जयेश सामंत

पुणे जिल्ह्य़ातील शहरी परिसरांत टाळेबंदीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच हट्ट धरल्याने ठाणे जिल्ह्य़ात टाळेबंदीला प्रखर विरोध करणाऱ्या गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना ‘टाळेबंदी विरोधातून’ माघार घ्यावी लागली.

करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे कारण पुढे करत २ जुलैपासून ठाण्यासह जिल्ह्य़ातील जवळपास सर्वच शहरांमध्ये १० दिवसांची टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ४ ते १३ जुलैदरम्यान टाळेबंदीची मुदत ठरविण्यात आली आहे, तर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कठोर निर्बंध लागू केले आहेत. ठाणे जिल्ह्य़ात आणि विशेषत: ठाणे शहरात पुन्हा संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यास गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला होता. पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीतही आव्हाड यांनी आपला विरोध नोंदविला होता. या विरोधामुळे ठाणे शहरात टाळेबंदीचे वेळापत्रक जाहीर करण्यास एका दिवसाचा विलंब लागला होता. मात्र पालकमंत्री शिंदे यांनी टाळेबंदी लागू करण्यासाठी पर्याय नाही असा आग्रह धरल्याने आव्हाडांना विरोध मागे घ्यावा लागला. त्यानंतर टाळेबंदीत पुन्हा वाढ करणे योग्य होणार नाही, अशी आव्हाडांची भूमिका होती.

अशाही चर्चा.. : गुरुवारी पुणे जिल्ह्य़ात जाहीर झालेल्या टाळेबंदीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला पुढाकार कारणीभूत ठरल्याचे पाहून ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागात लागू असलेल्या टाळेबंदीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही वाढ करत असताना आव्हाड यांना विचारातही घेतले नसल्याची चर्चा आहे. टाळेबंदीत वाढ करण्यास पालकमंत्री शिंदे आग्रही होते. अजित पवारांच्या निर्णयामुळे शिवसेनेला मुदतवाढीचा निर्णय घेणे सोपे गेल्याची चर्चा रंगली आहे. यासंबंधी जितेंद्र आव्हाड यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही होऊ शकला नाही. ते पालघर जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर असल्याने त्यांचा भ्रमणध्वनी संपर्क क्षेत्राबाहेर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयाने सांगितले.