१० प्रभागांमधील १११ मालमत्तांना जप्ती अधिपत्र

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेचा मालमत्ता आणि ‘मुक्त जमीन कर’ थकविणाऱ्या बडय़ा विकासकांच्या मालमत्ता सील करण्याचा सपाटा महापालिकेने लावला आहे. गेल्या दोन दिवसांत वडवली, टिटवाळा भागातील थकबाकीदार विकासक, मालमत्ताधारकांच्या १८ कोटी ३५ लाख किमतीच्या मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कर निर्धारक आणि संकलक विनय कुळकर्णी यांनी दिली.

या आर्थिक वर्षांत ४६५ कोटी रुपयांच्या मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट महापालिकेने आखले आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोणत्याही परिस्थितीत मालमत्ता कर वसुलीचा इष्टांक पूर्ण झालाच पाहिजे, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून मालमत्ता कर विभागातील अधिकाऱ्यांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे.

वडवली येथील निर्मल लाईफ स्टाईल गृहसंकुलाचा १७ कोटी १४ लाखाचा कर थकीत आहे. या गृहसंकुलाचे कार्यालय आणि दोन इमारती पालिका अधिकाऱ्यांनी कर अधिकारी विनय कुळकर्णी यांच्या उपस्थितीत सील केल्या. मांडा येथील विकासक नीलेश पटेल यांनी ७६ लाख ६१ हजाराचा कर थकीत ठेवला आहे. याच भागातील अनंत खांडेकर यांनी कराची आठ लाख ६५ हजाराची रक्कम भरणा केलेली नाही. या दोघांना जप्ती अधिपत्र बजावण्यात आले आहे. टिटवाळा येथील मंदाकिनी रिटेलर्स विकासकाने ३५ लाख ७५ हजाराची कर रक्कम थकविली आहे. त्यांना जप्ती अधिपत्र बजावण्यात आले आहे. पालिका हद्दीतील १११ थकबाकीदारांना त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी अधिपत्र (वॉरन्ट) बजावण्यात आले आहे.