रोजप्रमाणेच ठाणे स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी होती. दुपारी १२ वाजून ५६ ठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी ट्रेन पलाटावर येऊन उभी होती. अचानक राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (एनएसजी) शेकडो जवान रेल्वे स्थानकात दाखल झाले आणि ते भराभर ट्रेनच्या तीन डब्ब्यांमध्ये शिरले. हा सर्व प्रकार घडला ठाण्यातील पलाट क्रमांक एकवर उभ्या असणाऱ्या ठाणे सीएसटी ट्रेनमध्ये. या सर्वप्रकारामुळे प्रवासी प्रचंड घाबरले. मात्र नंतर हा सर्व सराव म्हणजेच मॉक ड्रील असल्याचे सांगण्यात आल्यानंतर प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

एनएसजी कमांडोजचा हा सराव २८ फेब्रुवारी रोजी पार पडला असला तरी या सरावादरम्यान काढण्यात आलेला लोकल ट्रेनमध्ये शेकडो एनएसजी कमांडो बसल्याचा फोटो आता एका आठवड्यानंतर व्हायरल झाला आहे. “रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनेनुसार आम्ही सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील तीन डब्बे रिकामे ठेवले होते. प्रत्येक डब्याच्या दारवाजाजवळ आम्ही सुरक्षा रक्षक उभे केले होते. एनएसजी कमांडोसाठी हे डब्बे रिकामे ठेवण्यात आले होते. काही कमांडो कांजूरमार्ग स्थानकामध्ये या डब्ब्यांमध्ये चढले. एकूण १०० कमांडो कांजूरमार्ग स्थानकातून ट्रेनमध्ये चढले,” अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) अधिकाऱ्यांनी दिली आहे. या डब्ब्यांमध्ये सामान्य प्रवाशांना प्रवास करण्यास परवाणगी देण्यात आली नव्हती.

कांजूरमार्ग स्थानकात लोकल १ वाजून १२ मिनिटांनी दाखल झाली आणि कमांडोची दुसरी तुकडी ट्रेनमध्ये चढली. ठाणे ते कांजूमार्ग स्थानकादरम्यान या डब्ब्यांमध्ये इतर कोणी चढू नये म्हणून सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. ही ट्रेन सीएसएमटीला पोहचली आणि हा सराव पूर्ण झाला.