05 June 2020

News Flash

भिवंडी, मुंब्य्रावर ड्रोनची नजर

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची योजना

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची योजना

किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन सातत्याने केले जात असले, तरी भिवंडी आणि मुंब्रा या ठिकाणी काही नागरिक गल्ली तसेच इमारतीच्या गच्चींवर गर्दी करत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे अशाप्रकारे विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ठाणे पोलिसांनी आता ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या ड्रोनद्वारे नागरिकांना गर्दी करू नका, अशी उद्घोषणा केली जात आहे. तसेच ड्रोनमधील कॅमेरे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहेत.

यातील चित्रीकरणाच्या आधारे पोलीस घटनास्थळी जाऊन संबंधितांवर कारवाई करणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाकडून नागरिकांना घराबाहेर पडू नका, अशा सूचना केल्या जात आहेत. ठाणे पोलिसांनीही

जिल्ह्यात सीमाबंदी लागू केली आहे. त्याचबरोबर जागोजागी पोलिसांची पथके नाकाबंदी करीत आहेत. त्यामध्ये गेल्या काही दिवसांत एक हजाराहून अधिक वाहनचालकांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. अनेकांची वाहने तसेच वाहनांच्या चाव्या जप्त केल्या आहेत. मात्र, तरीही

काही ठिकाणी नागरिक विनाकारण घराबाहेर पडून शहरातील रस्त्यावर वाहनांमधून फेरफटका मारत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा तसेच महापालिका प्रशासनाने कल्याण, डोंबिवली, कळवा, मुंब्रा

आणि दिवा परिसरातील रस्ते आणि गल्लीबोळात वाहतुकीस बंदी घातली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी मुंब्य्रात राज्य राखीव दलाचे १०० जवानही तैनात करण्यात आले आहेत. तर भिवंडीतही पोलिसांकडून मुख्य मार्गावर नाकाबंदी सुरू आहे. असे असले तरी मुंब्रा आणि भिवंडी शहरातील दाटीवाटीच्या परिसरातील गल्लीबोळात आणि इमारतींच्या गच्चीवर नागरिक गर्दी करीत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे अशाप्रकारे विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी आता ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या दोन्ही शहरात पोलिसांची पथके ड्रोनच्या कॅमेऱ्याद्वारे विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

याशिवाय, नागरिकांना गर्दी करू नका, अशा सूचना ड्रोनमध्ये बसविलेल्या ध्वनिक्षेपकाद्वारे दिल्या जात आहेत. या ड्रोनमधील कॅमेऱ्याद्वारे शहरातील गर्दी टिपणे शक्य होणार आहे. हे कॅमेरे पोलीस उपायुक्त, साहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मोबाइलला आणि पोलीस नियंत्रण कक्षाला जोडण्यात आले आहेत.

चित्रीकरण पोलिसांच्या मोबाइलवर

ड्रोन कॅमेऱ्यात टिपले जाणारे चित्रीकरण हे सर्व पोलीस अधिकारी मोबाइलद्वारे पाहणार आहेत. त्याचबरोबर नियंत्रण कक्षालाही हे चित्रीकरण पाहता येणार आहे. त्यानुसार गर्दी असलेल्या ठिकाणी पोलीस जाऊन संबंधितांवर कारवाई करणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या ड्रोनमुळे या शहरांतील गर्दीवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 3:35 am

Web Title: drones help to monitoring and controlling crowds in bhiwandi and mumbra zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus outbreak : ठाणे जिल्ह्यातील करोनाबाधित शंभर पार
2 कळवा, मुंब्रा, दिव्यात वाहतुकीस बंदी
3 मासळीच्या दरात १०० ते १४० रुपयांची वाढ
Just Now!
X