करोनाबाधितांसाठी एक हजारांहून अधिक तर प्राणवायू असलेल्या ३७९ खाटा शिल्लक

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या चार दिवसांपासून करोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने महापालिका प्रशासनाने शहरातील मोकळ्या खाटांचा फेरआढावा घेण्यास सुरुवात केली आहे. करोना रुग्णांच्या उपचारासाठी पालिका तसेच खासगी रुग्णालयात एकूण १९६९ खाटा आहेत. त्यापैकी ८६० खाटांवर रुग्ण उपचार घेत असून उर्वरित ११०९ खाटा शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे. त्यात अतिदक्षता विभागातील १६४ तर, प्राणवायू असलेल्या ३७९ खाटांचा समावेश आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या चार दिवसांपासून करोना रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. चार दिवसांपूर्वी शहरात दोनशे रुग्ण आढळले होते तर, त्यानंतर १४० ते १७० च्या आसपास दररोज रुग्ण आढळून येत आहेत. यापूर्वी शहरात दररोज ७० ते ८० रुग्ण आढळत होते. रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास येताच महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी काही महिन्यांपूर्वी बंद केलेली करोना रुग्णालये आणि अलगीकरण कक्ष पूर्ववत करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यानुसार घोडबंदर येथील अलगीकरण कक्ष दोन दिवसांपूर्वी  सुरू करण्यात आला आहे. तर, उर्वरित  ठिकाणी आरोग्य यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम  सुरू आहे. असे असले तरी रुग्ण संख्येच्या तुलनेत शहरात आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे महापालिकेचे ग्लोबल कोविड रुग्णालय, घोडबंदर येथील लोढा इमारतीतील करोना काळजी केंद्र या ठिकाणी रुग्णांवर उपचार केले जात आहेत. याशिवाय कौशल्या, वेदांत, बेथनी, ठाणे हेल्थ केअर, विराज, हायलॅँड, डी-मार्क मेडवीन, होरिझन या खासगी रुग्णालयातही करोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या सर्वच ठिकाणी रुग्णांच्या उपचारासाठी एकूण १,९६९ खाटा असून त्यापैकी ८६० खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित ११०९ खाटा शिल्लक आहेत.

एकूण १,९६९ खाटा

ठाणे महापालिका रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात करोना रुग्णांच्या उपचारासाठी एकूण १,९६९ खाटा आहेत. त्यात स्वतंत्र कक्षांमध्ये साध्या ७४२ तर प्राणवायू असलेल्या ८८५ खाटा आहेत. यशिवाय अतिदक्षता विभागात ३४२ तर प्राणवायू असलेल्या १२७ खाटा आहेत. या सर्वच रुग्णालयांमध्ये एकूण ८६० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी स्वतंत्र कक्षांमध्ये साध्या खाटांवर ५४ तर, प्राणवायू असलेल्या खाटांवर ६२८, अतिदक्षता विभागातील खाटांवर १७८ तर प्राणवायू असलेल्या खाटांवर १२७ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये १,१०९ खाटा शिल्लक आहेत. त्यात स्वतंत्र कक्षांमध्ये साध्या ६८८ तर प्राणवायू असलेल्या २५७, अतिदक्षता विभागातील १६४  खाटांचा समावेश आहे.