20 January 2021

News Flash

‘तिसऱ्या डोळय़ा’कडे डोळेझाक

ठाण्यातील निम्मे सीसीटीव्ही कॅमेरे बंदच; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील गुन्हेगारीला पायबंद बसावा तसेच शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर लक्ष राहावे, या उद्देशातून प्रशासनाने काही वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत शहरात १४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे : महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील गुन्हेगारीला पायबंद बसावा तसेच शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर लक्ष राहावे, या उद्देशातून प्रशासनाने काही वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत शहरात १४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर बसविण्यात आलेले हे कॅमेरे सातत्याने बंद पडत असल्याचा आरोप होत असतानाच आता ठाणे शहरातील ५० टक्के, तर मुंब्रा, दिवा परिसरातील शंभर टक्के कॅमेरे बंद असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. त्यामुळे ही योजना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याबरोबरच शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी आणि गुन्हेगार लवकरात लवकर सापडण्यासाठी शहरात सीसीटीव्ही बसवण्यात आले. सीसीटीव्हींना ‘तिसरा डोळा’ समजले जाते. ठाणे शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर प्रभाग सुधारणा निधीतून १२००, वायफाय योजनेतून १०० असे एकूण १३०० कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच महापालिका प्रशासनाने यापूर्वी शहरात शंभर कॅमेरे बसविले आहेत. याशिवाय, तीनशे ते चारशे कॅमेरे आणखी बसविण्यात येणार होते. या कॅमेऱ्यांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवणे पोलिसांना शक्य होणार असून त्याचबरोबर सोनसाखळी चोरी आणि रस्त्यावरील गुन्हेगारीला आळा बसेल, असा दावा पालिका प्रशासनाने केला होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कॅमेरे बंद पडत असल्याने ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची बाब गेल्या वर्षी सर्वसाधारण सभेत उघडकीस आली होती. नौपाडा पोलिसांनी एका गुन्ह्य़ाच्या तपासासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण मिळविण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. त्या वेळेस चरई, हरिनिवास सर्कल, ब्राह्मण सोसायटी, दगडी शाळा सर्कल, चरई, गोखले रोड, अहिल्याबाई होळकर मैदान, मूस चौक, प्रभाग क्रमांक १९, २०, २१ येथील कॅमेरे बंद असल्याचे समोर आले होते. ही बाब सर्वसाधारण सभेत उघड झाल्यानंतर नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. असे असतानाच वर्षभरानंतर ठाणे शहरातील ५० टक्के, तर मुंब्रा परिसरातील शंभर टक्के कॅमेरे बंद असल्याची बाब समोर आली आहे.

बंद कॅमेऱ्यांप्रकरणी राष्ट्रवादीचे आंदोलन

ठाणे शहरातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक तर मुंब्रा-कौसा आणि दिव्यातील १०० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. या संदर्भात ठामपाच्या विद्युत विभागाशी संपर्क साधूनही कार्यवाही होत नसल्याचा आरोप मुंब्य्रातील राष्ट्रवादीचे नगरसेवक अश्रफ (शानू) पठाण यांनी केला आहे. त्यांनी सोमवारी सीसीटीव्ही लावलेल्या खांबांवर चढून तिथे एक फलक लावून अनोखे आंदोलन केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याला बघून घाबरू नका, कॅमेरा बंद आहे. ठामपा सुस्त आणि ठेकेदार मस्त आहे, अशा आशयाचा मजकूर या फलकावर लिहिण्यात आला होता. गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे आंदोलन केले. तसेच येत्या आठ दिवसांत ठामपाच्या विद्युत विभागाने सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू केले नाहीत तर बंदावस्थेतील हे कॅमेरे काढून ते विद्युत विभागात फेकण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.

ठाणे शहरातील सर्वच कॅमेरे सुरू आहेत. ८२ कॅमेरे नादुरुस्त झाल्याने ते सव्‍‌र्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी दिले आहेत. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे किंवा काही तांत्रिक कारणास्तव १० ते १५ टक्के कॅमेऱ्यांची लिंक हाजुरी सेंटरला मिळत नाही. या कॅमेऱ्यांचीही तांत्रिक दुरुस्ती तात्काळ करण्यात येते.
– विनोद गुप्ता, उपनगर अभियंता, विद्युत विभाग, ठाणे महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2020 3:36 am

Web Title: half of the cctv cameras are not functioning in thane dd70
Next Stories
1 ऑनलाइन करभरण्यावर ठाणेकरांचा भर
2 कल्याण-डोंबिवलीत १५ वाढीव चाचणी केंद्रे
3 ग्रामीण भागांतील रहिवाशांचे गृहस्वप्न साकार
Just Now!
X