वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण
डोंबिवली पश्चिमेतील विष्णूनगर बाजूकडील एक क्रमांकाच्या रेल्वे फलाटाला खेटून रेल्वे प्रवेशद्वाराच्या समोरच सुमारे ३० ते ४० उद्दाम रिक्षाचालक रिक्षा व्यवसाय करतात. त्यामुळे दररोज विष्णूनगर भागात वाहतूक कोंडी होत आहे. दीनदयाळ चौक ते महात्मा फुले चौकदरम्यान एका बाजूने सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. या भागातून एकेरी वाहतूक सुरू असते. तरीही उद्दाम रिक्षाचालक रस्ता अडवून व्यवसाय करीत असल्याने या भागात दुपारी १२ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सतत वाहतूक कोंडी असते.
दुपारी १२ वाजल्यानंतर वाहतूक पोलीस, सेवक भोजनासाठी निघून जातात. ते थेट संध्याकाळी पाच वाजता आपल्या नाक्यावर येतात. या कालावधीत शाळेच्या, खासगी बस व अन्य वाहने विष्णूनगर रेल्वे प्रवेशद्वारासमोरून ये-जा करीत असतात. ती सगळी वाहने या रिक्षाचालकांच्या मग्रुरीमुळे एकेरी वाहतुकीत अडकून पडत असल्याचे दृश्य दररोज दुपारनंतर पाहण्यास मिळत आहे. महात्मा फुले रस्त्यावर रेल्वे फलाटाला खेटून असलेले स्वच्छतागृह विष्णूनगर रेल्वे प्रवेशद्वाराच्या समोर सुमारे ३० ते ४० रिक्षाचालक तीन रांगांमध्ये रस्त्यामध्येच प्रवासी मिळविण्यासाठी उभे असतात. त्यामुळे प्रवाशांची मोठी अडवणूक होते. एखाद्या वाहनचालकाने रस्त्याच्या कडेला रिक्षा नेण्यास सांगितले तर त्याच्याशी हुज्जत घातली जाते. या मार्गावर शाळेच्या बस, कंपन्यांच्या तसेच खासगी बस रिक्षाचालकांच्या उद्दामपणामुळे नेहमीच कोंडीत सापडतात.
विष्णूनगर वाहतूक विभाग आणि पोलिसांनी एकत्रितपणे रस्ते अडवून व्यवसाय करणाऱ्या चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी पादचाऱ्यांकडून केली जात आहे. वाहनतळावर उभे राहून प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांवर हे उद्दाम चालक अन्याय करीत आहेत, अशी भावनाही व्यक्त होत आहे