ठाणे ते वाशीदरम्यान अवघ्या दोन लोकलफेऱ्या; अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे हाल

ठाणे/मुंबई : मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर सध्या ठाणे ते वाशीदरम्यान केवळ दोन उपनगरीय लोकल धावत असल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रस्ते मार्गाने प्रवास करावा लागत आहे. रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी, मर्यादित बससंख्या आणि पावसामुळे पडलेले खड्डे यामुळे रस्ते मार्गाच्या प्रवासाला अतिरिक्त वेळ लागत असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी हवालदिल झाले आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर जास्त लोकलफेऱ्या होत असताना ट्रान्स हार्बरलाच फेऱ्या का कमी, असा प्रश्न विचारत प्रवाशांनी लोकलफेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे.

ठाणे, मुंबई शहरातून मोठय़ा प्रमाणात आत्यावश्यक सेवेतील कर्मचारी नवी मुंबई आणि पनवेल येथे कामासाठी जात असतात. मुंबई, ठाण्यातील आत्यावश्यक सेवेत काम करणारा मोठा वर्ग नवी मुंबई आणि पनवेल येथे वास्तव्यास आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून टाळेबंदीमुळे लोकल सेवा बंद असली तरी राज्य शासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात उपनगरीय लोकल सेवा सुरू आहे. ठाणे ते वाशी आणि ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर मध्य रेल्वे प्रशासनाने केवळ दोनच लोकल सोडण्याचे नियोजन केले आहे. यातील एक गाडी ठाण्याहून वाशीकडे जाण्यासाठी सकाळी ८.४० वाजता निघते. तर, दुसरी गाडी सायंकाळी ४.३० वाजता वाशीहून ठाण्याकडे येण्यासाठी निघते. या दोन्ही लोकल ऐरोली आणि घणसोली स्थानकांवर थांबत नाहीत. त्यामुळे ही सेवा सुरू असूनही नसल्यासारखी असल्यामुळे नवी मुंबई आणि पनवेलमध्ये मुंबई-ठाण्यातून ये-जा करणारे बहुतांश अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी रस्ते मार्गाने प्रवास करत आहेत. या दोन्ही शहरात जाण्यासाठी बसची संख्याही मर्यादित असून टाळेबंदी शिथिल झाल्यामुळे खासगी नोकरदार वर्गही बसने प्रवास करत आहे. त्यामुळे बससाठी दररोज लाबंच्या लांब रांगा लावाव्या लागत आहेत. त्यातच नवी मुंबई आणि पनवेल दिशेकडे जाण्यासाठी कळवा नाका आणि एरोली येथील वाहतूक कोंडीचे दिव्य पार करावे लागत आहे. त्यामुळे कामाचे ठिकाण गाठण्यासाठी अतिरिक्त वेळ खर्च होत आहे.

बसमध्ये अंतर नियमांचा फज्जा

ठाणे, मुंबईतून नवी मुंबई आणि पनवेलला जाण्यासाठी राज्य परिवहन, नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम आणि बेस्टच्या बसेस उपलब्ध आहेत. या गाडय़ांची संख्या मर्यादित असून त्यातून अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी आणि खासगी नोकरदार वर्ग प्रवास करतो. त्यामुळे सकाळ आणि सायंकाळच्या वेळी या बसेसमध्ये प्रचंड गर्दी होते. त्यामुळे अंतरसोवळ्याचे नियम पाळणेही शक्य होत नाही. या धोकादायक प्रवासामुळे नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत.

मी टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये प्रशिक्षण घेत असून घणसोली येथे राहते. ट्रान्स हार्बर मार्गावर लोकल बंद असल्यामुळे बसनेच प्रवास कराला लागतो. बसची संख्या मर्यादित असल्यामुळे दीड ते दोन तास रांग लावावी लागते. त्यानंतर बसमध्ये गर्दी असल्यामुळे पुढील एक ते सव्वा तासाचा प्रवास उभ्यानेच करावा लागतो.

– मनीषा परब, प्रवासी घणसोली

मी घोडबंदर येथे वास्तव्यास असून खारघर येथील खासगी रुग्णालयात काम करतो. सध्या लोकल सेवा बंद असल्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचा भार वाढला आहे. त्यामुळे कळवा नाका येथील वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे. दररोज कामाला ये-जा करण्यासाठी या कोंडीतूनच वाट काढावी लागत असून प्रवासासाठीही दोन ते अडीच तास लागतात.

– गौरव पाटील, ठाणे