संगणकीय प्रणालीतील बदलांसाठी कामकाजाला पाच दिवस सुट्टी

ठाणे जिल्ह्यतील पत्रव्यवहारांवर परिणाम होण्याची भीती

ठाणे टपाल विभागांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयांत कागदमुक्त व्यवहार सुरू करण्यासाठी या कार्यालयांतील संगणकीय प्रणालीत बदल करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे येत्या २५ ते २९ जानेवारीदरम्यान जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयांचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. सुट्टीचा काळ असल्याने हा कालावधी सोयीचा असल्याचे टपाल प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र तरीही या निर्णयाचा ठाणे ते बदलापूपर्यंतच्या नागरिकांना काही अंशी फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठाणे जिल्ह्यात डाकघर विभागाची एकूण ५७ विभागीय कार्यालये असून १८७ अंतर्गत कार्यालयांचे जाळे पसरले आहे. सध्याच्या इंटरनेट युगातही टपाल खात्याचा कारभार कागदाच्या माध्यमातूनच होत होता. या संथगती कामकाजाबद्दल तक्रारी येऊ लागल्यानंतर संगणकीय कामकाजावर भर देण्यास सुरुवात झाली. मात्र टपाल खात्याच्या सध्याच्या संगणक प्रणालीत त्रुटी असल्याने अजूनही कारभार गतिमान झालेला नाही. ठाणे विभागीय डाकघरात काम केले असेल तर ठाण्यातील सर्वच टपाल कार्यालयात एखाद्या व्यवहाराची नोंद होत नव्हती. ही टपाल कार्यालये संगणक प्रणालीने एकमेकांशी जोडण्यात आलेली नाहीत. त्यामुळे टपाल प्रशासनाने आखलेल्या नव्या प्रणालीद्वारे ठाणे विभागीय कार्यालयात आपले खाते उघडले तरी त्या खात्याची नोंद संपूर्ण ठाणे जिल्ह्य़ातील कोणत्याही डाकघर कार्यालयात होणार असल्याने ग्राहकांना कोठूनही डाकघर खात्यातून पैशांची देवाणघेवाण करणे सोपे जाईल. इतकेच नव्हे तर ठाणे जिल्ह्य़ात ८१२ कर्मचारी डाकघर विभागात काम करत आहेत.

या कर्मचाऱ्यांची सुट्टी, भविष्य निर्वाह निधी तसेच अनेक  कामेदेखील आता संगणक प्रणालीद्वारेच होणार आहेत. ही संगणक प्रणाली अद्ययावत करण्यासाठी २५ तारखेपासून २९ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील सर्व कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

टपाल व्यवहारही इंटरनेटद्वारे

* ठाणे विभागात ८१२ कर्मचारी आहेत, तर एकूण ४४४ पोस्टमन आहेत. या सर्वाना नव्या संगणक प्रणालीशी प्रशिक्षित करण्याचे काम सध्या सुरू आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वत:चे संगणक खाते देण्यात येणार आहे.

*  हा प्रशिक्षण कालावधी ११ डिसेंबरपासून सुरू असून टपाल कर्मचाऱ्यांना एक दिवस तर इतर कर्मचाऱ्यांना आठवडय़ातून पाच दिवस संगणक प्रशिक्षण दिले जात आहे. येत्या वर्षभरात टपाल व्यवहारदेखील इंटरनेटद्वारे करता येणार आहेत. त्यामुळे नवीन संगणकीय प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी तीन ते चार दिवस डाकघर बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे विभागाचे साहाय्यक अधीक्षक दिलीप फणसे यांनी दिली.