कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक सहा महिन्यांवर येऊन ठेपली असतानाही नगरसेवक प्रभागातील गटारे, पायवाटा आदी लहानसान कामे करण्यातच व्यग्र आहेत. या कामांमध्ये ‘अर्थ’पूर्ण राजकारण असल्याने आणि ही कामे रहिवाशांची थेट संबंधित असल्याने ही कामे पूर्ण करण्याचा आटापिटा नगरसेवकांनी सुरू केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी मिळाली नसल्याने या कामांना पुरेसा निधी उपलब्ध होईल का, अशी भीती नगरसेवकांच्या मोठय़ा गटाला वाटू लागली आहे.
निवडणुकीच्या तोंडावर प्रभागांमध्ये गटारे, पायवाटा, उद्याने, वाहतूक बेट उभारून प्रभागात भव्यदिव्य करून दाखवल्याचे फलक लावायचे. मजूर संस्था, ठेकेदारांकडून करून घेतलेल्या या कामांमध्ये ‘हात’ मारून निवडणुकीसाठी थोडी जुळवाजुळव करून ठेवायची, असे उद्योग येथील महापालिकेत वर्षांनुवर्षे सुरू आहेत. महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक आपल्या प्रभागातील विकासकामांच्या नस्ती मंजूर करण्यासाठी आटापिटा करीत असल्याचे दृश्य सर्वसाधारण सभेत दिसले.
महापालिका हद्दीतील मोठे नागरी विकासाचे प्रकल्प रखडले असताना त्याविषयी साधा चकार शब्दही उच्चारला जात नसताना प्रभागातील त्याच गटारे, पायवाटांच्या कामांसाठी नगरसेवक आग्रह धरू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मनसेचे नगरसेवक राहुल चितळे यांनी सभागृहात या विषयाला तोंड फोडले. अर्थसंकल्प मंजूर होऊन वीस दिवस होऊन गेले तरी लेखा विभाग नस्तींवर नोंदी करीत नाही. त्यामुळे विकासकामांच्या नस्ती पुढे सरकत नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर कामे झाली नाहीत तर लोकांसमोर कोणत्या तोंडाने जायचे, असे काही प्रश्न चितळे यांनी केले.
महापौर कल्याणी पाटील यांनी अर्थसंकल्पावर अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. अर्थसंकल्प मंजुरीचा ठराव लेखा विभागाकडे पाठवला नाही. त्यामुळे नस्तीबाबत निर्णय घेता येत नाही, अशी कारणे लेखा विभागाचे मुख्य लेखाधिकारी डी. एस. चव्हाण देतात, असे नगरसेवक घरत यांनी सांगितले.  
नगरसेवक श्रीकर चौधरी यांनीही आयुक्त मधुकर अर्दड, लेखा विभाग उलटेसुलटे शेरे नस्तींवर मारून विकासकामांचा खोळंबा करीत असल्याची टीका केली. ११२ नगरसेवकांच्या प्रत्येकी आठ नस्ती पकडल्या तरी येत्या सहा महिन्यांत एकूण ८९६ नस्ती लेखा विभागात तयार होणार आहेत. या नस्ती शेरे, किरकोळ कारणांनी रोखून धरल्या तर विकासकामांचा बोजवारा उडेल, असे नगरसेवक घरत यांनी सांगितले.

अर्थसंकल्प फुगवल्याची महापौरांची कबुली
अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर अनेक सदस्यांनी आपली कामे स्थायी समितीने विचारात घेतली नाहीत, अशा तक्रारी आपल्याकडे केल्या होत्या. त्या सदस्यांची कामे आपण सर्व गटनेत्यांच्या संमतीने अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे अर्थसंकल्प फुगला आहे. अर्थसंकल्पावर नुकतीच सही करून तो छपाईसाठी पाठवण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण महापौर कल्याणी पाटील यांनी सभेत दिले.

गटारे, पायावाटांवर पाच कोटी खर्च
गेल्या वर्षी प्रभागातील गटारे, पायवाटांवर नगरसेवकांनी ५ कोटी ११ लाखांचा चुराडा केला आहे. चालू आर्थिक वर्षांसाठी याच कामांसाठी ८ कोटी ७१ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या गटारे, पायवाटांची कामे नगरसेवक आपल्या बांधलेल्या मजूर संस्थेला देतात. त्यामुळे गटारे, पदपथ तोड पुन्हा बांध हा उपक्रम नगरसेवकांच्या आशीर्वादाने प्रत्येक प्रभागात जोमाने सुरू असतो, असे सांगण्यात येते.