‘जेट पॅचर’ भाडय़ाने घेण्याचा निर्णय

भर पावसातही रस्त्यावरील खड्डे बुजविता यावेत, तसेच बुजविलेले खड्डे पुन्हा उखडू नयेत, यासाठी ठाणे महापालिकेने यंदा ‘जेट पॅचर’ मशीन भाडय़ाने घेण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या यंत्रामुळे ठाणेकरांचा खड्डेमुक्त तसेच सुखकर प्रवास होण्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या शहरात सुमारे ३५६ किमीचे रस्ते आहेत. त्यापैकी १०८ किमीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे, तर उर्वरित २४८ किमीचे रस्ते डांबराचे आहेत. चार ते पाच वर्षांपूर्वी शहरातील बहुतेक रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात आले असून, हे सर्वच रस्ते सुस्थितीत आहेत. असे असले तरी मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते उखडून खड्डे पडण्याची दाट शक्यता असते. सिमेंट तसेच खडीचा मुलामा देऊन हे खड्डे बुजविण्यात येतात. मुसळधार पावसात मात्र वाहनांच्या वर्दळीमुळे पुन्हा खड्डे पडतात. काही वेळेस सतत पाऊस सुरू असल्यामुळे महापालिकेला खड्डे बुजविणे शक्य होत नाही. अशा खड्डय़ांमुळे जीवघेणा अपघात होण्याची शक्यता असते, शिवाय वाहतूक कोंडीची डोकेदुखीही वाढते. हे लक्षात घेऊन महापालिकेने यंदा ‘जेट पॅचर’ मशीन भाडय़ाने घेण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिका पहिल्यांदाच या यंत्राचा वापर करणार आहे.

जेट पॅचर मशीनचे काम

बारीक खडी आणि इमल्शन असे दोन्हीचे मिश्रण खड्डय़ांमध्ये ओतले जाते. सुमारे दीड ते दोन तासांत हे मिश्रण सुकते. त्यावर रोलर फिरवून रस्ता आणि खड्डा एकसारखे केले जातात. ‘जेट पॅचर’ यंत्राने बुजविलेला खड्डा पुन्हा उखडण्याची शक्यता फारच कमी असते, अशी माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.