24 February 2021

News Flash

कचरा विल्हेवाटीचे तीनतेरा

आगीमुळे ठाणे, कल्याणकर कोंडले

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आगीमुळे ठाणे, कल्याणकर कोंडले

मुंबई महानगर परिक्षेत्राचा महत्त्वाचा भाग असलेल्या ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, भिवंडी या प्रमुख शहरांमधील कचरा विल्हेवाटीचे नियोजन पुरते ढासळले असून बडय़ा बिल्डरांच्या गगनचुंबी संकुलांना हिरवा कंदील दाखविण्यात मश्गुल असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना या शहरांचा कचरा कोठे टाकायचा या प्रश्नाचे ठोस उत्तर अजूनही शोधता आलेले नाही. एकटय़ा ठाणे शहरातून दररोज ९५० मेट्रिक टन इतका कचरा निघतो. सद्य:स्थितीत खर्डी-दिवा येथील १५ हेक्टरच्या खासगी भूखंडावर खाडीकिनारी हा कचरा कोणत्याही शास्त्रोक्त प्रक्रियेशिवाय नेऊन टाकला जातो. कल्याणातही आधारवाडी भागात क्षमता संपलेल्या कचराभूमीवर दररोज ६५० मेट्रिक टन कचऱ्याचा थर चढविला जात आहे. या दोन्ही ठिकाणी वरचेवर कचऱ्याला आगी लागत असल्याने त्यातून निघणाऱ्या धुरामुळे येथील जनजीवन काळवंडून गेले आहे. स्मार्ट सिटीच्या गप्पा एकीकडे मारल्या जात असताना मुंबईलगत असलेल्या शहरांमधील कचरा विल्हेवाटीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन आणि स्थानिक यंत्रणेकडे अजूनही ठोस नियोजन नाही, असेच चित्र आहे.

गेल्या काही वर्षांत ठाणे आणि आसपासच्या शहरांचे झपाटय़ाने नागरीकरण होत असून या शहरी पट्टय़ाची लोकसंख्या एव्हाना ५० लाखांचा आकडा गाठू लागली आहे. नजिकच्या काळात कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांकडे चौथी मुंबई म्हणून पाहिले जात असून या भागात मोठय़ा प्रमाणावर नवी गृहसंकुले उभी राहात आहेत. या संपूर्ण पट्टय़ाला असलेले महत्त्व लक्षात घेऊन मुंबईस्थित बडय़ा बिल्डरांनी आपला मोर्चा या भागाकडे वळविला असून विशेष नागरी वसाहतींचे (स्पेशल टाऊनशिप) मोठे प्रकल्प येथे उभे राहात आहेत. त्यामुळे दरवर्षी या शहरांमधील लोकसंख्या काही लाखांनी वाढताना दिसत आहे. लोकसंख्या वाढीच्या तुलनेत वाढत्या कचऱ्याचे करायचे काय हा प्रश्न मात्र अनुत्तरित असून ठाणे, डोंबिवलीसारख्या स्मार्टपणाची टीमकी वाजविणाऱ्या शहरांच्या सीमेवरील भागात  कचरा विल्हेवाटीचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे. ठाणे महापालिकेला सद्य:स्थितीला स्वतची कचराभूमी नाही. या प्रक्रियेसाठी महापालिकेने यापूर्वी तीन भूखंड आरक्षित ठेवले असले तरी या ठिकाणी कचराभूमी तयार करण्याचे प्रयत्न स्थानिकांच्या विरोधामुळे फसले. कल्याणात आधारवाडी येथील कचराभूमीची क्षमता संपली आहे. आतापर्यंत या ठिकाणी १५ लाख मेट्रिक टन इतका कचरा जमा झाला असून या कचराभूमीला पर्याय म्हणून उंबर्डे भागात कचराभूमीचे आरक्षण टाकण्यात आले आहे. मात्र, तेथेही स्थानिकांचा विरोध असल्यामुळे प्रकल्प रखडला आहे. अंबरनाथ-बदलापूर शहरातील कचरा शहराबाहेर वेशीवर कोणत्याही प्रक्रियेविना टाकला जातो आणि तसाच जाळलाही जातो. त्यामुळे या भागातही कचरा नियोजनाची बोंबच आहे.

ठाण्याला नव्या जागेची आस

दिवा-खर्डी भागात खाडीकिनारी, तिवरांच्या जंगलांवर कचरा टाकल्याबद्दल यापूर्वी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुन्हा दाखल केला होता. या आघाडीवर सातत्याने टीकेचे धनी व्हावे लागत असल्याने महापालिकेने महसूल विभागाकडे पाठपुरावा करून शीळ भागातील बंद दगडखाणींची जागा कचराभूमीसाठी मिळवली आहे. मात्र, पर्यावरण विभागाची अद्याप या प्रकल्पास परवानगी नाही. ही परवानगी मिळावी यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल युद्धपातळीवर प्रयत्न करत असून याशिवाय शहरात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याच्या प्रकारानुसार विविध प्रक्रिया प्रकल्पांनाही गेल्या अडीच-तीन वर्षांत सुरुवात करण्यात आली आहे. याशिवाय मोठय़ा गृहप्रकल्पांनी त्यांच्याच परिक्षेत्रात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. असे असले तरी नवी मुंबईचा अपवाद वगळला तर ठाणे जिल्ह्य़ातील एकाही शहरात शास्त्रोक्त पद्धतीने कचरा विल्हेवाट होत नाही ही वस्तुस्थिती आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ९५० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यामध्ये चार लाख ७० हजार किलोग्राम इतका जैव वैद्यकीय कचरा असतो. याशिवाय गेल्या काही वर्षांत शहरात बांधकाम कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. कल्याण डोंबिवली शहरात दिवसाला ६५० मेट्रिक टन इतका कचरा निर्माण होतो. आधारवाडी येथे आतापर्यंत १५ लाख मेट्रिक टन कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 1:18 am

Web Title: lack of waste management in thane 3
Next Stories
1 नव्या ठाण्याची पायाभरणी
2 ‘लॉजिस्टिक्सपार्क’चा अडथळा दूर
3 आधारवाडीकर संघर्षांच्या पवित्र्यात
Just Now!
X