत. खासगी डॉक्टरांनी पालिकेतील सेवा कमी केल्याच्या तक्रारी अद्याप तरी माझ्यापर्यंत आलेल्या नाहीत.

-डॉ. राजू लवांगरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी

विस्कळीत यंत्रणेमुळे नाराजी

आरोग्य केंद्रात अलीकडे व्यक्तिगत संरक्षक साधने  (पीपीई) दिली जात नाहीत. तेथे सहकारी कर्मचारी वर्ग नसतो. रुग्ण तपासणीपासून रांग लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, रुग्ण नोंदणी करण्यापासूनची कामे खासगी डॉक्टरांना करावी लागतात. मदतनीस कर्मचारी उपलब्ध नसल्याने दवाखान्यात एकाचवेळी अनेक आघाडय़ांवर काम करावे लागत आहे, असे काही खासगी डॉक्टरांनी सांगितले. विविध प्रकारचे रुग्ण तापावरील दवाखान्यात येतात. त्यासाठी व्यक्तिगत सुरक्षा साधनांची आवश्यकता असते. त्याची वारंवार मागणी करूनही ते मिळत नसल्याची डॉक्टरांची तक्रार आहे.  काही खासगी डॉक्टरांनी दोन महिने अविश्रांत काम केल्याने ताण आला आहे, अशी काही कारणे या डॉक्टरांनी पुढे केल्याचे सूत्रांनी सांगितले.