मुंबईत कामानिमित्त जाणाऱ्या कल्याण, डोबिवलीकरांचा प्रवास हलाखीचा होत असतानाच मुंबई, ठाण्यातून डोंबिवली, कल्याण परिसरात येणाऱ्या नोकरदारांचे परतीचे हालही कायम आहेत. मुंबईच्या दिशेने जाताना वेळेवर बस नसणे, दुर्गाडी पूल, कोनगाव, भिवंडी बाह्यवळण रस्ता येथील वाहन कोंडी यामुळे परतीचे प्रवासी हैराण आहेत.

लोकलमध्ये प्रवास करण्याची मुभा नसलेल्या खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत. यात महिला कर्मचाऱ्यांची अधिक परवड होते आहे. प्रवासात तीन ते चार तास जात असल्याने बसमधील अनेकांना त्रास होत आहे. यामध्ये मधुमेह व इतर व्याधीग्रस्तांना प्रवास अडचणीचा होत आहे.

कल्याण-शिळफाटा, दुर्गाडी ते भिवंडी बाह्यवळण रस्ता, पुढे महामार्गावर कुठेही स्वच्छतागृहांची सोय नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होते. मुंबईतून डोंबिवलीत येणारे नोकरदार एमआयडीसीसह शहराच्या विविध भागात काम करतात. त्यांना बससाठी डोंबिवली पूर्वेतील बाजीप्रभू चौकात यावे लागते. रिक्षांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना कामाच्या ठिकाणापासून ते बस स्थानकापर्यंत येण्यासाठी कसरत करावी लागते. कल्याणमधील नोकरदारांना शहाड, खडकपाडा, कल्याण पूर्वेतून प्रवास करून कल्याण आगारात यावे लागते. डोंबिवली, कल्याणमधून संध्याकाळी बस मुंबई, ठाण्याच्या दिशेने निघाल्या की त्या शिळफाटा, भिवंडी बाह्यवळण रस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी अर्धा ते पाऊण तास घेतात. शिळफाटा रस्त्यावर पलावा चौक, शिळफाटा दत्तमंदिर चौकात कोंडी असल्याने २० ते २५ मिनिटे थांबा घ्यावा लागतो.

मुंब्रा रस्त्याने जाताना उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. ठाण्यात पोहोचण्यास एक ते दीड तास लागतो. डोंबिवली, कल्याणमधून बाहेर पडताना दुर्गाडी पूल, पत्रीपूल, पलावा चौक हे मोठे अडथळे वाहनचालकांना पार पाडावे लागतात. या ठिकाणी पूल उभारणीचे काम आणि पलावा चौकात नेहमीच कोंडी याचा फटका प्रवाशांना बसतो. या ठिकाणी भुयारी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव मागील सरकारने मंजूर केला आहे. परंतु सध्याच्या शिवसेना-भाजपमधील कुरघोडीच्या राजकारणामुळे हा विषय मार्गी लागत नसल्याचे कळते.

मुंबईतून कल्याण, डोंबिवलीकडे उलटा प्रवास करताना याच कोंडीचा प्रवाशांना फटका बसतो. कुलाबा, नरिमन पॉइंट, अंधेरी एमआयडीसी, बोरिवली भागांतून कल्याण, डोंबिवली, शहाडकडे येणारे प्रवासी ठाणे आणि डोंबिवली, कल्याण असा प्रवास करतात. प्रवासी खासगी वाहनाने डोंबिवली, कल्याणकडे येतात. मुंबईतून जे नोकरदार रात्री आठ ते नऊ वाजता निघतात त्यांना अनेक वेळा मध्यरात्रीचे बारा, एक वाजतात, असे प्रवाशांनी सांगितले.